जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:13 AM2024-05-15T10:13:40+5:302024-05-15T10:16:47+5:30
Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर टीका करत भाजपाला पराभवाची भीती आहे, त्यामुळे पंतप्रधानांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आलीय असा आरोप केला.
मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) भाजपा निवडणूक माफिया आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणं हे त्यांना महत्त्वाचे आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी कधी सांभाळणार, रोड शो करणं त्यांचे काम नाही. पराभवाची भीती असल्याने हे सुरू आहे. जिथे जिथे मोदी जातील तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार आहे. १ नव्हे ४ रोड शो करा, जिथे मोदी जातील तिथे आम्ही जिंकू हे सूत्र आहे असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.
संजय राऊत म्हणाले की, तुमच्यावर दारोदार भटकण्याची आणि रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या. पंतप्रधान देशभरात रोड शो करतात, त्यांना दुसरं काम नाही का? घाटकोपरला १८ मृत्यू झाले तिथे जाऊन अश्रू ढाळण्याचं नाटक ते करतील. महाराष्ट्रातील जनतेनं मोदी गो बॅक अशी घोषणा दिली आहे. मोदी नको अशी भावना जनतेत आहे. जिथे मतदान झालंय तिथल्या ९० टक्के जागा मविआ जिंकतेय. उर्वरित जागा महाविकास आघाडी जिंकतेय. मोदी ब्रँड संपलाय, ४ जूननंतर झुला घेऊन मोदींना हिमालयात जायचंय असंही त्यांनी सांगितले.
तसेच प्रफुल पटेल यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप डोक्यावर घालून घेतला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मोदी महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतंय. ज्याच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप आहे त्यांच्याकडून अशाप्रकारे जिरेटोप घालून छत्रपतींचा अवमान केला जातोय या घटनेकडे महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने पाहतेय असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, महाविकास आघाडीनं देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं आहे. गल्लीगल्लीत, रस्त्यावर पंतप्रधानांना भाजपावाले पराभवाच्या भीतीनं फिरवत आहेत. मुंबईतल्या ६ जागांवर आम्ही लढतोय. त्यातल्या ६ पैकी ६ जागा जिंकण्याचा आमचा इरादा आहे. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतंय. नाशिक, कल्याण आणि घाटकोपर इथं येणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी पॅटर्न राबवला गेला. त्यांच्या नेतृत्वात धारावीतून कोरोना हद्दपार झाला. त्याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. त्यावर दुसऱ्याने बोलण्याची गरज नाही असं संजय राऊतांनी सांगितले.