लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: 'वैद्यकीय सेवे'साठी तुमचं मत कोणत्या डॉक्टरला?; 'ही' आहेत नामांकनं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:00 PM2022-09-16T12:00:52+5:302022-09-16T12:15:39+5:30
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'वैद्यकीय राज्य' या श्रेणीत पाच डॉक्टरांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल.
डॉ. पराग संचोती- ऑर्थेपेडिक सर्जन, पुणे
राज्यात सर्वाधिक मणक्याच्या रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अशी ओळख असणारे डॉ. पराग संचेती हे पुण्यातले नामांकित आॅर्थाेपेडिक सर्जन व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. डॉ. पराग संचेती यांचा हातखंडा हा गुडघा बदल शस्त्रक्रियेत आहे. त्याचबरोबर स्पोर्ट मेडिसिन, आॅथ्रोस्कोपी हे उपचार देखील ते करतात. देशातील बहुतांश खेळाडूंना त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यांच्या उपचारामुळे अनेक खेळाडूंना पुन्हा जिंकण्याची उमेद मिळालेली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी पुणे ग्रामीणमधील चौफुला येथील शेतकरी अमर जगताप यांच्या गाईला कृत्रिम पाय बनवला आणि तो बसवला होता. गेली तीस वर्षे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉ. पराग संचेती हे पुण्यातील शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून, पद्मविभूषण व प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांचे सुपुत्र आहेत. संचेती रुग्णालयाची ओळख अस्थिरोग सेवेत १९६५ सालापासून आॅथोर्पेडिक सज्ज आहे. या हॉस्पिटलची धुरा डॉ. पराग संचेती हे सांभाळत आहेत. रुग्णांना उत्तम आणि परवडणारी सेवा देणे हाच उद्देश डॉ. संचेती हे दरवर्षी रुग्णालयात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोठा कॅम्प भरवतात.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. शब्बीर इंदोरवाला- इएनटी, नाशिक
प्रत्येक क्षेत्रात स्पेशालिस्ट डॉक्टर्स खूप असतात. मात्र, त्यातील काही डॉक्टर्स त्या स्पेशालिस्टमध्येदेखील स्पेशल असतात. नाशिकचे डॉ. शब्बीर इंदोरवाला हे असेच ईएनटी अर्थात कान, नाक, घसाशस्त्रक्रियेसाठी नाशिकच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रख्यात आहेत. गुंतागुंतीची प्रक्रिया असूनही डॉ. इंदोरवाला यांच्याकडे आॅपरेशन झाले, म्हणजे ते यशस्वी होणारच, असा विश्वास त्यांनी जनमानसात निर्माण केला आहे. या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, अत्याधुनिक यंत्रणा याचा वापर करण्यासाठी त्यांनी स्वत:चे रुग्णालय स्थापन केले. दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या कानाच्या शस्त्रक्रिया करण्याचे तंत्रदेखील डॉ. शब्बीरवाला यांनीच शोधून काढले. झटपट होणाऱ्या या शस्त्रक्रियांमुळे रुग्ण लवकर बरे होऊन घरी परतू लागले. आपल्या क्षेत्रातील नवनवीन शोध, तंत्रज्ञान याविषयी सतर्क राहणे आणि त्या बाबी आत्मसात करण्यात डॉ. इंदोरवाला हे अग्रभागी असतात. नाशकात सर्व उपकरणांनी सुसज्ज कॉक्लेअर इम्प्लांट सुरू करण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्याचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना झाला. कोरोनाकाळात डॉ. इंदोरवाला यांनी म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजाराचे २०० हून अधिक रुग्ण आॅपरेशन आणि औषधोपचाराने बरे केले. त्यांनीच शोधून काढलेल्या कानाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना गतवर्षी एमआयटी पुणे या संस्थेने सन्मानित करुन त्यांच्या टॉकचे आयोजन केले होते. तसेच गतवर्षी त्यांना धन्वंतरी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाकाळात म्युकरमायकोसिस झालेला नागपूरचा एक रुग्ण नाशिकला डॉ. इंदोरवाला यांच्याकडे आला. त्या रुग्णाला ग्लोमस ट्यूमर होता. त्याची गाठ मेंदूपासून मानेपर्यंत आलेली होती. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या या रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. श्रीकांत मुकेवार- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, नागपूर
दररोज शंभराहून अधिक रुग्णांवर उपचार, तर गेल्या ४० वर्षांत १० लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार, १ लाखांहून अधिक एन्डोस्कोपिक सर्जरी हा स्कोअर आहे डॉ. श्रीकांत मुकेवार यांचा. महाराष्ट्रातील पहिले पात्र गॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्ट असलेले डॉ. मुकेवार यांची मध्य भारतात गॅस्ट्रो इंटेस्टाइनल केअर सुविधा आणणारे तज्ज्ञ म्हणून ओळख आहे. ते नागपुरातील गॅस्ट्रो एन्टेरोलॉजी केंद्रित हॉस्पिटल व मध्य भारतासाठी सेवा पुरवणाऱ्या मिडास हॉस्पिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. यकृताच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या जनजागृतीसाठी डॉ. मुकेवार हे मिशन म्हणून काम करीत आहेत. डॉ. मुकेवार यांनी वैद्यकीय तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. गॅस्ट्रो एन्टेरोलॉजीच्या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींबाबत