LMOTY 2019: हुबेहूब डॉ. काशिनाथ घाणेकर घडवणारे विक्रम गायकवाड यांचा 'लोकमत'कडून सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:39 PM2019-02-20T18:39:50+5:302019-02-20T18:50:42+5:30
अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले.
मुंबई - अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. भूमिकेला अस्सलतेचा साज चढवणाऱ्या गायकवाड यांची कारकीर्द एखाद्या चित्रपटाला साजेसी अशीच आहे. पडद्यामागील या अवलिया कलाकाराचे काम प्रेक्षकांना आवर्जून भावते. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चित्रपट कोणताही असो, विक्रम गायकवाड त्यांच्या रंगभूषेने त्यात जीव ओततात. अगदी काही महिन्यांपूर्वी आलेल्या ''... आणि काशीनाथ घाणेकर'' या चित्रपटातील त्यांच्या कामाची दखल संपूर्ण चित्रपटसृष्टीने घेतली. विशेषतः साठीच्या आणि सत्तरीच्या दशकातले कलाकार आणि त्यांचे पडद्यावरचे दिसणे त्यांनी जणू प्रत्यक्षात आणले. डॉ घाणेकर भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावे यांना केलेला कायापालट प्रति घाणेकर वाटावा इतका जवळ जाणारा होता. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी विक्रम गायकवाड यांनी रंगभूषा केली आहे. हिंदी, इंग्रजीसह त्यांनी काही गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी रंगभूषा केली. त्यात बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली आणि भाई :व्यक्ती की वल्ली यांचा समावेश आहे.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.