LMOTY 2022: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नाना पाटेकर काय प्रश्न विचारणार? आज महाराष्ट्राची महामुलाखत रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:58 AM2022-10-11T10:58:36+5:302022-10-11T10:59:50+5:30
‘लोकमत’च्या व्यासपीठावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार सोहळा आज (मंगळवार, ११ ऑक्टोबर) मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे रंगणार आहे. कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत हे या गौरव सोहळ्यातील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. विख्यात अभिनेते नाना पाटेकर हे या दोन्ही दिग्गज नेत्यांची मुलाखत घेणार आहेत. या दोघांनाही नाना पाटेकर कोणती गुगली
टाकणार आणि हे दोन्ही कसलेले नेते त्याचा कसा मुकाबला करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले नसेल तरच नवल.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कियारा अडवाणी, लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांच्याशी होणारा विशेष संवाददेखील कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहे. तर, या पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राज्याच्या विविध भागांतील आमदार, खासदार, अनेक उच्चपदस्थ सनदी अधिकारी, चित्रपट, नाटक, समाजकारण, अर्थकारण, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अशी विविध क्षेत्रांतील दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे.
अनेक वर्षे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याची अनेक क्षेत्रांतील मान्यवर कायम वाट पाहत असतात. लोकसेवा - समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन - आयएएस प्रॉमिसिंग, आयपीएस प्रॉमिसिंग, सीएसआर, कृषी आणि राजकारण या क्षेत्रांत उत्तम कार्य करणाऱ्यांचे नॉमिनेशन केले जाते. त्यासाठी मान्यवर ज्युरी आणि जगभरातील ‘लोकमत’चे वाचक ऑनलाइन पद्धतीने मतदान करतात. त्यातून विजेत्यांची निवड केली जाते. या समारंभाच्या मोफत प्रवेशिका ‘बुक माय शो’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच सारस्वत बँक या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून बीकेटी, एमआयडीसी आणि सिडको कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.