लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: कृषी क्षेत्रात कुणी केलीय लक्षणीय कामगिरी? ही आहेत नामांकनं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 02:20 PM2023-04-13T14:20:08+5:302023-04-13T14:20:44+5:30
कृषी या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.
लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. कृषी या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.
वऱ्हाडाच्या मातीत घेतले ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन
बाळकृष्ण रामचवरे, आळंदा, बार्शीटाकळी, जि. अकोला
बाळकृष्ण रामचवरे हे रुस्तमाबाद (आळंदा) (ता. बार्शीटाकळी) येथील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित १२ एकर शेती आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेतीकडे वळले. पारंपरिक पिकातून उत्पादनाची शाश्वती व बाजारभावाच्या अडचणी पाहून त्यांनी शेतीत वेगळा प्रयोग केला. १.७५ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. या पिकाबाबत काहीच माहिती नसल्याने अडचणी आल्या. विदेशी फळ वऱ्हाडाच्या मातीत पिकणार की नाही, असे वाटत असताना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोपे खरेदीपासून लागवड, विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेतली. आपल्याकडे हे पीक बहरणार हेही त्यांना चांगले उमजले. त्यामुळे त्यांनी शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. गत पावसाळ्यात त्यांनी ड्रॅगन फ्रुटचा पहिला बहार घेतला. त्यातून दीड लाखापर्यंत उत्पन्न झाले.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा
ग्रीन हाऊसमध्ये शेती फुलविणारा शेतकरी
ज्ञानेश्वर बोडके, माण-हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे
ज्ञानेश्वर बोडके या माण-हिंजवडी (ता. मुळशी, पुणे) येथील इयत्ता दहावी पास असलेल्या सुशिक्षित तरुणाने जमीन विकण्यापेक्षा आधुनिक शेतीचा निर्णय घेतला. १० लाखांचे कर्ज घेऊन ग्रीन हाऊसमध्ये फुलांची शेती केली. मिळालेल्या उत्पन्नातून १४ महिन्यांत कर्ज फेडले. शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत अभिनव फार्मर्स क्लब या नावाचा शेतकरी गट स्थापन केला. या गटाने फुलानंतर ग्रीन हाऊस व पॉलिहाऊसमध्ये देशी व विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. हे उत्पादन आयटी क्षेत्रामुळे विकसित झाल्याने उच्चभ्रू सोसायटी, मॉल व पुणे-मुंबईच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक विक्री सुरू केली. त्यांनी फार्मर्स क्लब एकात्मिक व सेंद्रिय शेतीकडे वळवत महाराष्ट्रभर शेतकरी व ग्राहकांची साखळी उभी केली. या कामांची दखल केंद्राने घेतली आहे.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा
...आणि शेतीचा एक ब्रँड तयार झाला !
रामराव भोसले, कामती बु., मोहोळ, जि. सोलापूर
रामराव केरबा भोसले पाटील हे मोहोळ तालुक्यातील कामती बु. येथील द्राक्ष बागायतदार आहेत. सुमारे ३५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८७ मध्ये एक एकर द्राक्ष बागेची लागवड केली होती. ती टप्प्याटप्प्याने वाढवत नेत आज १५० एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग फुलवली आहे. भोसले यांनी त्यांच्या बागेत सोनाका आणि क्लोन २ या वाणांची द्राक्षे पिकविली आहेत. २००४ पर्यंत सर्व द्राक्षे मार्केटमध्ये विक्री करीत होते. मात्र, २००५ पासून बेदाणा निर्मिती सुरू केली. कुठल्याही परिस्थितीत गुणवत्तेमध्ये तडजोड न करता एकरी चार टन बेदाणा उत्पादन भोसले यांनी घेतले आहे. ते या प्रकारे एकूण ५०० टन बेदाणा तयार करतात. सांगली, कुपवाडा बेदाणा मार्केटमध्ये त्यांच्या आरकेबी नावाने ब्रँड तयार झाला आहे. हा ब्रँड परदेशात देखील प्रसिद्ध असून, राज्यासह देशभरात त्यांच्या कामाचे काैतुक हाेत आहे.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा
शेती नियोजनाचा मंत्र; आत्महत्यांचे रोखले सत्र
रवींद्र वैद्य, बेलघाट, हिंगणघाट, जि. वर्धा
रवींद्र वैद्य यांनी हिंगणघाट तालुक्यातील बेलघाट या गावात शेती ही आई आहे आणि आई ही मारणारी नाही तर जगविणारी आहे, असा निर्धार करून अल्प शेतीतही नवनवीन प्रयोग सुरू केले. एकरी २५ क्विंटल कपाशी आणि एकरी १२० क्विंटल हळद पिकवून शेती उत्पादनात विक्रम केला. शेती नियोजनाचा हा मंत्र जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील शेकडो शेतकऱ्यांना देऊन कित्येकांना आपण आत्महत्या करण्यापासून रोखले. त्यांच्या कार्याची दखल तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेऊन दिल्लीत सन्मान केला. तेलंगणा येथील शेतकऱ्यांना हळदीच्या उत्पादनासाठी मार्गदर्शक म्हणून रवींद्र वैद्य यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धीपासून दूर राहून खचून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात उभारी देण्याचे काम त्यांनी चालविले आहे.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा
जगभरात पोहोचलेला कृतिशील शेतकरी
विलास शिंदे, सह्याद्री फार्मस्, दिंडोरी, जि. नाशिक
विलास विष्णू शिंदे. शिक्षण एम. टेक. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मोहाडी, ता. दिंडोरीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक. विलास शिंदे यांना सलग १२ वर्षे शेतीशी निगडित प्रत्येक प्रयोगात अपयश येत होते. बायकोचे दागिने, स्वत:ची जमीन असे सगळे गहाण ठेवून त्यांनी लोकांची कर्जे फेडली. मात्र १२ वर्षांनंतरही ते जिद्द हरले नाहीत. आता ते दरवर्षी १८ हजार टन द्राक्ष युरोपात निर्यात करतात. ११० एकर परिसरावर त्यांनी ही किमया केली असून, टॉमेटो प्रोसेसिंग युनिटही त्यांच्याकडे आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर किसन कॅचअपचे ४० टक्के प्रोडक्शन त्यांच्याकडे होते. त्यांनी भाज्यांमध्ये भरपूर काम केले. २०० शेतकऱ्यांची ही कंपनी आहे. नुकतीच युरोपातून त्यांच्याकडे जवळपास तीनशे कोटींची गुंतवणूकही झाली. देशातल्या शेतीची ताकद बदलण्याचा विचार विलास शिंदे यांचा असून, त्या दिशेने त्यांनी राज्यभरात विविध प्रयोग सुरू केले.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा