‘लोकमत’कडून दिग्गजांचा सन्मान
By admin | Published: August 1, 2015 01:48 AM2015-08-01T01:48:03+5:302015-08-01T01:48:03+5:30
मैलाचा दगड पार करत तरुणाईसमोर उद्योग-धंद्यांचा आदर्श ठेवणाऱ्या कर्तृत्वशील उद्योजकांचा ‘लोकमत’कडून यथोचित सन्मान करण्यात आला. निमित्त होते ते ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स
मुंबई : मैलाचा दगड पार करत तरुणाईसमोर उद्योग-धंद्यांचा आदर्श ठेवणाऱ्या कर्तृत्वशील उद्योजकांचा ‘लोकमत’कडून यथोचित सन्मान करण्यात आला. निमित्त होते ते ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स अॅवॉर्ड’ सोहळ्याचे. शिक्षण, बँकिंग व फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींच्या गौरवानंतर ‘लोकमत’च्या या स्तुत्य उपक्रमावर मान्यवरांच्या शुभेच्छांचा पाऊसच पडला.
वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एन्ड हॉटेलमध्ये नुकत्याच रंगलेल्या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘लोकमत’चे संपादकीय संचालक ऋषी दर्डा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ एस.एस. झेंडे यांच्यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि सोहळ्याला जणू काही चार चाँद लागले.
ऋषी दर्डा यांनी या वेळी केलेल्या स्वागतपर भाषणात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील बांधकाम क्षेत्राकडून लोकांना खूप अपेक्षा असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक दिवसेंदिवस कोट्यवधींच्या घरात जात असतानाही सामान्यांसाठी या क्षेत्रातील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. परिणामी, बांधकाम क्षेत्रातील समस्या सुटाव्यात, तडीस जाव्यात यासाठी उल्लेखनीय पावले उचलण्याची गरज असून गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी गृहनिर्माण कायद्याची आवश्यकता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ऋषी दर्डा यांच्या भाषणातील या मुद्द्यांची गंभीरपणे दखल घेत, गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी आॅगस्ट महिन्यात गृहनिर्माण नियमन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घराचे स्वप्न बाळगले आहे. त्याला राज्याचे गृहनिर्माण क्षेत्र साद देईल. हे स्वप्न केवळ संपन्न लोकांसाठी नसेल तर ‘लोकमत’ ज्या सामान्य वाचकांचे प्रतिनिधित्व करीत आहे, अशाच सामान्य माणसांसाठी असेल. गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असेल, असे सांगत गृहनिर्माण प्रकल्प लाल फितीत अडकणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. नवी मुंबईतील नयना प्रकल्पांतर्गत ३० स्मार्ट शहरे वसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऋषी दर्डा यांच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या व्हिजनचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. विशेषत: गृहनिर्माण क्षेत्रासह उद्योग-धंद्याच्या वाढीसाठी दोन्ही मान्यवरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर उपस्थितांनी सोहळ्यादरम्यान स्तुतिसुमने उधळली.
