Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:46 PM2024-05-18T12:46:39+5:302024-05-18T13:07:42+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024 And Sharmila Thackeray : राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "सर्व मतदारांनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा" असं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या एकत्र उपस्थितीतील सभा शिवाजी पार्क येथील मैदानात पार पडली. पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी राज यांचे भाषण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत असं राज यांनी म्हटलं आहे. या सभेनंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "सर्व मतदारांनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा" असं आवाहन केलं आहे.
"मला असं वाटतं की, राज साहेबांनी खात्री बाळगली आहे की, मोदीच पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मोदींसमोर मांडल्या आहेत. मी सर्व मतदारांना एकच विनंती करेन की, बाळासाहेबांनी एक इच्छा व्यक्त केली होती की, मला जर काँग्रेससोबत जायला लागलं तर, मी माझा पक्ष बंद करीन, त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा."
"बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा..."
"शिवसेना उबाठा.... बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा... म्हणजे यातच आलं मला नेमकं काय म्हणायचंय ते... मला असं वाटतं की, लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं. सभेतील भाषणात राज साहेबांनी कोणत्याही गोष्टींवर टीका न करता, लोकांच्या ज्या इच्छा आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत, समाजाच्या गरजा आहेत, त्यासंदर्भात मागण्या मांडल्या आहेत. महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार"
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबईतील लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असून, त्यांचा प्रवास सुखाचा करा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या मागण्या करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरो, अशा शुभेच्छा दिल्या.