Unmesh Patil : "या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी..."; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:30 PM2024-04-03T14:30:55+5:302024-04-03T14:41:04+5:30
Unmesh Patil And Lok Sabha Elections 2024 : उन्मेष पाटील यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे.
"महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने किंमत मिळाली नाही."
"मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे. प्रामाणिकपणे काम करत असताना जनता आणि सरकारमधला दुवा म्हणून काम केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला बदला घेण्यासाठी नाही तर बदलासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं."
"मी आवाज उठवला. मला कौतुक नको होतं, थाप नको होती. मात्र आमची अवहेलना करण्यात आली, मला मानसन्मान नको, कार्यकर्त्याची अवहेलना होते तेव्हा तो घुसमटतो. राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही. मान सन्मान नको पण जर आमचा स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलावलं जात नसेल, तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या स्वाभिमानाच्या लढाईत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. क्रांतीची मशाल पेटवायचं ठरवलं" असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.