लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: पाच यशस्वी उद्योगपतींना नामांकन; तुम्ही ठरवा सर्वोत्कृष्ट कोण!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:50 PM2022-09-17T16:50:49+5:302022-09-17T16:51:50+5:30
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. जिद्द, चिकाटी, परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर उद्योग विश्वात स्वतःचा ब्रँड बनवणाऱ्या पाच उद्योगपतींना 'उद्योग' श्रेणीत नामांकन मिळालं आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. जिद्द, चिकाटी, परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर उद्योग विश्वात स्वतःचा ब्रँड बनवणाऱ्या पाच उद्योगपतींना 'उद्योग' श्रेणीत नामांकन मिळालं आहे, त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल.
अमन मेहतानी, एडीएम ग्रुप, पुणे
इच्छाशक्ती असेल तर सगळं काही करता येतं, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एडीएम ग्रुपचे अमन मेहतानी. २००७ सालापासून अमन मेहतानी यांनी एडीएम ग्रुपची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नावीन्यपूर्ण कल्पनांनी आज ग्रुप नुसता बहरला नाही तर यशाच्या शिखरावर आहे. सिंगल इंडस्ट्री ऑर्गनायझेशन असल्याने धोरणात्मक नेतृत्व आणि व्यवस्थापनच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. आज एडीएम ग्रुपकडे काय नाही ते विचारा; ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग, रिॲलिटी, इंडस्ट्रीयल लिजिंग आणि ऑटोटेक असे सगळे काही ग्रुपकडे आहे. केवळ राज्यात, देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील जागतिक बेंचमार्क तयार करण्यासाठी ग्रुप आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भविष्यात लांबचा पल्ला गाठण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले जात आहे. म्हणूनच की काय पुणेस्थित या ग्रुपला जागतिक स्तरावर पाऊल ठेवण्यास मदत झाली आहे. केवळ बिझनेस नाही तर ग्रुपला माणुसकीदेखील आहे. त्यामुळे आपले कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि समुदायासाठी काही तरी करण्याची उर्मी ग्रुपमध्ये आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून ग्रुपने काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी अधोरेखित केलेल्या शाश्वत विकासाशी नाळ जोडण्याचा ग्रुपने सातत्याने प्रयत्न केला आहे. समाजाचे ऋण फेडताना त्यांनी रोजगार निर्मिती, तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणे सामाजिक मूल्यांनादेखील ग्रुपने अग्रभागी स्थान दिले आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
दिनेश राठी, आयकॉनिक स्टील, औरंगाबाद
आयकॉन स्टीलचे दिनेश राठी हे अत्यंत हसमुख व्यक्तिमत्त्व आणि तेवढेच दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून ओळखले जातात. २४ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या मित्रांसह एकत्रित येत राजुरी स्टीलची स्थापना तुटपंज्या भांडवलावर केली. प्रचंड परिश्रम घेऊन अल्पावधीच राजुरी स्टील नावारूपास आणली. राजुरी स्टीलचे विभाजन होऊन दिनेश राठी यांनी आयकॉन स्टीलच्या नावाने उत्पादन सुरू केले. जालन्यासारख्या ठिकाणी राहून अमिताभ बच्चन यांना आपल्या ब्रॅन्डची जाहिराती करण्यासाठी निवडण्यास हिंमत लागते, ती त्यांनी दाखवली. त्यांनी डीएस हे तंत्रज्ञान आणले. गगनचुंबी इमारती तसेच मोठमोठे पूल, रस्ते बांधणीसाठी अत्यंत उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिका, युरोपमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर आधीच होत होता. याच धर्तीवर हे डीएस तंत्रज्ञान आपण वापरण्याचा निर्णय घेऊन तो यशस्वी केला. या सर्व बदलांमुळे आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे आजघडीला जवळपास एक हजार दोनशे डिलर्सचे जाळे दोन वर्षात विकसित केले. त्यामुळे पश्चिम भारतामध्ये आयकॉन स्टील उत्पादनात अव्वल स्थानावर आहे. दिनेश राठी यांचा मूळ व्यवसाय होलसेल कापड दुकानाचा होता. परंतु त्यांनी वेगळी वाट निवडून अल्पावधीच उत्तुंग भरारी घेऊन जालन्यातील स्टील उद्योगालाच एक ब्रँड बनविले. ज्या काळात बँक मोठे कर्ज देण्यास तयार नव्हत्या त्यावेळी त्यांनी भागिदारांची मानसिकता बदलली. त्यासाठी मित्र, नातेवाईक तसेच खासगी वित्तीय संस्था यांच्या मदतीतून १५० कोटीची गुंतवणूक करण्याचे धाडस करून ते उभेही केले. आज त्यांच्या उद्योगाने यशाची अनेक शिखरे गाठणे सुरू केले आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
राजेश राठोड, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई
