‘लोकमत दिवाळी उत्सव २०१६’ सर्वत्र उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2016 04:01 AM2016-11-01T04:01:03+5:302016-11-01T04:01:03+5:30
दिवाळीच्या आनंदमयी पर्वात साहित्यमेव्याची भर घालणारा लोकमतचा दिवाळी उत्सव २०१६ अंक प्रसिद्ध झाला
नागपूर : दिवाळीच्या आनंदमयी पर्वात साहित्यमेव्याची भर घालणारा लोकमतचा दिवाळी उत्सव २०१६ अंक प्रसिद्ध झाला असून तो सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंकाचे संपादक सुरेश द्वादशीवार हे आहेत.
विवेकमार्गी समाजासाठी प्राणांची बाजी लावलेल्या तीन व्यक्तिरेखांविषयी त्यांच्याच कुटुंबीयांनी व्यक्त केलेले मनोगत यात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांविषयी लिहिले आहे त्यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांनी. गोविंदराव पानसरे यांच्याविषयी मेघा पानसरे यांनी तर एम.एम. कलबुर्गी यांच्याविषयी कर्नाटकचे विख्यात विचारवंत व लेखक राजेंद्र चेन्नी यांनी.
स्त्रियांना बंदी असलेल्या मंदिरात त्यांनी प्रवेश करावा की करू नये या प्रश्नामागच्या सामाजिक, मानसिक व राजकीय जडणघडणीवर प्रकाश टाकत आहेत, विद्या बाळ, मंगला आठलेकर, सीमा साखरे, रूपा कुलकर्णी, मनीषा सबनीस व अरुणा सबाने. याच परिसंवादात वाचा या आंदोलनाच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची विशेष मुलाखत.
प्रादेशिक पक्ष व राष्ट्रीय ऐक्य या विषयावरील परिसंवादात सहभागी झाले आहेत, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, दत्तप्रसाद दाभोलकर, अभिनंदन थोरात व वसंत भोसले. विदर्भाचे राज्य वेगळे का हवे, याविषयी अॅड. श्रीहरी अणे, राम नेवले व सुरेश द्वादशीवार यांची विश्लेषणात्मक मांडणी. ज्या देशात दोन सूर्य उगवतात तेथील साद्यंत वृत्तांत लिहिला आहे मीना प्रभू यांनी. कविता महाजन, ह.मो. मराठे, शिवराज गोर्ले, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आदी नामवंतांच्या कथा, विठ्ठल वाघ, सुखदेव ढाणके, अश्विनी धोंगडे आदी कवींच्या कविता तसेच अरविंद पंचाक्षरी यांचे राशीभविष्य आहे. लोकमत दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)