Lokmat DIA: महाराष्ट्राचा वाघ अन् बंगालच्या वाघिणीचं पुढं काय होतंय बघू! संजय राऊतांचं विधान अन् चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 02:41 PM2021-12-02T14:41:44+5:302021-12-02T14:59:40+5:30
Lokmat Digital influencer Awards 2021: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा बेस्ट पॉलिटिकल ओपिनियन मेकर पुरस्कारानं गौरव
मुंबई: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा यशस्वी मुकाबला करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईत येऊन गेल्या. या दौऱ्यादरम्यान बॅनर्जी यांनी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपला थेट शिंगावर घेणाऱ्या बॅनर्जींचं यांनी राऊत यांनी अनेकदा कौतुक केलं आहे. आता ममता यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर अवॉर्ड सोहळ्यात बेस्ट पॉलिटिकल ओपिनियन मेकर पुरस्कारानं गौरव करण्यात आला. यानंतर राऊत यांच्यासोबत भाडिपाच्या सारंग साठयेनं संवाद साधला. सध्या कोलॅब्जचा जमाना आहे. तुम्ही आतापर्यंत अनेकांसोबत कोलॅब्ज केलंय. आता बंगालचं काय?, असा सवाल साठयेंनी राऊत यांना विचारला. त्यावर कालच कोलकाता इथे येऊन गेला. चर्चा झाली. ममता बॅनर्जी म्हणजे बंगालची वाघिण आणि महाराष्ट्र वाघांचा प्रदेश आहे. आता वाघ वाघिणीचं पुढे काय होतं, असं राऊत म्हणाले.
संसार उत्तम; आहे ती घडी विस्कटणार नाही
आता राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. २०२४ मध्ये काय होईल?, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार आहे. आधी दोन पक्षांचं सरकार असताना भांडणं व्हायची. आता तीन पक्ष असूनही बरं चाललंय आणि सुरू असलेला संसार मोडायचा नाही असं मला वाटतं, असं राऊत यांनी म्हटलं. संसार चांगला चाललाय. त्याला कोणाची दृष्ट लागू नये, असं राऊत यांनी म्हटलं.