शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:45 AM2024-05-13T09:45:06+5:302024-05-13T09:46:07+5:30
अस्तित्वाच्या लढाईतून एकनाथ शिंदे बाहेर पडले. हिंदुत्ववादी विचारांचे असल्याने ते आमच्या जवळचेच होते. त्यामुळे ते आमच्यासोबत आले असंही फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई - मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे बंड करणारे नाहीत. ते कट्टर शिवसैनिक, कितीही अन्याय झाला तरी ते सहन करणारे होते. परंतु पक्षात हळूहळू त्यांचे पंख छाटायला सुरुवात झाली, त्यात दोन्ही बाजूंनी आपण अडकलो अशी भावना तयार झाल्याने शिंदेंनी पुढचे पाऊल उचलले असं पडद्यामागील राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरे राजकारणात आल्याने गडबड झाली नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेत गडबड झाली. मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय असं ते सांगत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी चर्चाही होते. शिंदेंची सुरक्षाही वाढवली होती. ते विधिमंडळ पक्षाचे नेतेही झाले असे असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. युती सरकार जेव्हापासून राज्यात आले तेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत होते. जशी संधी मिळाली तसं उद्धव ठाकरेंनी पद घेतले. जी बेईमानी केली ती पदासाठी केली. शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून बंड करणारे नाहीत. ते कट्टर शिवसैनिक आहेत असं त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे मंत्री झाले, सुपर CM झाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे आमदार काम घेऊन जायचे. ३ पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा आधार एकनाथ शिंदे झाले. एकनाथ शिंदेंकडे आमदार जायचे त्यामुळे कुठेतरी नवीन नारायण राणे तयार होतायेत अशी भीती उद्धव ठाकरेंना झाली. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले. एकनाथ शिंदे यांच्या विभागाच्या बैठका त्यांना न विचारता घेतल्या जाऊ लागल्या. मुख्यमंत्री बैठक घेऊ शकतात त्यांना तो अधिकार आहे. परंतु शिंदेंना न बोलावता थेट नगरविकास खात्याच्या बैठका आदित्य ठाकरे घेत होते. MMRDA च्या अधिकाऱ्यांच्या बैठका थेट आदित्य ठाकरे घ्यायचे आणि निर्णय करायचे. त्यातून कुठेतरी ही अवस्था लक्षात आली असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. मुंबई तकच्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले.
दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदेंना बाजूला सारण्याचं काम सुरू झाले. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने सेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार होता तो दूर झाला. उद्धव ठाकरे अल्पसंख्याक धार्जिणे होऊ लागले होते. जनाब बाळासाहेब ठाकरे कॅलेंडर छापले गेले. त्यातून आपण दोन्हीकडून अडकलोय. आदित्य ठाकरेंना पुढे आणायचं सुरू होतं. अस्तित्वाच्या लढाईतून एकनाथ शिंदे बाहेर पडले. हिंदुत्ववादी विचारांचे असल्याने ते आमच्या जवळचेच होते. त्यामुळे ते आमच्यासोबत आले असंही फडणवीस यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत युती भावनिक, राष्ट्रवादीशी नाही
एकनाथ शिंदे भावनिक तर अजित पवार प्रॅक्टिकल विचार करतात. अजितदादा राजकारणात इतके मुरलेले आहेत त्यामुळे त्यांच्याशी चर्चा प्रॅक्टिकल होते. शिवसेना आणि भाजपाची भावनिक युती आहे, राष्ट्रवादीसोबत भावनिक युती नाही, त्यासाठी आणखी ५-१० वर्ष जावे लागतील. भावनिक युती लगेच होत नाही. पुरोगामी विचारधारेशी आम्हाला अडचण नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रिपदाची ऑफर
मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती. मला मिलिंद नार्वेकरांचा फोन आला, उद्धवजींना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर मी बोललो. त्यावर देवेंद्रजी, हे सगळं संपवा, हे पद वाटणे वैगेरे सोडा. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आम्ही तुम्हाला पूर्ण समर्थन देतो असं उद्धव ठाकरे बोलले. तेव्हा मी आता वेळ निघून गेली आहे. आम्ही एकनाथ शिंदेंसोबत असं सोडू शकत नाही. तुम्हाला जर वेगळं काही हवं असेल तर तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोला. त्या पातळीवर जर काही चर्चा होत असेल तर बोलू असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.
उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र नाही
४ जूननंतर NDA बहुमताने सत्तेत येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची गरज वाटेल असं काही नाही. राजकारणात मनोमिलन राजकीय मतभेदांवर होऊ शकते. पण जिथे व्यक्तिगत मतभेद उभे राहिलेत तिथे मनोमिलन कसं करणार? नितीश कुमारांनी आमच्यावर टीका केली. परंतु ज्या पातळीवर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट आमच्यावर टीका करतोय अशी टीका नितीश कुमारांची कधीतरी पाहिलीय का? राजकीय मतभेद असतात, टीका होत असते, लोकशाही आहे. टीका केली म्हणजे शत्रू होतो असं नाही. पण कुठल्या स्तरावर टीका करताय...जी भाषा वापरली जाते त्यातून मी परवा सांगितली, मानसोपचार तज्त्राची मदत घेतली पाहिजे. एखाद्या पक्षाचा प्रमुख देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो, अशी भाषा बोलल्याने मनोमिलन होईल असं मला वाटत नाही असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं.
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार
शरद पवारांचा इतिहास पाहा, जेव्हा ते कमकुवत होतात, ते काँग्रेसमध्ये जातात, ताकद मिळवतात आणि पुन्हा बाहेर पडतात. १९७८ ला आमच्यासोबत येत सरकार बनवलं. १९८० ला पुन्हा बाहेर पडले. आतापर्यंत ४ वेळा शरद पवारांनी केले आहे. जेव्हा शरद पवारांची ताकद कमी होते तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात. ४ जूननंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे विधान संकेत आहे. अजित पवार आता विभक्त झाले, त्यांचे नेतृत्व त्यांचा मतदार स्वीकारतोय हे पवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं जवळपास ठरवलं आहे असंही फडणवीसांनी म्हटलं.