लोकमत इफेक्ट - त्या बेवारस इसमाची 'सावली केअर सेंटर'ने घेतली जबाबदारी
By Admin | Published: July 8, 2016 04:11 PM2016-07-08T16:11:59+5:302016-07-08T16:11:59+5:30
गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच रहाणा-या हेमंत साळोखे नावाच्या व्यक्तीचे वृत्त आजच्या शुक्रवारच्या हॅलो कोल्हापूर पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाले होते.
मुरलीधर कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ८ - जमिनीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरूण घेऊन गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच रहाणा-या हेमंत साळोखे नावाच्या व्यक्तीचे वृत्त आजच्या शुक्रवारच्या हॅलो कोल्हापूर पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत कोल्हापुरातील 'सावली केअर सेंटर' या सामजिक संस्थेने त्वरीत प्रतिसाद दिला. सावली सेंटरने त्या इसमाला आपल्या संस्थेत आज दाखल करुन घेतले.
अंगावरच्या कपड्यांचीही त्याला शुद्ध नाही. कुणीतरी दिलेल्या शिळ्यापाक्या अन्नावरच त्याची गुजराण सुरू होती. पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली.
दसरा चौकाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फुटपाथवर त्याचा मुक्काम होता. तो येथे कधी आला, कसा आला, याबद्दल त्याला विचारले तर तो फारसे काही बोलत नाही; परंतु रस्त्यावरून येणा-जाणार्यांना मात्र तो कधीच, कसलाही त्रास देत नाही. कोणी काही खायला दिले तर तो कसुनसे हसून नमस्कार करतो.
पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे. मुसळधार पावसात दिवसभर तो फुटपाथवरच बसून असतो. रात्र झाली की तेथेच आडवा होतो. अंगावरचे कपडे, पांघरूण ओले चिंब झाले तरी त्याची त्याला शुद्ध नाही. त्याच्या हालचालीही आता पूर्वीपेक्षा मंदावल्या आहेत, असे आजूबाजूचे लोक सांगतात. अनेक दिवस अहोरात्र पावसात भिजल्याने त्याच्या अंगात तापही मुरला असावा, अशी शंका येते. त्याचे दिवस-रात्र भिजणे असेच पुढे चालू राहिल्यास त्याच्या जिवालाही धोका होऊ शकतो.
या अश्राप जिवाला आज निवार्याची गरज असून, त्याच्या पुनर्वसनासाठी समाजातील एखाद्या दानशुराने किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेने पुढे येण्याची गरज आहे.
नाव विचारले तर हेमंत साळोखे म्हणून सांगतो.
घर कुठे आहे? असे विचारले तर रंकाळ्याजवळ म्हणतो.
माझी एक संजना नावाची मावशी साने गुरुजी वसाहतीत राहते, असेही तो सांगतो; पण त्या मावशीचे आडनाव काय? तिचे घर नेमके कुठे आहे? असे विचारले तर त्याला काहीच सांगता येत नाही.
घरी कधी जाणार? म्हणून विचारले तर 'सच्या मला न्यायला येणार आहे. तो आला की मी दिवाळीला घरी जाणार' असे भाबडेपणाने तो सांगतो.
हा सच्या कोण आणि तो नेमका कधी येणार? हे मात्र त्याला सांगता येत नाही.