लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर, नाट्यक्षेत्रातील कलाकारांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 03:39 PM2018-03-23T15:39:27+5:302018-03-23T15:39:27+5:30
नाट्यक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई- लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला ना्टयक्षेत्रातील कलाकारांचा गौरव करण्याची संधी आपल्याला संधी मिळणार आहे. आपल्या अभिनय गुणांनी आणि दिग्दर्शनातून रसिक प्रेक्षकांना संवेदनशील नाटकांची भेट देणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याची ही संधी असेल. नाट्यक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
अतुल परचुरे (आम्ही आणि आमचे बाप)
अतुल परचुरे यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या असल्या, तरी त्यांनी साकारलेली पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा अखिल महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. या भूमिकेतून त्यांना बहुधा दूर व्हावे, पसंत नसावे. कारण ‘आम्ही आणि आमचे बाप’ या नाटकातही हा धागा सामायिक आहे. पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी मराठी भाषेला जे काही देणे दिले आहे, त्याची आठवण करून देण्याचे काम अतुल परचुरे यांनी या नाटकातील भूमिकेने केले आहे. अभिनयासह अभिवाचनाचा उत्तम आविष्कार यांनी या भूमिकेत घडविला आहे. अचूक संवादफेक, उत्कृष्ट टायमिंग आणि आश्वासक देहबोली यांचा उत्तम मिलाफ ही त्यांच्या या भूमिकेची खासियत ठरली आहे.
अतुल परचुरे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
भरत जाधव (वेलकम जिंदगी)
विनोदी अभिनेता म्हणून एकदा का ओळख ठसली की, भल्याभल्यांना त्यातून बाहेर पडणे कठीण जाते. भरत जाधव या अवलिया अभिनेत्याने तर विनोद आणि त्यांच्या भूमिका यांचे समीकरणच निर्माण केले. मात्र, विविध भूमिकांतून दिसणारा अभिनेता, वास्तवातही तसाच असेल, असे काही नाही. भरत जाधव यांनी ‘वेलकम जिंदगी’ या नाटकातून त्याची प्रचिती आणून दिली आहे. एखादा विनोदी नट, गंभीर भूमिकाही किती ताकदीने करू शकतो, याचे उदाहरण म्हणून त्यांच्या या नाटकातील भूमिकेकडे पाहता येते. त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या ‘अधांतर’ या नाटकातून गंभीर बाजाच्या भूमिकेत दिसलेल्या भरत जाधव यांची, ‘वेलकम जिंदगी’ या नाटकातील भूमिकाही तितक्याच कमालीची आहे. ७५ वर्षे वयोमान असलेल्या व्यक्तिरेखेचे रेखाटन त्यांनी मोठ्या ताकदीने यात केले आहे.
भरत जाधव यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php
चंद्रकांत कुलकर्णी (ट्रायॉलॉजी)
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ या तीन नाटकांना एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्रयोग चंद्रकांत कुलकर्णी यांनी तयार केला आहे. मध्यंतरासह आठ तासांचे हे नाटक, २५ कलावंत आणि चार मध्यांतरासह सादर होते, शिवाय याच नाटकांचे वेगवेगळे तीन प्रयोगही केले जात आहेत. अशा प्रकारची ट्रायॉलॉजी ही महाराष्ट्रातच नाही, तर देशात पहिल्यांदा झाली आहे. संहितेच्या पानांत दडलेल्या याच नाट्यत्रयीला रंगभूमीवर सादर करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारे दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी! या तिन्ही नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रात करीत ही नाट्यत्रयी त्यांनी नाट्यरसिकांपर्यंत पोहोचविली. या नाट्यत्रयीचे सलग तीन प्रयोग करण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आणि नाट्यरसिकांच्या पाठबळावर ते पेलूनही दाखविले. सलग ९ तास नाट्यगृहात रसिक बसतील का, हा प्रश्न मायबाप रसिकांनीच सोडविला आणि या नाट्यत्रयीचे सलग प्रयोगही हाउसफुल्ल झाले. दिग्दर्शकाचे कसब, कलावंतांची चोख निवड, यामुळे ही नाट्यत्रयी लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. याचे श्रेय या नाटकांच्या चमूला तर आहेच. मात्र, ज्याप्रमाणे दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी यांनी ही सगळी टीम बांधली आहे, त्याला तोड नाही. मराठीतील हा अनोखा प्रयोग आहे.
चंद्रकांत कुलकर्णी यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
मकरंद अनासपुरे (उलटसुलट)
नाटकातील भूमिका आणि प्रत्यक्ष आयुष्य यांची सांगड घालणे कठीण गोष्ट आहे, पण काही कलावंत हा योग उत्तम पद्धतीने जुळवून आणतात. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बहुमोल असे कार्य करीत आहेत. ‘उलटसुलट’ या नाटकातही त्यांनी याच बाजाची भूमिका साकारत, त्यांच्या प्रत्यक्षातल्या सामाजिक कार्याला रंगभूमीवरून जोड दिली आहे. एखाद्या कलाकृतीतून समाजाला बरेच काही सांगता येते, याची अचूक जाणीव ठेवत, मकरंद अनासपुरे यांनी या भूमिकेचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. एक नट म्हणून विनोदी शिक्का बसलेल्या मकरंद अनासपुरे यांनी या भूमिकेतून अतिशय संवेदनशील आणि गंभीर भूमिका साकारत, त्यांच्यावरील विनोदी नटाचा छाप पुसायला भाग पाडले आहे.
मकरंद अनासपुरे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
संजय मोने (९ कोटी ५७ लाख)
अभिनेते संजय मोने हे अभिनयाबरोबरच चांगले लेखक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. ‘९ कोटी ५७ लाख’ या नाटकात त्यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम केले आहे. नर्मविनोदी बाजाची भूमिका त्यांनी यात रंगविली आहे आणि नाटकाची एकूणच पठडी लक्षात घेता, त्यांनी ही भूमिका त्यांच्या खास पद्धतीने साकारली आहे. मात्र, यात अभिनयापेक्षा त्यांची लेखनातली कामगिरी अधिक उजवी आहे. या विनोदी नाटकात एकावर एक कडी करणारे काही प्रसंग आहेत आणि ही भट्टी त्यांनी चांगली जुळवून आणली आहे. नावांचा गोंधळ असो किंवा नात्यांचा, त्यांनी याची चांगली सांगड घातली आहे. तिरकस पद्धतीने विनोद बाहेर काढण्याचे काम त्यांनी यात केले असून, त्यांच्या विनोदबुद्धीचे चांगले उदाहरण या नाटकातून दिसून येते.
संजय मोने यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php