निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 08:47 PM2024-04-16T20:47:38+5:302024-04-16T20:50:20+5:30

एबीपी न्यूज-सी वोटरने ओपिनियन पोल केला असून यामध्ये महाराष्ट्रातील काही जागांबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

lok sabha Nilesh Lanke Shashikant Shinde and Ram Satpute will be giant killers 5 shocking predictions from the survey | निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

Maharashtra Lok Sabha Election ( Marathi News ) : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. देशात सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवण्याचा भाजपप्रणित एनडीएचा प्रयत्न असणार आहे, तर एनडीएला दूर सारत सत्ता काबीज करण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. अशा स्थितीत नक्की कोणाचा विजय होणार, याचं उत्तर ४ जून रोजी निवडणूक निकालातून मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी मतदारांचा कल कोणाकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी विविध संस्थांकडून ओपिनियन पोल केले जात आहे. एबीपी न्यूज-सी वोटरनेही असाच ओपिनियन पोल केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात आता मतदान झालं तर महायुतीला ३० आणि महाविकास आघाडीला १८ जागांवर विजय मिळू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ९ ते १० जागा मिळण्याचा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे महायुतीतील आणखी एक घटकपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गजांना मोठा धक्का बसणार असल्याचं या पोलमधून दिसत आहे.

कोणते नेते ठरणार जायंट किलर?

१. निलेश लंके

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे मैदानात असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके हे निवडणूक लढवत आहेत. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजेल, असा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज प्रत्यक्ष निवडणूकही खरा ठरल्यास तो सुजय विखे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

२. शशिकांत शिंदे

साताऱ्यात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना नुकतीच सातारा लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आजच भाजपकडून उदयनराजे भोसले यांचं नाव जाहीर करण्यात आलं. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत साताऱ्यात पराभव झाला असला तरी त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. असं असताना ओपिनियन पोलमधून लोकांचा कल सध्या तरी शशिकांत शिंदे यांच्या बाजूने असल्याचं दिसत आहे.

३. राम सातपुते

सोलापूर मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या व आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपने युवा नेते व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवलं आहे. मूळचे बीडचे असलेले आणि सध्या माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस तालुक्याचे आमदार असलेले राम सातपुते हे सोलापूरमध्ये जायंट किलर ठरणार असल्याचा अंदाज एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

४. अनंत गिते

राष्ट्रवादीतील फुटीनंतर रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनीही मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. मात्र याच तटकरे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गिते हे धक्का देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

५. बाळ्या मामा ऊर्फ सुरेश म्हात्रे

भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच सुरू होती. मात्र शरद पवारांनी हा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे खेचत इथून बाळ्या मामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली. शरद पवारांची ही खेळी यशस्वी होत असल्याचं दिसत असून बाळ्या मामा हे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का देण्याची शक्यता ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
 

Web Title: lok sabha Nilesh Lanke Shashikant Shinde and Ram Satpute will be giant killers 5 shocking predictions from the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.