लोकमत इफेक्ट ; तलवारीसह फोटोसेशन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 09:29 AM2019-06-02T09:29:15+5:302019-06-02T10:22:42+5:30
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुलेआम हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले.
औरंगाबाद – जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू असताना सुद्धा, पैठण तालुक्यातील भाजप विद्यार्थी मोर्च्याचे तालुका उपाध्यक्ष करण बोडखे यांनी वाढदिवस साजरा करत असताना खुलेआम तलवार हातात घेऊन फोटोसेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. याबाबत लोकमतमध्ये वृत्त येताच पोलीस प्रशासनाने या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे.
पैठण तालुक्यातील भाजप विध्यार्थी मोर्चाचे उपाध्यक्ष करण बोडखे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या फेसबुक पेजवर वाढदिवसाचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये वाढदिवस साजरा करत असताना, हातात तलवार असल्याचे फोटो सुद्धा पोस्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश देण्यात आलेला आहे. असं असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुलेआम हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले. याबाबतचे वृत्त लोकमत ने प्रकाशित करताच पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी बोडखे यांच्यावर वर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून तलवार जप्त करत अटक करण्यात आली आहे.
करण बोडके या तरुणावर अवैधपणे शस्त्र बाळगणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक ही करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ज्ञानेश्वर पायघन ( सहायक पोलीस निरीक्षक)
भाजपकडून कारवाई नाहीच
भाजप हा गुंडाचा पक्ष असल्याचे आरोप नेहमीच विरोधक करत असतात. त्यातच औरंगाबादमध्ये शस्त्रबंदी लागू असतानाही, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनकडून हातात तलवार घेऊन फोटोसेशन करण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजप विध्यार्थी मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष करण बोडखे यांच्या हातात तलवार आणि बाजुला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे उभे असतानाचे फोटो बोडखे याने आपल्या फेसबुकवरून पोस्ट केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही, भाजपकडून त्या पदाधिकाऱ्यावर अजून कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, भाजप गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.