संकटकाळात रक्तदान अभियानाचा गरजूंना मोठा दिलासा मिळेल : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:39 AM2021-06-15T06:39:28+5:302021-06-15T06:39:50+5:30

लोकमत रक्तदान महायज्ञाच्या लोगोचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

Lokmat Blood donation drive will be a great relief to the needy in times of crisis: Governor | संकटकाळात रक्तदान अभियानाचा गरजूंना मोठा दिलासा मिळेल : राज्यपाल

संकटकाळात रक्तदान अभियानाचा गरजूंना मोठा दिलासा मिळेल : राज्यपाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘रक्ताचं नातं’ या नावाने लोकमत मीडिया समूहाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी रक्तदान महायज्ञाच्या लोगोचे अनावरण सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. ‘लोकमत’च्या या अभियानाचे रक्ताची संभाव्य टंचाई दूर करण्यात मोठे योगदान राहील, असे सांगून महामहीम राज्यपालांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. या अभियानामुळे प्रत्यक्ष रक्ताची गरज असलेल्यांना मोठा दिलासा मिळेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. 

लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर लोकमत ‘रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, त्याची घोषणा जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून सोमवारी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली, तर विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करेल. आज ५० टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. 

नागपूर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा व लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन. के. नायक यांनी सोमवारी राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या अभियानाची माहिती दिली. कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी लोगोचे अनावरण करण्यात आले. 
लोकमत रक्तदान महायज्ञाबाबत आनंद व्यक्त करून शुभेच्छा देताना कोश्यारी म्हणाले की, रक्तदानाबाबत लोक बऱ्यापैकी जागरूक असले तरी लोकमतसारख्या अत्यंंत लोकप्रिय व प्रतिष्ठित वृत्तपत्राकडून असे अभियान राबविण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष रक्ताची गरज असलेल्यांना मोठा दिलासा मिळेल. कोश्यारी यांनी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सामाजिक, राजकीय योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

रक्ताची मोठी गरज
थॅलेसिमियासारख्या आजारातील रुग्णांना रक्ताशिवाय जगणे कठीण असते. आपल्याकडे या आजाराचे जवळपास १५ हजार रुग्ण आहेत. 
या सगळ्यांना असलेली रक्ताची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य खाते, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. 

२ जुलैपासून राज्यभर शिबिर
रक्तदाता दिनापासून रक्तदानासाठी इच्छुकांकडून डिजिटल प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जातील. 
त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप संदेश व अन्य मार्गानेही नावनोंदणी करता येईल. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनी, २ जुलैपासून राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. 

Web Title: Lokmat Blood donation drive will be a great relief to the needy in times of crisis: Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.