लोकमत एक्सक्लुझिव्ह : इसिसने पछाडलेल्यांचे परिवर्तन

By Admin | Published: March 26, 2016 07:26 PM2016-03-26T19:26:37+5:302016-03-26T19:27:05+5:30

वाजिद शेख आणि नूर मोहम्मदसह आणखी सात तरूण इसिसमध्ये सामील होण्यास गेले, मात्र त्यांनाही रोखून त्यांचे मतपरिवर्तन करण्यात आले.

Lokmat Exclusive: Changes made by this | लोकमत एक्सक्लुझिव्ह : इसिसने पछाडलेल्यांचे परिवर्तन

लोकमत एक्सक्लुझिव्ह : इसिसने पछाडलेल्यांचे परिवर्तन

googlenewsNext
 डिप्पी वांकाणी
 
लोकमतची भूमिका 
इसिसने सुरू केलेल्या तथाकथित 'धर्मवेड्या मिशन'ने भारावून गेलेल्या तरूणांची संख्या जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतातही लक्षणीय असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले. त्यानंतर कल्याणमधील चार तरूणांप्रमाणे राज्यातील इतरांनी इसिसच्या वाटेकडे आकर्षित होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील एटीएसने बिगरपोलिसी पद्धतीने प्रयत्न सुरू केले. त्याला आलेले यश व त्यातून जहालमतवाद डोक्यात भिनवलेल्या तरूणांचे झालेले मतपरिवर्तन लोकांपुढे आणण्यासाठी 'लोकमत' हा मजकूर प्रसिद्ध करत आहे. यामागे जहाल मतवाद्यांचे वा कट्टरपंथीयांचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही. 
 
मुंबई, दि. २६ - जिहादी जॉन आणि अबू बारा यांच्यामुळे प्रभावित झालेल्या, सीरियात असद यांच्याकडून झालेल्या बॉम्बहल्ल्यांबद्दल मनात द्वेष निर्माण झालेल्या वाजिद शेख आणि नूर मोहम्मदसह काही तरूणांनी 'इसिस'मध्ये सामील होण्यासाठी घरदार सोडलं. त्यापैकी वाजिद व नूर परतले असून 'लोकमत'ने त्यांच्या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू करून त्यांचा प्रवास वाचकांसमोर मांडला. आपली चूक उमजून कुटुंबात परतलेल्या नूर व वाजिदला समाजानेही स्वीकारले असून त्यांनी आता आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली आहे. 
पण त्या दोघांसोबतच आणखी सात तरूणही इसिसमध्ये सामील होण्यासाठी बाहेर पडले होते, सीरियाला जाणा-या त्या तरूणांकडे पासपोर्ट्सही होते. मात्र सुदैवाने योग्य वेळीच त्यांची ओळख पटल्याने त्यांना रोखण्यात आले आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील कट्टरपथींयाचा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसमधील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 
' आम्ही वाजिद आणि नूरची कसून चौकशी केली असता, त्यांच्याप्रमाणेच इतर सात तरूणही इसिसमध्ये सामील होण्यास गेल्याची माहिती आम्हाला मिळाली.  १८ ते २५ वयोगटातील या तरूणांनाही अयाज आणि मोहसीनने जिहादी जॉन व अबू बाराचे व्हिडीओ दाखवले होते. त्या तरूणांपैकी एक तर पत्नी-मुलांसह इसिसमध्ये जाणार होता, त्याच्या पत्नीनेही या युद्धात सामील होण्याची तयारी दर्शवली होती' असे सूत्रांनी सांगितले. ' विशेष म्हणजे वाजिद आणि नूरकडे पासपोर्ट्स नसल्याने मोहसीन चेन्नईमधून पासपोर्ट बनवण्याची खटपट करत असतानाच, त्या सातपैकी ५ तरूणांकडे योग्य पासपोर्टही होते', अशी माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र एटीएसमधील सूत्रांनी वाजिदची चौकशी करून त्यांच्याकडून त्या ७ तरूणांबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता आम्ही सर्वजण एका स्थानिक मशिदीत एकत्र भेटून इस्लामबद्दल चर्चा करत असू, असे त्याने सांगितले. पण आता आपण त्यांच्याशी बिलकूल संपर्कात नसल्याचेही वाजिदने स्पष्ट केले. 
'वाजिद व नूरशिवाय इसिसमध्ये सामील होण्यास निघालेले ते सात तरूण चांगले शिकलेले आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. त्यांच्यापैकी काहीजण इंजिनीअर्स तर काही उद्योजकही होते, अशी माहिती सूत्रांना वाजिदकडून मिळाली. पैसे मिळवणे हे त्या तरूणांचे उद्दिष्ट नव्हतेच, काही तरूण तर स्वत:चा पैसा गुंतवून सीरियाला जाण्यासही तयार होते. त्यांच्यापैकी एक तरूण केमिकल इंजीनिअर होता आणि तो बायको-मुलांसह सीरियाला जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याप्रमाणचे त्याच्या पत्नीनेही ते व्हिडीओ पाहिले होते आणि तिलाही त्या युद्धात सहभागी व्हायची इच्छा होती' अशी माहिती त्याने दिल्याचे सूत्राने नमूद केले. 
पण सुदैवाने त्या सर्वांनाच योग्यवेळी रोखण्यात एटीएस अधिका-यांना यश मिळाले आणि त्यांनी त्या सर्वांशी तीन महिन्यांहून अधिक काळ संवाद साधून त्यांच्या मनातील कट्टर विचार दूर केले.
यापूर्वी एटीएस अधिका-यांनी धुळ्यातील सहा तरूणांशीही संवाद साधून त्यांचे जहाल विचार दूर केले होते.

 

Web Title: Lokmat Exclusive: Changes made by this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.