‘लोकमत’ने केला स्त्रीसन्मानाचा जागर
By Admin | Published: August 7, 2016 01:15 AM2016-08-07T01:15:34+5:302016-08-07T01:15:34+5:30
ढोलपथकाचा नाद... स्त्रीशक्तीची महती सांगणारा पोवाडा, पथनाट्य, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर, ‘नारीशक्ती जागृत करूया, नराधमांशी लढा देऊया...’ अशी साद देत
कोल्हापूर : ढोलपथकाचा नाद... स्त्रीशक्तीची महती सांगणारा पोवाडा, पथनाट्य, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर, ‘नारीशक्ती जागृत करूया, नराधमांशी लढा देऊया...’ अशी साद देत कोल्हापूरवासीयांनी शनिवारी स्त्रीसन्मानाचा जागर केला. आम्ही स्त्रियांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणार नाही, अशी शपथ घेत त्यांनी मैत्रीचा आश्वासक हात दिला. गेल्या पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या वरुणराजानेही जणू एकवटलेल्या स्त्रीशक्तीला मुजरा करीत उसंत घेतली आणि सूर्यनारायणानेही लख्ख किरणांनी आपली हजेरी लावली.
‘लोकमत’तर्फे मैत्रीदिनाचे औचित्य साधून ‘धागा जोडू मैत्रीचा... सन्मान करू स्त्रीत्वाचा...’ ही संकल्पना घेऊन भवानी मंडपात मानवी साखळी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले यांनी ही मशाल पुढे नेली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे,‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह खासदार संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, महापौर अश्विनी रामाणे यांची उपस्थिती होती.
सकाळी नऊपासूनच विद्यार्थी, विद्यार्थिनींसह हजारो कोल्हापूरकरांची पावले भवानी मंडपात वळली. तुतारीच्या ललकारीने उपस्थितांचे स्वागत होत होते. ऐतिहासिक जुना राजवाड्याच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करवीर नादपथकाचे ढोल वाजू लागले. ‘स्त्रीत्वाचा नका करू तिरस्कार, चांगले विचार रुजवा, होईल तुमचा सत्कार...’ असे स्त्रीसन्मानाचा संदेश देणारे फलक हाती घेतलेल्या शेकडो शालेय विद्यार्थिनी, ‘सखी मंच’च्या सदस्या, सामाजिक संस्था, युवक-युवतींचे ग्रुप, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वयोवृद्ध नागरिक अशा समाजातील सर्व घटकांनी स्त्रीसन्मानासाठी हातात हात गुंफत मैत्रीची वीण घट्ट केली.
दिल्लीतील निर्भया, कोपर्डी आणि कोल्हापुरातील पल्लवी अशा महिला अत्याचाराच्या घटनांनी महिलांमध्ये सामाजिक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मैत्रीच्या या मानवी साखळीद्वारे मात्र लहान मुली, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती, पुरुषांनी आणि विविध संस्था, संघटनांनी महिलांना ‘तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमचा आत्मसन्मान जपू आणि सदैव रक्षण करू’ अशी ग्वाही दिली. (प्रतिनिधी)