लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर, नाट्यकलावंतांचा अनोखा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 04:00 PM2018-03-23T16:00:47+5:302018-03-23T18:29:01+5:30
नाट्यक्षेत्र (स्त्री) या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई- अशीही श्यामची आई, युगान्त, अनन्या, ९ कोटी ५७ लाख, संगीत देवबाभळी अशा एकाहून एक सरस नाटकांनी मराठी नाट्यरसिकांना उत्तम नाट्यानुभव दिला आहे. या नाटकांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींना सन्मानित करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. नाट्यक्षेत्र (स्त्री) या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
अतिशा नाईक (अशीही श्यामची आई)
अभिनयाचा कस लागेल, अशा भूमिका अचानक काही कलावंतांच्या वाट्याला येतात. अतिशा नाईक यांची ‘अशीही श्यामची आई’ या नाटकातील आई हीसुद्धा त्याच पठडीत बसणारी भूमिका म्हणावी लागेल. आई म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र आपसूक उभे राहते, त्याला छेद देणारी ही भूमिका त्यांनी ताकदीने वठविली आहे. अचानक फीट येणारी, स्वत:च्या मुलाला शिव्या-शाप देणारी, लहान मुलांसारखे वर्तन करणारी अशी ही आई त्यांनी यात उभी केली आहे, पण यामागचे कारण वेगळे आहे आणि ते म्हणजे तिला असलेला आजार! शारीरिक अभिनयातून असंबद्ध वागणे-बोलणे यांचे उत्तम प्रकटीकरण त्यांनी या भूमिकेत केले आहे. मानसिक व शारीरिक पातळीवरचा तोल उत्तम सांभाळणारी म्हणून, ही भूमिका रसिकांना नकळत बांधून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.
अतिशा नाईक यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
पूर्वा पवार (युगान्त)
नाट्यत्रयीच्या शेवटच्या भागात म्हणजे, ‘युगान्त’मध्ये एकुलते एक स्त्री पात्र म्हणून पूर्वा पवार यांची भूमिका लक्षात राहते. वास्तविक, यात त्यांच्या भूमिकेवर इतर व्यक्तिरेखांच्या तुलनेने कमी प्रकाशझोत असला, तरी त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांत त्यांनी गहिरे रंग भरले आहेत. हाती मोजके संवाद असतानाही, पूर्वा पवार यांनी ही व्यक्तिरेखा उभी करताना, त्यांच्या ठोस रंगमंचीय अस्तित्वाने ही भूमिका योग्यरीत्या पेलली आहे.
पूर्वा पवार यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
ऋतुजा बागवे (अनन्या)
कलावंताचा चांगल्या भूमिकांचा शोध कधी संपत नाही. एखादी ‘माइलस्टोन’ अशी भूमिका साकारायला मिळावी, असे त्याचे स्वप्न असते. काहींच्या बाबतीत हे स्वप्न सत्यात उतरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ऋतुजा बागवे हिची ‘अनन्या’ या नाटकातील भूमिका आहे. नाटकात अतिशय महत्त्वाकांक्षी दाखविलेल्या मुलीच्या जीवनात अचानक एक वादळ येते आणि तिचे भवितव्य पणाला लागते. आधी वैफल्यग्रस्त झालेल्या या मुलीच्या मनात एका क्षणी जिद्दीची ज्योत प्रज्वलित होते आणि तिच्यात होणारा हा सगळा बदल ऋतुजा बागवे हिने मोठ्या कसरतीने नाटकात उभा केला आहे. या भूमिकेसाठी तिने काही दिवस विशेष प्रशिक्षणही घेतले आणि त्यातून ही ‘अनन्या’ रंगभूमीवर साकार झाली आहे.
ऋतूजा बागवे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
सुलेखा तळवलकर (९ कोटी ५७ लाख)
विनोदी बाजाच्या नाटकात कलावंताकडून काय अपेक्षित आहे, हे त्या कलाकाराला स्पष्ट माहीत असणे आवश्यक असते. अशा प्रकारची एखादी भूमिका साकारताना जराही तोल गेला, तरी त्यातल्या संवादांचा अर्थ बदलू शकतो. सुलेखा तळवलकर यांनी याची योग्य ती जाण ठेवत, ‘९ कोटी ५७ लाख’ या नाटकातून त्याची प्रचिती आणून दिली आहे. विनोदी ढंगाची भूमिका रंगविताना जी काही कसरत करावी लागते, ती सुलेखा तळवलकर यांनी या नाटकात आत्मविश्वासाने केलेली दिसते. विनोदी प्रकारची भूमिका उभी करताना अचूक टायमिंग साधण्याला पर्याय नसतो. सुलेखा तळवलकर यांनी या नाटकातील भूमिकेत त्याचा योग्य वापर करत, ही भूमिका खुलविली आहे. या भूमिकेला अपेक्षित असलेला गोंधळ घालण्याचे काम त्यांनी या नाटकात सुरेख केले आहे.
सुलेखा तळवलकर यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
शुभांगी सदावर्ते/मानसी जोशी (संगीत देवबाभळी)
अभिनयातील देखणेपण काय असते, हे ‘संगीत देवबाभळी’ या नाटकात मांडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या आहेत. संत तुकारामांची आवली म्हणून शुभांगी सदावर्ते आणि विठ्ठलाची रखुमाई म्हणून मानसी जोशी यांनी या नाटकात अभिनयाचे मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवले आहे. प्रचंड आत्मविश्वास, गद्यासह गाण्यांवरही असलेली हुकूमत आणि व्यक्तिरेखा खुलविण्याची हातोटी या दोघींकडे मुळातच असल्याचे त्यांनी या नाटकातून स्पष्ट केले आहे. या दोघींच्या संवादांची या नाटकातील जुगलबंदी म्हणजे खराखुरा नाट्यानुभव आहे.
शुभांग सदावर्ते आणि मानसी जोशी यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php