‘इफ्फी’त लोकमान्यचा वर्ल्ड प्रीमियर
By admin | Published: November 26, 2014 11:23 PM2014-11-26T23:23:16+5:302014-11-27T00:11:59+5:30
चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांची निराशा झाली.
संदीप आडनाईक- पणजी -गोव्यात सुरु असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्य : एक युगपुरुष या मराठी चित्रपटाचा बुधवारी वर्ल्ड प्रीमियर झाला. या खास शोसाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता सुबोध भावे, निर्मात्या नीना राऊत, नाना पाटेकर, सुधीर मिश्रा, खासदार भारतकुमार राऊत उपस्थित होते.
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला ‘इफ्फी’त प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांची निराशा झाली. अनेकांना परत जावे लागले, तर काहींनी घुसखोरी करुन चित्रपट उभा राहून पाहिला. यावेळी चित्रपटाचे तंत्रज्ञ कौस्तुभ सावरकर, संगीतकार महेश म्हात्रे, वितरक एस्सेल व्हिजनचे निखिल साने, मल्हार पाटेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार भारतकुमार राऊत यांचे चिरंजीव ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटासाठी ओम राऊत यांनी काही वर्षे अभ्यास केला. लोकमान्यांच्या साहित्यावर संशोधन करुन या युगपुरुषाची आणि त्यांच्या देशभक्तीच्या विचारांची आजच्या परिस्थितीत कशी गरज आहे, याविषयी हा चित्रपट भाष्य करतो आहे. चित्रपटात आगरकर आणि लोकमान्य यांच्या वैचारिक संघर्षाचा आजचा संदर्भ देत युवापिढीला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेता नाना पाटेकर याने लोकमान्यांची भूमिका करणाऱ्या सुबोध भावे याचे तोंडभरुन कौतुक केले.
प्रेक्षकांशी संवाद साधताना दिग्दर्शक ओम राऊत याने मी गोयंचा नातू आसा, असे भाषण करून गोयंकरांचे मन जिंकून घेतले. गोव्याच्या भूमीत माझ्या पहिल्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर होतोय, याचा मला अभिमान वाटतो, असे सांगून देव त्यांचे भले करो, अशा शब्दांत गोव्यातील चित्रपट रसिकांविषयी त्याने आदर व्यक्त केला. ‘इफ्फी’त माझा चित्रपट दाखविला जातोय, हा माझा सन्मान आहे, असेही ओम म्हणाला.
पाच वर्षांचा करार
स्वतंत्र माहितीपट निर्माते असोसिएशनने (आयडीपीए) दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीसोबत माहितीपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष आणि माहितीपट निर्माते माईक पांडे यांनी बुधवारी गोव्यात दिली.