फ्लेअर पेन ७५ देशांमध्ये ३ हजार भागिदारांच्या वितरण नेटवर्कसह ८५० कोटी टर्नओव्हरचे लक्ष्य ठेवून आहे. कंपनीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांमध्ये ७० टक्के महिला आहेत. त्यांनी कंपनीच्या विकासात योगदान दिले आहे. नुसती कंपनी स्थापन केली म्हणजे यश मिळते, असे होत नाही. त्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटी लागते. नवनवीन कल्पना आल्या. फ्लेअर रायटिंग इंडस्ट्री लिमिटेडने नेमके तेच केले. तेव्हा कुठे ५५ वर्षांनंतर राजेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या पेनने यशाची शिखरे पादक्रांत केली. राजस्थानातून सुरू झालेला कंपनीचे सर्वेसर्वा खुबीलाल राठोड आणि त्यांचे बंधू विमल राठोड यांचा हा प्रवास मुंबईपर्यंत येऊन ठेपला आहे. फ्लेअर ब्रँड माहिती नाही, असा माणूस सापडणार नाही. खुबीलाल राठोड यांनी मुंबई गाठत १९६७ साली गोरेगावमधील पेरूबाग येथे दहा बाय दहाच्या जागेत पेनाच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याला त्यांचे बंधू विमल यांनी साथ दिली. मग या बंधूंचा पेनाचा दिल्ली, कोलकाता असा सुरू झालेला प्रवास ग्लोबल झाला आहे. एवढा मोठा उद्योग सांभाळणे सोपी गोष्ट नाही. मग त्यांचा मुलगा १९९३ साली राजेश खुबीलाल राठोड उद्योगात उतरला. त्यानंतर राठोड यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस फ्लेअर स्वत:ला मार्केट लीडर म्हणून प्रस्थापित करत असताना राजेश राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे ठरवले. त्यांनी व्यवसायाला एक नवीन आयाम आणला. काश्मीर ते कन्याकुमारी असा अवघा देश राठोड यांनी व्यापला आहे. आज राजेश राठोड उदयोन्मुख उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी एक आदर्श आहेत; याचे कारण म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि टीम वर्क होय.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
संजय देसाई, मदर्स रेसिपी, पुणे
देशी खाद्यपदार्थांची पारंपरिक चव जपत देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची मदर्स रेसिपी भारतातच नव्हे तर जगभरातील ४५ देशांमध्ये भारतीय खाद्यसंस्कृती टिकवून आहे. मदर्स रेसिपी उत्पादन श्रेणीत भारतीय लोणचे, मसाले, चटण्या, पापड, पाककला पेस्ट, करी पावडर, शिजवण्यासाठी तयार उत्पादने, भारतीय जेवण, खाण्यासाठी तयार उत्पादने (कॅन केलेला आणि रिटॉर्ट पॅकिंग), चटण्या, कॅन केलेला भाज्या, आंब्याचा पल्प यांचा समावेश आहे. मदर्स रेसिपी हा एक प्रसिद्ध भारतीय खाद्यपदार्थांच्या उत्पादनांचा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जागतिक स्तरावर भारतीय खाद्यपदार्थांच्या श्रेणीत आघाडीवरचा हा ब्रँड आहे. मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, यूके, कॅनडा आणि यूएस यासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही मदर रेसिपीची उत्पादने आहेत. मदर रेसिपीची विविध उत्पादने हे कर्नाटकात तयार होतात. येथून १२ पेक्षा जास्त देशांना लोणच्याच्या भाज्या निर्यात केल्या जातात. तसेच पुणे, कोलकाता आणि भारोडा या तीन ठिकाणी अत्याधुनिक उत्पादन सुविधा आहेत. उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक वनस्पतींना आयएसओ अंतर्गत प्रमाणित केले आहे. या उत्पादनांना स्वच्छतेच्या कठोर मानकांचे पालन व प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर ठोस गुणवत्ता नियंत्रण करण्यात येते. या उत्पादनांची गुणवत्ता उच्च मानकांनुसार राहील, यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली इन-हाऊस प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने टू स्टार एक्सपोर्ट हाऊस असा दर्जाही या उद्योगाला दिला आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
किरीट जोशी आणि विवेक देशपांडे, स्पेसवूड, नागपूर
६५ हजार रुपयांची गुंतवणुक, २ हजार चौरस फुटाची भाड्याची जागा आणि १० कामगारांसह सुरू झालेल्या कंपनीची आज ५ लाख चौरस फूट जागा, १५०० पेक्षा जास्त कामगार आणि १५० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आहे. ही कथा आहे दोन मराठी उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीचा मागे न लागता सुरू केलेल्या स्पेसवूड या उद्योगाची. आपण नोकरी न करता इतरांना नोकरी देण्याची जिद्द मनाशी बाळगत २६ वर्षांपूर्वी नागपुरात स्पेसवूड नावाने उद्योगाची उभारणी केली. चालू आर्थिक वर्षांत ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढालीचे स्वप्न किरीट जोशी आणि विवेक देशपांडे या उद्योजकांचे लक्ष्य आहे. दोघेही पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. कोविडपूर्वी जवळपास ५५० कोटींचा व्यवसाय होता. २०२० च्या अखेरीस स्पेसवूडमध्ये आगीची घटना घडली. मोठे नुकसान झाले; पण कंपनीने एक वर्षातच लक्षणीय वाढ केली. ही कंपनी घर, कार्यालय आणि व्यावसायिक जागांसाठी फर्निचरची निर्मिती करते. स्पेसवूड समूहाने २०१० मध्ये स्पेशलाइज्ड ऑफिस फर्निचर विभागाची स्थापना केली. स्पेसवूड ऑफिस सोल्युशन्स ऑफिस आणि व्यावसायिक फर्निचर तयार करून देतात. सध्या प्रमुख शहरांमध्ये ३० एक्सक़्लुझिव्ह स्टोअर्स, शाखा कार्यालय आणि ५०० पेक्षा अधिक डिलर्सचे नेटवर्क आहे. कंपनी भारतातील १०० पेक्षा अधिक बिल्डर्ससोबत काम करते. जपानी सुमितोमो समूहाकडून फर्निचर क्षेत्रात एफडीआय करणारी स्पेसवूड ही भारतातील पहिली भारतीय कंपनी होती. तसेच, त्यात दरवाजांसाठी तांत्रिक सहयोग करते. स्पेसवूडचे सहसंस्थापक किरीट जोशी यांना फर्निचर उद्योगात पूर्वीचा दोन वर्षांचा अनुभव होता. ग्रुप स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, नवीन बिझनेस डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये ते आघाडीवर आहेत.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा