लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : राज्यातील कर्तृत्वसूर्यांच्या कौतुक सोहळ्याने उजळला राजभवनातील दरबार हॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:35 IST2025-03-21T09:35:04+5:302025-03-21T09:35:26+5:30

पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा होत होती आणि दिग्गजांनी भरलेल्या सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट समुद्राच्या गाजेला टक्कर देत होता...

Lokmat Maharashtrian of the Year Award: The Durbar Hall of the Raj Bhavan lit up with a ceremony to appreciate the efficient persons of the state | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : राज्यातील कर्तृत्वसूर्यांच्या कौतुक सोहळ्याने उजळला राजभवनातील दरबार हॉल

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : राज्यातील कर्तृत्वसूर्यांच्या कौतुक सोहळ्याने उजळला राजभवनातील दरबार हॉल

मुंबई : राजभवनाच्या दरबार हॉलच्या पायाशी रुंजी घालणाऱ्या खळाळत्या सागराला आणि त्या अथांगतेत मिसळून जाण्यास आतूर सूर्यगोलास साक्षी ठेवत बुधवारी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने सूर्यासारखे तळपणाऱ्या मान्यवरांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते २०२५ सालाचे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा होत होती आणि दिग्गजांनी भरलेल्या सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट समुद्राच्या गाजेला टक्कर देत होता.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्कील शैलीत प्रश्न विचारून केलेली गोलंदाजी आणि त्यावर विक्रमवीर क्रिकेटपटूसारखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली बॅटिंग या मुलाखतीने श्रोत्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी आपल्या परखड व स्पष्ट विचारसरणीचे दर्शन ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादक संचालक ऋषी दर्डा यांनी घेतलेल्या थेट व लक्ष्यवेधी मुलाखतीत घडवले. अभिनेते कार्तिक आर्यन यांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू होती तर बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे स्वामी ब्रह्मविहारी दास यांचे विचार श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरले. 

लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. लोकमत मीडिया समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. मोस्ट पॉवरफूल पॉलिटिशियन पुरस्काराने गौरवित झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’च्या या पुरस्कारांचे कौतुक केले. ज्युरी सदस्य राहिलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’चे पुरस्कार देताना किती बारकाईने छाननी केली जाते, याची सविस्तर माहिती दिली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय भूमिकेचे कौतुक करतानाच माध्यमांनी विकासाच्या मुद्द्यावर सरकारची पाठराखण करण्याचा आग्रह धरला.

क्षणचित्रे
पुरस्कार सोहळ्याला उद्योग, राजकारण, प्रशासन, शिक्षण, अभिनय आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची
उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अत्यंत नीटनेटके सूत्रसंचालन अभिनेता पुष्कर श्रोत्री
यांनी केले.
कन्या आदिती तटकरे यांचे कौतुक पाहण्याकरिता वडील सुनील तटकरे कुटुंबासह हजर होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, बँकर व गायिका अमृता फडणवीस सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतल्याने महाराष्ट्राला नवा मुलाखतकार मिळाल्याचा उल्लेख अनेकांनी केला.

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year Award: The Durbar Hall of the Raj Bhavan lit up with a ceremony to appreciate the efficient persons of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.