गिरीश महाजन मदतीला धावले म्हणून बी. एस. पाटील बचावले; जळगावात युतीच्या सभेत फ्री-स्टाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 08:09 PM2019-04-10T20:09:24+5:302019-04-10T20:27:32+5:30
युतीच्या सभेत स्टेजवर राडा
जळगाव: जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार अमळनेरमध्ये घडला. अमळनेरमध्ये युतीच्या मेळाव्यात हा प्रकार घडला. भाजपामधील सुंदोपसुंदीतून ही घटना घडली. यावेळी भाजपाचे माजी आमदार बी. एस. पाटील यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यावेळी व्यासपाठीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण#bjp@girishdmahajan#ShivSena@BJP4Maharashtra@ShivSenapic.twitter.com/sCG3dbhMCR
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 10, 2019
अमळनेरमधील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली. पाटील यांना सोडवण्यासाठी महाजन पुढे सरसावले. त्यामुळे महाजन यांनादेखील धक्काबुक्की झाली. अंगावरुन धावून आलेल्या काहींना महाजन यांनी दूर सारलं.
भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की https://t.co/pidk2RXY7U
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 10, 2019
गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्यांदा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी ती रद्द करून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा पत्ता कट करण्यामागे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा गट असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
गिरीश महाजनांच्या मेळाव्यात का झाला 'राडा'? https://t.co/xwjhtCtArt
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 10, 2019
काय आहे स्थानिक राजकारण?
उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं आहे. डॉ. बी. एस. पाटील यांनी बऱ्याचदा भाजपाच्या वरिष्ठांकडे उदय वाघ यांच्या तक्रार केल्या आहेत. त्यातच स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर उदय वाघ यांचा गट वरचढ ठरेल, या भीतीनं डॉ. बी. एस. पाटील यांनी मोर्चेबांधणी करत ऐनवेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट केला होता. तसंच डॉ. बी. एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचाही उदय वाघ यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना व्यासपीठावर घेऊ नका, असा उदय वाघ गटाचा आग्रह होता. परंतु तो डावलत गिरीश महाजनांनी त्यांना मंचावर बोलावले आणि उदय वाघ यांनी त्यांना मारहाण केली.