LMOTY 2019: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत पॉवर आयकॉन पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:11 PM2019-02-20T20:11:29+5:302019-02-20T20:50:49+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षाला योग्य दिशा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो.
शिवसेना पक्षप्रमुखपदाची धुरा सांभाळताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे कुशलपणे नेतृत्व केले आहे. तसेच कठीण काळामध्ये पक्षाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. एकीकडे सत्तेत असतानाच शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्वावर सरकारला धारेवर धरण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. नुकत्याच झालेल्या शिवसेना आणि भाजपा युतीच्यावेळीही त्यांनी जनतेच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य मिळेल, अशी भूमिका घेतली होती. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना यावर्षीचा लोकमत पॉवर आयकॉन पुरस्कार देण्यात आला.
हे होते परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर हे परीक्षक मंडळ होतं.