‘मातोश्री’वर लोकसभेची रणनीती; उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 07:18 AM2024-02-11T07:18:57+5:302024-02-11T07:19:26+5:30
राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता येत्या काळात महाविकास आघाडी आक्रमक होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई - महाविकास आघाडीचे रखडलेले जागावाटप आणि लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. रविवारी चेन्नीथला महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत राज्यातील सद्य:स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
रस्त्यावरचे आंदोलन सुरू करण्याबाबतही चर्चा
महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून, रविवारी सकाळी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत.
रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे नेते पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पश्चिम उपनगरात एका कार्यकर्ता मेळाव्यातही ते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता येत्या काळात महाविकास आघाडी आक्रमक होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून रस्त्यावरचे आंदोलन सुरू करण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.