पुण्यातील लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद निव्वळ मुर्खपणा- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:52 PM2017-08-19T15:52:26+5:302017-08-19T15:53:58+5:30
पुण्यात सुरू असलेला लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे.
पुणे, दि. 19- पुण्यात सुरू असलेला लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. आतापर्यंत थोर पुरूषांना जातीत विभागले जात होते, आता देवांचीही विभागणी केली जात आहे असे ते म्हणाले.
पक्ष संघटनेच्या कामासाठी म्हणून ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले. प्रत्येक वेळी याप्रकारे संवाद साधणे शक्य होत नाही. वर्तमानपत्र, मासिक काढणे आता शक्य नाही. तसे वातावरण राहिलेले नाही. त्यामुळे आता सोशल मिडियावर अॅक्टिव्ह होणार आहे. लवकरच माझे फेसबूक पेज ओपन होईल, तोपर्यंत फेसव्हॅल्यू वाढवून घेत आहे अशी कोटी त्यांनी केली. या पेजवर व्यंगचित्रांपासून ताज्या घडामोडींवरील भाष्यापर्यंत सर्व काही असेल असे ते म्हणाले.
कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्यांचा विकास व्हायला काही वेळ लागला आहे. आमच्याकडे दुसरी फळी नाही असे सांगितले जाते, पण त्याला काही वेळ लागेल. सध्याची स्थिती चांगली नाही. भाजपाच्या राजकीय यशामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्व कमी होत चालले आहे, त्यांचे धोरणही तसेच दिसते यावर बोलताना ठाकरे यांनी येत्या २१ सप्टेंबरला आपण मुंबईत पक्षाचा मेळावा घेणार आहोत, त्यात सर्व गोष्टी विस्ताराने बोलणार आहे असे सांगितले. पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून शहारातील परिस्थिती जाणून घेत आहे. लवकरच पदाधिकाºयांची नेमणुका केल्या जातील आणि त्यात नक्कीच नवे चेहरे दिसतील असे संकेत त्यांनी दिले. मुंबईतील मेळाव्यानंतर पुण्यातही मेळावा होईल अशी माहिती ठाकरे यांनी दिली.