ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला; नरेश म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:54 PM2024-06-04T16:54:29+5:302024-06-04T17:01:09+5:30
loksabha Election Result - ठाणे मतदारसंघ हा मुख्यमंत्री शिंदेंचा होमग्राऊंड असल्याने या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.
ठाणे - राज्यातील लोकसभा निवडणुकीत ४८ जागांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागलेत. त्यात ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष होतं. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभे होते. हे दोन्हीही उमेदवार प्रचंड फरकाने विजयी झाले आहेत.
ठाण्यात नरेश म्हस्के यांच्याविरोधात राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजन विचारे हे विद्यमान खासदार होते. मात्र याठिकाणी म्हस्केंचा दारूण पराभव झाला आहे. नरेश म्हस्के यांना ६ लाख ३२ हजार ७८९ मते पडली तर राजन विचारे यांना ४ लाख ५८ हजार ५१९ मते पडली आहेत. जवळपास १ लाख ७४ हजार मताधिक्यांनी नरेश म्हस्के निवडून आले आहेत.
विजयानंतर नरेश म्हस्के म्हणाले की, हा विजय नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मेहनत यातून साकार झालेला आहे. सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा विजय आहे. आनंद दिघेंचा खरा शिष्य कोण हे जनतेनं दाखवून दिले. आनंद नगरमध्ये राहणारा नरेश म्हस्के याला एकनाथ शिंदेंनी १२ दिवसांत खासदार बनवलं. एकनाथ शिंदेंनी माझ्या पाठीशी हात ठेवला आणि नगरसेवकापासून खासदार बनवलं असं त्यांनी म्हटलं.
तसेच ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना सातत्याने त्रास दिला त्यांच्यामागे राजन विचारे उभे राहिले. त्यामुळे जनतेने मतदानातून त्यांना हे दाखवून दिले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात खासदारांची कामे काय असतात हे आगामी काळात दाखवून देऊ असंही नरेश म्हस्के यांनी सांगितले.
ठाण्यात २ शिवसैनिकांमध्ये लढत
ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रथमच दोन शिवसैनिकांमध्ये सरळ लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातील मराठी भाषिक ५१ टक्के मते या निवडणुकीत निर्णायक ठरली आहेत. मराठी मतांचा टक्का अधिकाधिक आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकासकामे केली आहेत. महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत होईल असं बोललं जात होतं.