लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

By यदू जोशी | Published: May 29, 2024 11:51 AM2024-05-29T11:51:16+5:302024-05-29T11:58:38+5:30

तरीही नरेंद्र मोदी लाटेचा फॅक्टर भारी ठरण्याचा विश्वास

Lok Sabha Elections 2024 Can BJP Alliance get hit on nomination Doubts in BJP circles | लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या येत्या ४ जून रोजीच्या संभाव्य निकालाची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली असून नेमक्या काय चुका झाल्या, यावर आत्मचिंतन केले. जात असतानाच, पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या लाटेत कोणताही उमेदवार दिला, तरी निवडून येईल, हे गृहितक चुकीचे तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिंदेसेनेने किमान आठ ते दहा उमेदवार वेगळे दिले असते, तर त्याचा फायदा झाला असता असाही मतप्रवाह आहे.

सामान्य मतदारांमध्ये ज्यांच्याबद्दल नाराजी आहे, अशा विद्यमान खासदारांना तिकीट दिल्याचा फटका विशेषत: विदर्भात बसू शकतो, असे म्हटले जात आहे. वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदियात नवीन चेहरे दिले असते, तर उमेदवारांबाबत जी काही ‘अँटी इन्कम्बन्सी’ (प्रस्थापितविरोधी नाराजी)  होती, तिचा फटका नवीन उमेदवाराला बसला नसता, असे विदर्भात पक्ष संघटनेत काम करणारे काही जण नाव न देण्याच्या अटीवर सांगत आहेत. उमेदवारांबाबत नाराजी हा एक भाग असला, तरी मोदींची सुप्त लाट होतीच आणि त्याचा फायदा होऊन असे उमेदवारही निवडून येतील, लोकांनी मोदींकडे पाहून मते दिली, असा दावाही हे नेते करत आहेत.

शिंदेसेनेच्या कोणत्या उमेदवारांना फटका?

शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांबाबतच्या नाराजीचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. त्यात बुलडाणा (प्रतापराव जाधव), यामिनी जाधव (दक्षिण मुंबई), हेमंत गोडसे (नाशिक), सदाशिव लोखंडे (शिर्डी) यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. बुलडाण्यात अपक्ष रविकांत तुपकर किती आणि कोणती मते घेतात, यावर जाधव यांचा जय-पराजय अवलंबून असेल. दक्षिण मुंबईची जागा भाजपने लढविली असती आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली असता, तर नक्कीच विजय मिळाला असता, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. यामिनी जाधव यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाल्याने त्यांना प्रचाराला तेवढा वेळ मिळाला नाही, ही बाबही त्यांच्या विरोधात जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महायुती, मविआचे दावे-प्रतिदावे

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा-मुस्लीम-दलित असे समीकरण महाविकास आघाडीसोबत होते, तर विदर्भात कुणबी-मुस्लीम-दलित समीकरणाने आमचा फायदा होईल, असे मविआचे नेते अनौपचारिक चर्चेत सांगत आहेत. दुसरीकडे मराठा आणि कुणबी समाज आमच्यासोबतही होता आणि लहान-मोठ्या अन्य जातींनी आम्हाला साथ दिली, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

  • ‘मतदारांची मोदींना पसंती, आम्हाला अडचण नाही’

प्रदेश भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘मोदी पंतप्रधान पाहिजेत की राहुल गांधी, असे दोनच पर्याय मतदारांसमोर होते, त्यात मतदारांनी मोदींना

  • पसंती दिली, त्यामुळे आम्हाला अडचण नाही.’

भाजपच्या नेत्यांशी बोलताना जाणवते की, उमेदवारांबाबतची नाराजी, विरोधात गेलेली जातीय समीकरणे यावर मोदी फॅक्टर भारी ठरेल, असे त्यांना वाटते.

या प्रयोगांचे काय?

उस्मानाबादमध्ये भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटाची, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ-वाशिममधून शिंदेसेनेने उमेदवारी देणे, महादेव जानकर यांना अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीतून लढविणे, शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना शिंदेसेनेतून आणून घड्याळावर लढविणे हे प्रयोग यशस्वी होतील का?

अमरावतीत जुळलेच नाहीत राणा आणि भाजपचे सूर

अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन तेथील सर्वच्या सर्व भाजप नेत्यांना नाराज केले गेले. राणा आणि भाजप यांचे सूर शेवटपर्यंत हवे तसे जुळलेच नाहीत. दोघांची प्रचारयंत्रणा समांतर होती. मोदी मॅजिक, नवनीत राणांची प्रतिमा हे दोन घटक सर्व नकारात्मक बाबींवर मात करतील, असे मानत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. पक्षाचे हे समीकरण अचूक होते का, ते ४ जूनच्या निकालात दिसेलच.

Web Title: Lok Sabha Elections 2024 Can BJP Alliance get hit on nomination Doubts in BJP circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.