‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ सोहळ्याला ‘ग्लोबल’ पंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:39 PM2019-02-21T17:39:18+5:302019-02-21T19:32:10+5:30
इस्त्रायलचे नोहा मस्सील आणि ‘मायबोली’ परिवाराला विशेष पुरस्कार . ‘मायबोली परिवार’ यवर्षीच्या ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन पुरस्कारा’चा मानकरी. जगभरातल्या 13 देशांमधून 25 महाराष्ट्र मंडळांचा सहभाग
मराठी मुळे असलेल्या ‘बेने इस्त्रायली’ परिवाराने दूर राहूनही आपल्या मूळ भूमीशी नाते घट्ट ठेवले आहे. गेली कित्येक वर्षे जेरुसलेम आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये परस्पर स्नेहाचे पूल उभारून त्यावरची वर्दळ अखंड राहावी म्हणून प्रयत्न करणारे नोहा मस्सील आणि त्यांचा ‘मायबोली परिवार’ यवर्षीच्या ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन पुरस्कारा’चा मानकरी ठरला.
जेरुसलेमहून प्रकाशित होणारे ‘मायबोली’ हे मराठी त्रैमासिक यंदा पंचवीस वर्षाचे झाले. इस्त्रायलहून प्रसिध्द होणारे हे त्रैमासिक भारतासह युरोप आणि अमेरिकेतही पोचले आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू न शकलेले नोहा मस्सील आणि ‘मायबोली परिवारा’च्या वतीने हा सन्मान मायबोलीच्या सहायक संपादक एलिझाबेथ डेव्हीड यांनी स्वीकारला.
***
महत्त्वाकांक्षा आणि संधींच्या शोधात माणसे मातृभूमीचा किनारा सोडून परदेशी जातात, तिथे वास्तव्य करतात, कर्तृत्वाचे पंख विस्तारतात आणि परक्या मातीत आपली मुळे घट्ट रुजवतात, तरीही मायदेशाची आठवण त्यांच्या हरेक श्वासात असते. याच अखंड सोबतीचे प्रतीक म्हणजे यावर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ सोहळ्याला लाभलेली जगभरच्या मराठी माणसांची साथ!
एकूण चौदा देशांतल्या पंचवीस महाराष्ट्र मंडळांनी यावर्षीच्या सोहळ्यात सक्रीय सहभाग घेतला. यावर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाईन मतदानातही परदेशी वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला.
उत्तर अमेरिकेतली एकूण अकरा महाराष्ट्र मंडळे या कार्यक्रमासाठी सहयोगी म्हणून सहभागी झाली होती.
त्यामध्ये मराठी मंडळ- लॉस एंजेलीस, महाराष्ट्र मंडळ- शिकागो, सिअॅटल महाराष्ट्र मंडळ, डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ, कोलोरॅडो मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ -क्लिव्हलॅण्ड ओहायो, अॅन आर्बर मराठी मंडळ, ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ, शार्लट मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ - बे एरिया आणि बफेलो मराठी मित्र परिवाराचा समावेश होता.
युरोपमधून एकूण आठ महाराष्ट्र मंडळांनी यावर्षीच्या सोहळ्यात सहभाग घेतला. त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ- लंडन, स्लाव्ह मित्र मंडळ-युनायटेड किंगडम, इल्फर्ड मित्रमंडळ- लंडन, महाराष्ट्र मंडळ- फ्रान्स, महाराष्ट्र मंडळ-म्युनिक, महाराष्ट्र मंडळ-नेदरलॅण्ड्स, बेल्जियम मराठी मंडळ-ब्रसेल्स, महाराष्ट्र मंडळ - डेन्मार्क यांचा सहभाग होता.
शेजारी चीनमधले शांघाय मराठी मंडळ, जपानमधले तोक्यो मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ - मलेशिया, मराठी मंडळ बॅँकॉक-थायलंड, महाराष्ट्र मंडळ- मस्कत आणि इस्त्रायलचा मायबोली परिवार यांनीही यावर्षीच्या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला.
***