फन अॅण्ड जॉयचे संचालक डॉ. आर.एल. भाटिया यांनी या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर मोहन ग्रुप या सोहळ्याचे टायटल स्पॉन्सर, सिद्धीटेक ग्रुप को-स्पॉन्सर, टीजेएसबी बँक बँकिंग पार्टनर आणि टॉपलाइन कन्स्ट्रक्शन कंपनी असोसिएट स्पॉन्सर होते. याप्रसंगी उपस्थित ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला आणि कार्यकारी संपादक (मुंबई) विनायक पात्रुडकर या मान्यवरांनी गौरवान्वित व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
बँकिंग अॅन्ड फायनान्स
सी. नंद गोपाल मेनन (टीजेएसबी), चिंतामणी नाडकर्णी (एनकेजीएसबी), दत्ताराम चाळके (अपना बँक), शिरीष म्हांबरे (सारस्वत बँक), दिलीप पेंडसे (श्यामराव विठ्ठल बँक), सदानंद के. नायक (जी.पी. पारसिक बँक), जॉय थॉमस (पीएमसी बँक), प्रदीप मांडके (अभ्युदय बँक)
एज्युकेशन
अरुण रामकृष्ण पाटील (आर. सी. पाटील फाउंडेशन), सुजाता मुखर्जी (एनएमआयएमएस), शैलेंद्र मेहता, सुधाकर सोनावणे व पी. विनोद (कीर्ती अॅनिमेशन), विजय पाटील (डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी), डॉ. पोतराजू मालसानी (गीतम युनिव्हर्सिटी), स्मिता तळेकर, मधुश्री दमानी (एलटीए स्कूल आॅफ ब्युटी), समीर जोशी (कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट), डॉ. प्रियम पिल्लाई (पिल्लाई कॉलेज), विलास कदम (भारतीय विद्यापीठ), सुधीर कदम (एमजीएम)
रिअल इस्टेट अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर
बरखा इंदर (मोहन गु्रप) , हेमंत अग्रवाल (सिद्धिटेक ग्रुप), उदयन शहा (टॉपलाइन), विशाल नहार व करण करनावत (एक्सरबिया ग्रुप), राहुल पनवेलकर (पनवेलकर ग्रुप), आनंद ठक्कर (व्हर्सटाईल ग्रुप), मंजू याज्ञिक (नाहार ग्रुप), सुबोध रुणवाल (रुणवाल ग्रुप), वर्षा सतपाळकर (मैत्रेय रियालिटर्स), अतुल मोडक (कोहिनूर गुु्रप), संतोष नाईक (दिशा डायरेक्ट), महेश अग्रवाल (रिजन्सी ग्रुप), नलीन शहा (शाह ग्रुप), सुरज परमार (कॉसमॉस ग्रुप), मनीष भाटिजा (पॅराडाइज), विश्वजित पतकी (पोदार हाऊसिंग), प्रकाश बाविस्कर (बाविस्कर ग्रुप), किरण विसपुते (शाश्वत ग्रुप), सतीश पिलांगौड (कर्म इन्फ्रास्ट्रक्चर) व पियुष ठक्कर (मॅड एजन्सी), मोहन थारवानी (थारवानी इन्फ्रा), प्रवीण पटेल (राज ग्रुप), दीपक बोसमियां (रश्मी हौसिंग), समीर नातू (नातू परांजपे ग्रुप), राजेश प्रजापती (प्रजापती ग्रुप), पराग ठक्कर (श्री महालक्ष्मी रेसिडेन्सी), अमित लखनपाल (फ्लीनस्टोन ग्रुप), मौलिक दवे (स्कायलाइन ग्रुप), पुरव (श्रीजी वृंद), मि. किशोर अवर्सेकर (युनिटी इन्फ्रा), हेमंत छेडा (अनंतनाथ डेव्हलपर्स)
‘लोकमत’ने शिक्षण, बँकिंग व फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करत त्यांना प्रेरणा दिली आहे. या क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांच्या गौरवाने नक्कीच राज्यातील उद्योग-धंद्यांसह उर्वरित क्षेत्राला दिशा आणि चालना मिळेल. ‘लोकमत’च्या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक आणि पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्थांना भविष्यातील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एखादे काम करून देण्यास कोणी टाळाटाळ करत असेल, कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल, एखादी व्यक्ती तुमच्याकडे लाच मागत असेल, तर तत्काळ आम्हाला संपर्क करा. आम्ही सदैव तुमच्या मदतीसाठी हजर आहोत. २४ तास ३६५ दिवसांमध्ये कधीही कोणीही भ्रष्टाचार करताना तुम्हाला दिसल्यास त्वरित तुम्ही १०६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे. सर्वसामान्यांनी आमची मदत घेतल्यास भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि ‘लोकमत’ला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- प्रवीण दीक्षित, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग