Uddhav Thackeray : राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा 'रामबाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:21 AM2024-04-20T10:21:29+5:302024-04-20T11:06:27+5:30
Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपानेराम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे. "भाजपाने आधी रोजी-रोटीबद्दल बोलायला हवं. शेतकरी-महिला-गरीब-तरुण या मुद्द्यावर की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर... ते कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत हे त्यांनी सांगावं? राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता."
"बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, मुख्यमंत्री म्हणून मी विधानसभेत हिंदुत्वावर बोललो आहे. लोकांना ते माहीत आहे. पण आज माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवं आहे. जर एकच पक्ष असेल तर ते देशासाठी सर्वात धोकादायक आहे."
"माझ्या वडिलांच्या काळात एक मजबूत सरकार असावे असे आम्हाला वाटत होते, पण अटलजींनी आघाडीचे सरकार यशस्वीपणे चालवले, नरसिंह राव यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा आणल्या. आता काळाप्रमाणे देशाला अशा सरकारची गरज आहे जे अनेक पक्षांना सोबत घेईल" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर
उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिलं आहे. "मी असं का करू? माझा एकापेक्षा जास्त वेळा विश्वासघात झाला आहे. माझ्या दृष्टीने भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच "आमचे हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे. आपलं हिंदुत्व घरातील चूल पेटवणार आहे. भाजपाचं हिंदुत्व हे घर जाळणारं आहे."
"आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, फक्त देशद्रोही म्हणजेच देशाशी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात आहोत. भाजपा म्हणते चार जाती आहेत - तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब. तरुणांना नोकऱ्या कुठे आहेत? शेतकऱ्याच्या म्हणण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. गृहमंत्री या नात्याने अमित शाह यांना मणिपूरमधील महिलांवरील गुन्ह्यांची माहितीच नव्हती, असे दिसते. तुम्ही गरिबांना गरिबीत ठेवता" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.