लोकमत की अदालतमध्ये रंगणार जुगलबंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:17 AM2018-07-10T06:17:59+5:302018-07-10T06:18:34+5:30
वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते.
मुंबई - वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते. ‘लोकमत की अदालत’ हा धमाल आणि अनोखा कार्यक्रम रंगणार आहे नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात.
निमित्त आहे, लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधानपरिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांच्या लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळयाचे. येत्या १२ जुलै रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदारांच्या गौरवाचा सन्मान सोहळा सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात येत आहे. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे पाच मान्यवर वाचकांचा आरोपांचा सामना करीत स्वत:चा बचाव करतील.
राजकारणात काम करताना नेत्यांवर, मंत्र्यांवर जनता आरोप करत असते, त्यांच्या कामांच्या निमित्ताने प्रश्न विचारत असते. वर्तमानपत्राच्या माध्यमांमधून वेळोवेळी वाचक, अनेक प्रश्न मांडत असतात. आपले लोकप्रतिनिधी विधिमंडळात काय करतात, विधिमंडळे गदारोळासाठी आहेत की जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहेत असे वेगवेगळे पण टोकदार प्रश्न वाचकांच्या मनात असतात. असेच काही बोचरे पण मजा आणणारे प्रश्न घेऊन अॅड. निकम गुरुवारी ‘लोकमत की अदालत’ मध्ये जनतेच्या व वाचकांच्या वतीने वकिली करतील.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी आतिश वानखेडे यांच्याशी ९९२२४४४२८८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.