संसदेत गोंधळ, लातूरच्या अमोल शिंदेला अटक; आई-वडील म्हणाले, “तो फक्त म्हणायचा की...”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 08:38 PM2023-12-13T20:38:25+5:302023-12-13T20:39:07+5:30
Parliament Winter Session 2023: त्याच्याशी शेवटचा फोन ९ तारखेला झाला होता, असे अमोलच्या पालकांनी सांगितले.
Parliament Winter Session 2023:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. याप्रकरणी चार जणांना पकडण्यात आले असून, अधिक तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. या घटनेत अटक करण्यात आलेल्या लातूरच्या अमोल शिंदे यांच्या पालकांनी यावर प्रतिक्रिया दिली.
अमोल शिंदे हा लातूरमधील झरी गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी अमोल शिंदे यांच्या झरी गावात धडक दिली. पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांकडे चौकशी केली. अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता. तसेच त्याचे आई-वडील मजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
अमोल शिंदे याच्याविषयी जास्त माहिती नाही
आपल्याला अमोल शिंदे याच्याविषयी जास्त माहिती नाही. अमोल आपल्याला भरतीला जातो, असे सांगून गेला. त्याच्या पुढचे काही सांगितले नाही. अमोल लॉकडाऊनच्या अगोदर एका वेळेस दिल्लीला गेलेला. त्यानंतर वर्षभरात दोन वेळा गेला. याशिवाय तो काही बोलला नव्हता. पोलीस भरती की सैन्याची भरती ते काही सांगितले नाही. तो फक्त म्हणायचा की सैन्यात जायचे आहे. त्याने संसदेत काय केले याची काहीच माहिती आली नाही, असे अमोलचे वडील म्हणाले.
दरम्यान, अमोल काहीच सांगत नव्हता. फक्त म्हणायचा की, माझे काम आहे, मी चाललो दिल्लीला, आधी मुंबईला म्हणाला. त्याने मुंबईला गेल्यावर त्याच्या अण्णाला फोन केला की, माझा मोबाईल बंद होणार आहे. मी दिल्लीला जाणार आहे. त्याच्याशी शेवटचा फोन ९ तारखेला झाला होता, असे अमोलच्या आईने सांगितले.