डॉक्टरांना अद्ययावत करण्यासाठी त्यांची संस्था द्वि-मासिक क्लिनिकल बैठक आयोजित करते. हॉस्पिटलची स्थापना केल्यानंतर काही वर्षांतच डॉ. मुकेवार यांनी मिडास मेडिकल फाऊंडेशन (एमएमएफ) स्थापन केले. या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आणि रुग्णांना मोफत उपचार व औषधे पुरवण्यात येतात. डॉ. मुकेवार यांनी गॅस्ट्रो एन्टेरोलॉजी क्षेत्रातील अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये बीजभाषण केले आहे. आपल्या कारकिर्दीत ते अनेक कनिष्ठ गॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्टचे मार्गदर्शक राहिले आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असंख्य जीव वाचवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी प्रशिक्षित डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. शोना नाग- स्तन कर्करोगतज्ज्ञ, पुणे
स्तनांचा कॅन्सर पहिल्या टप्प्यात ओळखून त्याचा प्रतिबंध कसा करावा याची महिलांमध्ये जागृती करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्यांमध्ये डॉ. शोना नाग यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. स्तन कर्करोग तज्ज्ञ व शल्यचिकित्सक (ब्रेस्ट कॅन्सर ऑन्कॉलॉजिस्ट व सर्जन) म्हणून त्या पुण्यात कार्यरत आहेत. स्तन कॅन्सरवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित वैद्यकीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधनपर प्रबंधही प्रसिद्ध झाले आहेत. ज्याचा फायदा उपचारांमध्ये अधिक अचूकता येण्यामध्ये झाला आहे. त्या पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल्सच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाच्या संचालक आहेत. स्तन कर्करोगाच्या, तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या विविध पैलूंवर संशोधन केले. या क्षेत्राचा २७ वर्षांचा त्यांना अनुभव आहे. रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमधील स्तन कर्करोग व त्यावरील प्रगत संप्रेरक उपचार यावर ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी’ या नियतकालिकामध्ये त्यांचा प्रबंध प्रसिद्ध झाला. भारतीय कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये जेफिटिनिब या औषधाचा उपयोग होत असल्याचाही प्रबंध जर्नल ऑफ थोरॅसिस ऑन्कॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. लिपॅटिनिब या कॅन्सरविरोधी औषधाचा परिणाम व त्याची उपयुक्तता, तसेच ॲनेमियाग्रस्त कॅन्सरग्रस्तांमध्ये उपचारांच्या डोसचे योग्य प्रमाण यावरही प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे उपचारांमध्ये अधिक अचूकता येण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर स्तन कर्करोग, बीजांड कर्करोग, फुप्फुस कॅन्सर, मूत्रपिंड कॅन्सर, गुद्द्वाराचा कॅन्सर यावर त्यांनी मुख्य संशोधक म्हणून काम पाहिले आहे. सन २०१६ मध्ये पुण्यात पहिले ब्रेस्ट केअर युनिट त्यांनी सूरू केले, तसेच किमोथेरपीसाठी पूर्ण सुसज्ज डे-केअर सेंटरही स्थापन केले आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. ऋषिकेश ठाकरे- बालगोरतज्ज्ञ, औरंगाबाद
जन्मानंतर विविध गुंतागुंत परिस्थितीमुळे नवशात शिशूंचा जीव धोक्यात येतो. अशावेळी त्या शिशूच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबासाठी कठीण प्रसंग असतो. अशाच ५ हजारांवर शिशूंना गेल्या दोन दशकात आपल्या उपचारातून नवीन आयुष्य देण्याचे काम औरंगाबादेतील नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश ठाकरे यांनी केले आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. ठाकरे यांनी मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा भागात प्रथमच अत्याधुनिक ‘एनआयसीयू’ची स्थापना केली. संचालक आणि प्रमुख म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सर्वसमावेशक नवजात बालकांची काळजी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सेवा आणि फॉलोअप केअर प्रदान केले. वर्षाला जवळपास ३०० ते ४०० नवजात शिशू उपचारासाठी दाखल होतात. बाह्यरुग्ण विभागातही अनेक नवजात शिशूंवर उपचार करतात. डॉ. ठाकरे यांना शिकवण्याची आणि प्रशिक्षणाची आवड आहे. त्यांनी संसाधन व्यक्ती म्हणून काम केले आहे. अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. वैद्यकीय परिषदा आणि डॉक्टर, पदव्युत्तर, फेलो, परिचारिका आणि बालरोगतज्ज्ञांसाठी ज्ञानाचा प्रसार, जागरूकता, कौशल्य निर्माण आणि क्लिनिकल समस्या सोडवणे यामध्ये त्यांचा सहभाग आहे. डॉ. ठाकरे यांनी स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय सरकारी संस्थांशी संपर्क साधला आणि जिल्ह्यात नवजात शिशू सुरक्षा कार्यक्रम (ठररङ) आणि सुविधा आधारित नवजात बालकांची काळजी लागू करण्यात त्यांनी हातभार लावला. डॉ. ठाकरे विविध नवजात शिशू काळजी मॉड्यूल्ससाठी सामग्री निर्मिती, अभ्यासक्रम विकास आणि प्रसारामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विविध समित्यांमध्ये तज्ज्ञ आणि तांत्रिक सदस्य म्हणून काम केले आहे. सहा पुस्तकांचे ते संपादक आहेत.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा