LMOTY 2019: मराठा सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये जास्त स्क्रिन्स द्या; सुबोध भावेची मल्टिप्लेक्स चालकांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:41 PM2019-02-20T20:41:18+5:302019-02-21T16:50:29+5:30
...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर चित्रपटातील अभिनयासाठी सुबोधचा सन्मान
मुंबई: मराठा चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रिन्स द्या, अशी मागणी अभिनेता सुबोध भावेनं लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात केली. ...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटातील भूमिकेसाठी सुबोध भावेचा लोकमतनं सन्मान केला. त्यावेळी मल्टिप्लेक्स मूव्हीटाईमचे सीईओ उपस्थित होते. त्यांच्यासमोर सुबोध भावेनं मराठी चित्रपटाला जास्तीत जास्त वेळ मल्टिप्लेक्समध्ये मिळावा, अशी मागणी केली.
मराठी चित्रपटाला अनेकदा प्राईम टाईम मिळत नाही. त्यासाठी मराठी चित्रपटाला बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर सुबोध भावेनं मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रिन्स मिळाव्यात असं मत व्यक्त केलं. 'मूव्हीटाईमचे सीईओ इथे असल्याचं मला कळलं. त्यामुळे मी मराठी चित्रपटसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना सांगू इच्छितो की, मराठी चित्रपटाला जास्त वेळ द्या. त्यामुळे चित्रपट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, मराठी प्रेक्षक चित्रपटाचा भुकलेला आहे,' असं सुबोध म्हणाला.
लोकमान्य टिळक, बालगंधर्व यासारख्या व्यक्तिरेखा समर्थपणे मोठ्या पडद्यावर साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुबोध भावे यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी ठरला. '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील डॉ. घाणेकरांच्या जबरदस्त भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्याला गौरवण्यात आलं.