‘लोकमत’ने दिलेला पुरस्कार सगळ्यात मोठा - आशा भोसले
By admin | Published: April 4, 2016 03:24 AM2016-04-04T03:24:16+5:302016-04-04T03:24:16+5:30
‘आतापर्यंत मला ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार दिला गेलेला नाही, पण आज ‘लोकमत’ने दिलेला पुरस्कार मला सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार वाटतो,’ अशी हृद्य भावना संगीत रसिकांच्या मनावर
मुंबई : ‘आतापर्यंत मला ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार दिला गेलेला नाही, पण आज ‘लोकमत’ने दिलेला पुरस्कार मला सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार वाटतो,’ अशी हृद्य भावना संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी व्यक्त केली. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशा भोसले यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व पाच लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वेळी रसिकांशी संवाद साधताना आशाताई म्हणाल्या, ‘आता खूप वर्षे झाली. गेली ७२ वर्षे मी गात आहे. लोक माझी गाणी आजही तितक्याच प्रेमाने ऐकतात. माझ्यावर तेवढेच प्रेम करतात. ते अजून माझे शो बघतात, याचे समाधान काही वेगळेच आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला मिळाला, याचाही आनंद आहे. अजून काय म्हणू? मी भाग्यवान आहे!’ ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांनी या वेळी आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या गाण्यांचे मुखडे पेश करत, त्यांच्या कारकिर्दीला सलाम केला. क्लासिकल, जॅझ, भावगीत, नाट्यगीत, गझल, अभंग असे विविध प्रकार आशा भोसले यांच्या सुरातून उमटले आहेत. ‘भारतीय चित्रपट संगीताचा आत्मा काय, याची व्याख्या जर एका शब्दात करायची झाली, तर मी म्हणेन की, तो शब्द म्हणजे
‘आशा भोसले’ हाच आहे,’ असे गौरवोद्गार शंकर महादेवन यांनी या वेळी काढले.