गुंड सुधारण्यासाठी ‘लोकमंगल’ सोहळा

By admin | Published: February 12, 2017 01:47 AM2017-02-12T01:47:49+5:302017-02-12T01:47:49+5:30

चांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची

'Lokmangal' ceremony to improve the goondas | गुंड सुधारण्यासाठी ‘लोकमंगल’ सोहळा

गुंड सुधारण्यासाठी ‘लोकमंगल’ सोहळा

Next

- संजीव साबडे

चांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची वेळ राजकीय पक्षांवर येते. बिच्चारे राजकीय पक्ष. इतरांहून आम्ही वेगळे आहोत, असं सांगणारा भाजपाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे आधी गुंडापुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारू, असं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे सांगितलंय.
सुभाष देशमुख गेली अनेक वर्षं सोलापुरात आणि आसपासच्या भागांत खूप चांगलं काम करताहेत. त्यांच्या लोकमंगल संस्थेतर्फे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. त्यात हजारो जोडप्यांचे विवाह त्यांनी लावून दिले आहेत. त्यांना संसारोपयोगी वस्तू वगैरेही दिल्यात.
जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतर सुभाष देशमुख गुंडापुंडांना सुधारण्याचे लोकमंगल सोहळेही बहुधा आयोजित करतील. त्या सोहळ्यात वा सुधारणा शिबिरात सहभागी झालेले गुंड नंतर सुधारतील, गंगेत न्हाल्याप्रमाणे स्वच्छ, पवित्र होतील आणि सज्जनांप्रमाणे देशसेवेला लागतील. चांगले लोक राजकारणात येणार नसतील, तर असं काही करावंच लागेल की. सुभाषरावांच्या संस्थेचं नावच लोकमंगल आहे. सर्वांचं मंगल व्हावं असाच त्याचा अर्थ. त्यामुळे गुंडापुंडांचंही मंगल होईल.
लोकमंगलच्या सुधारणा शिबिरातून जे बाहेर पडतील, ते नंतर कधीही गुंडगिरी करणार नाहीत, गुन्हेगारी म्हणजे काय, हेच विसरून जातील. सुभाष देशमुखांनी आणखी एक कार्य करावं, आधी गुंड असलेल्या आणि नंतर शिबिरामुळे सुधारलेल्यांवरचे सारे खटले काढून टाकावेत. गुन्हे रद्द करून टाकावेत. भले ते खुनाचे, खुनाच्या प्रयत्नाचे, खंडणीचे, फसवणुकीचे कसलेही असेनात. सुभाष देशमुख स्वत: सरकारमध्ये असल्यानं त्यांना खटले काढून घेणं शक्य होईलच. सुधारलेल्या या सज्जनांना निष्कारण कोर्टात आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळच येता कामा नये. त्यामुळे त्यांची आणि भाजपाचीच बदनामी होईल की. सुधारलेल्यांना शिक्षा होणं, हे अन्यायकारकच.
लोकमंगलचे विवाह सोहळे सोलापुरात आणि मराठवाड्याच्या काही भागांतच होत असले तरी सुभाष देशमुखांनी लोकप्रतिनिधी झालेल्या गुंडांसाठी राज्यभर सुधारणा सोहळे आयोजित करायलाही हरकत नाही. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. नंतर देशभर त्यांनी विजयी गुंडांना सुधारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.
पुढील निवडणुकांत भाजपानं नव्या गुंडांना उमेदवारी द्यावी, निवडून आणावं आणि त्यांना सुधारण्याचं लोकमंगल कार्य देशमुखांच्या हातूनच घडावं. अशा प्रकारे काही काळानं राजकारणात येणारा प्रत्येक जण सज्जनच असेल. भाजपाचा प्रश्नच सुटेल.
विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्यापुढे अनेक दरोडेखोरांनीही शरणागती पत्करली होती. त्या साऱ्या दरोडेखोरांनी नंतर सामान्यांसारखं जीवन जगायला सुरुवात केली होती. सुभाषराव ज्यांना सुधारणार आहेत, ते तर आधीच जिल्हा परिषद वा महापालिकेवर निवडून आलेले असतील. त्यामुळे ते थेट समाजसेवेलाच लागतील. जनतेला अशाच समाजसेवकांची, लोकप्रतिनिधींची खूप खूप खूप खूप गरज आहे. त्यामुळे सुभाषराव, लवकरात लवकर हे लोकमंगल कार्य हाती घ्याच तुम्ही. त्यांना आधी नक्की निवडूनही आणा.

Web Title: 'Lokmangal' ceremony to improve the goondas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.