लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान

By admin | Published: September 4, 2016 02:26 AM2016-09-04T02:26:30+5:302016-09-04T02:27:43+5:30

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेची शताब्दी आणि ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचे १६०वे जयंती वर्ष, त्याबरोबरच

Lokmanya Public Ganesh Utsav Campaign | लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान

Next

- वर्षा फडके

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेची शताब्दी आणि ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचे १६०वे जयंती वर्ष, त्याबरोबरच पुढील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला होणारे सव्वाशे वर्ष या निमित्ताने लोकमान्य टिळक यांची जीवनगाथा, कार्य नव्या पिढीसमोर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि लोकमान्य उत्सवाचे आयोजन केले आहे. या नव्या उपक्रमावर टाकलेला हा दृष्टिक्षेप....

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे यंदा १६० वे जयंती वर्ष साजरे होत आहे. त्याशिवाय ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या सार्वजनिक गणेशोत्सवालादेखील पुढील वर्षी सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहेत. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ ही सिंहगर्जना करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला आणि देशाला स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले, त्या सिंहगर्जनेचेदेखील हे शताब्दी वर्ष आहे. या सगळ्या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राज्य शासनाने लोकमान्य टिळकांची जीवनगाथा आणि कार्य जनतेपर्यंत विशेषत: युवा पिढीसमोर आणण्यासाठी ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि ‘लोकमान्य’ उत्सवाचे आयोजन केले आहे. लोकमान्य महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतून सामाजिक एकोपा टिकवून, तो वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे.
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान हे यंदाच्या गणेशोत्सवात राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतु:सूत्री, तसेच समाजामध्ये जनजागृती घडविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन यापैकी एका विषयावर देखावा तयार करावा लागणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तपासणी व पारितोषिक निवडीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी, तसेच देखाव्याची पाहणी करण्याकरिता तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर समिती नेमण्यात आली आहे.
गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदींचे मूल्यांकन करून तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर होणार विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांना रोख बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी गणेशमंडळांना शासनाकडून सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. या अभियानात सहभागी होण्याची मुदत ४ सप्टेंबर आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली असणे आवश्यक आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी झाल्याचे अर्ज आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे, तर मुंबई शहर आणि उपनगरातील मंडळांनी त्यांचे अर्ज उपसंचालक (शिक्षण), जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई या कार्यालयात सादर करावेत. गणेशोत्सव अभियानाची माहिती, अर्ज www.cultural.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

लोकमान्य उत्सव
लोकमान्य टिळकांची जीवनगाथा, त्यांनी केलेल्या संघर्षाचा लढा विविध माध्यमांद्वारे नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमान्य उत्सव’ आयोजित केला जाणार आहे. यााकरिता देश-विदेशातील महाराष्ट्र मंडळांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ/महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. एकूणच लोकमान्य टिळकांचे कार्य गणेशोत्सव अभियान आणि लोकमान्य उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडताना, स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन आदी विषयांवरील सजावट-देखावे निश्चितच प्रबोधनात्मक ठरणार आहेत.

(लेखिका या माहिती जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालिका आहेत.)

Web Title: Lokmanya Public Ganesh Utsav Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.