‘लोकमत’ साहित्य पुरस्कारांची घोषणा!

By admin | Published: November 18, 2015 03:20 AM2015-11-18T03:20:04+5:302015-11-18T03:20:04+5:30

मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या मोहर ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’ची घोषणा करण्यात

'Lokmat' Literature Award! | ‘लोकमत’ साहित्य पुरस्कारांची घोषणा!

‘लोकमत’ साहित्य पुरस्कारांची घोषणा!

Next

पुणे : मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या मोहर ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली आहे. लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. १ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. याखेरीज नऊ साहित्यप्रकारांतील प्रतिभावंत लेखकांचा ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’ने सन्मान होणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हॉटेल हयात रिजेन्सी, नगर रस्ता
येथे होणार आहे. या वेळी
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या सन्माननीय अतिथी म्हणून
उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर, मोहोर ग्रुपचे अध्यक्ष व घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान लोकमत समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा भूषवणार आहेत.
विविध वाङ्मय प्रकारांत पुरस्कारप्राप्त साहित्यिकांमध्ये
कथा विभागात सतीश तांबे, कादंबरी विभागात नामदेव माळी, कविता विभागात श्रीधर नांदेडकर, ललित गद्य विभागात अतुल धामनकर, ललितेतर गद्य विभागात एम. डी. रामटेके, चरित्र-आत्मचरित्र विभागात अरविंद जोग, वैचारिक समीक्षा विभागात प्रा. प्रकाश पवार, अनुवाद विभागात धनश्री हळबे, विज्ञान विभागात पाणी विषय केंद्रस्थानी धरून देशोदेशीचे पाणी व इतर चार पुस्तके याबद्दल मुकुंद धाराशिवकर यांचा समावेश आहे. प्रत्येक वाङ्मयप्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकार सतीश भावसार यांची
निवड करण्यात आली आहे. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लोकमत साहित्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. लोकमत साहित्य पुरस्कारांतर्गत गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या राज्यभरातील साहित्यकृती विचारात घेण्यात आल्या होत्या. परीक्षक मंडळात प्रा. डॉ. द. ता. भोसले, निरंजन घाटे, अरुणा ढेरे, नीरजा आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: 'Lokmat' Literature Award!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.