LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:34 AM2019-02-21T00:34:41+5:302019-02-21T15:59:25+5:30
विकी कौशलचा पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान
मुंबई: उरी चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या विकी कौशलचा लोकमतकडून गौरव करण्यात आला. पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर या पुरस्कारानं विकीचा सन्मान करण्यात आला. यावेळी विकी लष्कराबद्दल भरभरुन आला. लष्कराचा गणवेश घातल्यानंतर पाठीचा कणा आपोआप ताठ होतो, अशी भावना त्यानं व्यक्त केली. यावेळी विकानं पुरस्कारासाठी लोकमतचे आभारही मानले.
उरी चित्रपटासाठी माझी निवड झाली, त्यावेळी लष्करी कवायत करावी लागेल, असं मला वाटलं होतं. सहा-सात महिने मी कवायतदेखील केली. भारतीय लष्कराचा गणवेश घातल्यावर मला जबाबदारीची जाणीव झाली, अशी गणवेशाची जादू विकीनं उपस्थितांना सांगितली. लष्कराचा गणवेश घातल्यावर पाठीचा कणा आपोआप ताठ झाला, या विकीच्या वाक्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला.
उरीच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा विकीनं यावेळी सांगितला. 'पटियाला कॅम्प रेजिमेंटमध्ये चित्रीकरण होतं. तेव्हा हाथी रेजिमेंटचे जवान होते. पहाटे पाच वाजता उठायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळी ड्रील होतं. मला पळायचं होतं. त्यावेळी मी एका 26 वर्षांच्या जवानाशी बोलतो होतो. बोलता बोलता तो जवान म्हणाला, आम्हाला माहीत नाही की कधी उद्याच्या वृत्तपत्रामध्ये आमचा फोटो छापून येईल. विशेष म्हणजे हे वाक्य त्या जवानानं खूप गर्वानं उच्चारलं,' अशी आठवण विकीनं सांगताच उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर विकीनं उपस्थितांशी मराठीत संवाद साधला. 'मराठी माझी मातृभाषा नाही. पण दहावीपर्यंत मराठी शिकलो आहे. त्यामुळे चुकभूल माफ असावी. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असं विकी कौशलनं सांगितलं. यावेळी त्यानं पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर देशात निर्माण झालेलं संतापाचं वातावरण यावरही भाष्य केलं. 'त्या हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. तेव्हापासून आपल्याच घरातलं कुणीतरी सोडून गेल्यासारखं वाटतं आहे. मनात दु:खासोबत आक्रोश आहे. लोक प्रचंड संतापले आहेत. त्यांना धडा शिकवा, अशा भावना व्यक्त होत आहेत. असं करा, तसं करा म्हणणारे खूप आहेत. मात्र घरी बसून हे बोलणं फार सोपं आहे. लष्करातील मंडळी त्यांचे निर्णय घेत आहेत. या परिस्थितीत एकजूट दाखवण्याची गरज आहे,' असं विकी म्हणाला.