उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:21 PM2024-06-05T17:21:35+5:302024-06-05T17:22:37+5:30
Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत ठाकरेविरुद्ध शिंदे असा सामना १३ जागांवर पाहायला मिळाला. त्यातील सर्वात जास्त जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या.
मुंबई - राज्यातील शिवसेनेत फूट पडून त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे २ गट पडले. निवडणूक आयोगानं शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंकडे सोपवले तर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागलं. निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरी खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर जनतेच्या मतपेटीतूनच मिळणार असं बोललं जातं होतं. त्यात लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे शिलेदार १३ जागांवर एकमेकांसमोर उभे होते. त्यातील उद्धव ठाकरेंपेक्षा एक जागा जास्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जिंकली आहे.
निवडणूक निकालात या १३ जागांपैकी तब्बल ७ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या तर ६ जागांवर उद्धव ठाकरेंना समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे या ६ जागांपैकी अनेक मतदारसंघ हे एकेकाळचे ठाकरेंचे बालेकिल्ले राहिलेत. त्यामुळे या ७ जागांवरील विजय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बळ देणारा आहे. छत्रपती संभाजीनगर, ठाणे यासारख्या मतदारसंघातही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा हजारोंच्या मताधिक्याने पराभव झाला आहे.
कोणत्या आहेत त्या १३ जागा?
जागा | उद्धव ठाकरेंचे उमेदवार | एकनाथ शिंदेंचे उमेदवार | विजयी शिलेदार |
बुलढाणा | नरेंद्र खेडेकर | प्रतापराव जाधव | प्रतापराव जाधव |
कल्याण | वैशाली दरेकर | श्रीकांत शिंदे | श्रीकांत शिंदे |
मावळ | संजोग वाघेरे पाटील | श्रीरंग बारणे | श्रीरंग बारणे |
हिंगोली | नागेश पाटील आष्टीकर | बाबूराव कदम | नागेश पाटील आष्टीकर |
छत्रपती संभाजीनगर | चंद्रकांत खैरे | संदीपान भुमरे | संदीपान भुमरे |
हातकणंगले | सत्यजित पाटील | धैर्यशील माने | धैर्यशील माने |
यवतमाळ वाशिम | संजय देशमुख | राजश्री पाटील | संजय देशमुख |
ठाणे | राजन विचारे | नरेश म्हस्के | नरेश म्हस्के |
शिर्डी | भाऊसाहेब वाकचौरे | सदाशिव लोखंडे | भाऊसाहेब वाकचौरे |
नाशिक | राजाभाऊ वाजे | हेमंत गोडसे | राजाभाऊ वाजे |
दक्षिण मुंबई | अरविंद सावंत | यामिनी जाधव | अरविंद सावंत |
दक्षिण मध्य मुंबई | अनिल देसाई | राहुल शेवाळे | अनिल देसाई |
उत्तर पूर्व मुंबई | अमोल किर्तीकर | रवींद्र वायकर | रवींद्र वायकर |
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत २१ जागा लढवल्या होत्या, त्यातील ९ जागांवर त्यांचा विजय झाला आहे. त्यात चंद्रकांत खैरे, अनंत गीते, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यासारख्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. कोकणात विनायक राऊतांचा पराभव करून भाजपाच्या नारायण राणेंनी विजय मिळवला आहे.