LMOTY 2019: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं 'हाऊ इज द जोश?'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 09:23 PM2019-02-20T21:23:59+5:302019-02-21T16:47:30+5:30
युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर
मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर उद्धव यांना उरी स्टाईलमध्ये उपस्थितांना हाऊ इज द जोश असा प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित होते. यावेळी मंचावर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावर बोलताना मंचावर आज घराणेशाहीचे शिलेदार उपस्थित असल्याचं उद्धव म्हणाले.
'आज इथे बरीच घराणी उपस्थित आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी इथं आहेत. नानासाहेबांकडून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. तो वारसा ते अतिशय उत्तमपणे पुढे नेत आहेत. धर्माधिकारी कुटुंबानं ओसाड माळरानात जीव ओतला. लाखो घरांचं घरपण जपण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांचं कार्य पाहिल्यावर आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. आम्ही मतांसाठी घरोघरी जातो. मात्र ते सामाजिक भावनेतून घरोघरी जातात. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून आज मला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नाही, तर आशीर्वाद आहे, असं मी मानतो,' अशा भावना उद्धव यांनी यावेळी व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरेंनी यावेळी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरदेखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. गेल्या आठवड्यात झालेल्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचं दु:ख आपल्या सर्वांच्या मनात आहे. आता या हल्ल्याचा कशा प्रकारे बदला घेतला जातो, याची वाट देशवासीय पाहत आहेत. पाकिस्तान हा सुधारणारा नाही. त्यामुळे पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. एनएससीआय डोम येथे आयोजित लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पॉवर आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी व्यक्त केली.