लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुशल नेतृत्त्वगुणांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 05:21 PM2018-03-23T17:21:48+5:302018-03-23T18:14:32+5:30
गेली अनेक दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या नेत्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून सन्मानित करण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मतदारसंघात विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. गेली अनेक दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या नेत्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून सन्मानित करण्याची संधी मिळणार आहे. राजकीय क्षेत्रातील या विभागातील नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
चंद्रकांत (दादा) पाटील, सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री
गेल्या ४१ वर्षांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत. मुंबईतील कापड गिरणीतील चहा किटलीवाल्याचा मुलगा ते राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री अशी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावी, अशीच चंद्रकांतदादा पाटील यांची कारकीर्द आहे. चंद्रकांतदादा यांच्याकडे सध्या मंत्रिमंडळातील दोन नंबरचे स्थान, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखी दोन महत्त्वाची खाती आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांचे वडील बच्चू पाटील मूळचे शेतकरी. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळ त्यांचे खानापूर नावाचे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव, परंतु गावात पोट भरत नाही, म्हणून ते मुंबईत आले. मफतलाल नंबर २ या मिलमध्ये ते नोकरीस होते. मिलच्या कँटीनमध्ये किटलीबॉय अशी त्यांची नोकरी होती. चंद्रकांतदादा पाटील यांचा जन्म, बालपण व शिक्षणही मुंबईतच झाले. त्या वेळी रे रोड हार्बर स्टेशन परिसरात ते राहात होते. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले. व्हीटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून ते कॉमर्स शाखेचे पदवीधर होऊन बाहेर पडले. कॉलेजला असतानाच, त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी संघटनेसाठी पूर्ण वेळ वाहून घेण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे १९८० ते ९३ असे तेरा वर्षे ते पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून फिरत होते. त्यांच्याकडे जळगाव, धुळे, नाशिक, विदर्भ व नंतरच्या टप्प्यात गुजरात व गोवा राज्यांत काम करण्याची जबाबदारी होती. त्याच वेळी त्यांची नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी ओळख झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते १९९० ते ९३ या काळात अखिल भारतीय सरचिटणीस होते. हे काम केल्यानंतर ते मूळ गावी खानापूरला परतले व दोन वर्षे शेती केली. पुढे १९९५ च्या सुमारास टेलिमॅट्रिक्स नावाच्या संगणक कंपनीचे संचालक झाल्यावर ते पुन्हा कोल्हापुरात स्थायिक झाले. चंद्रकांतदादा यांच्या राजकारणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे. २०१४ ला झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. विधान परिषदेत ते पक्षाचे प्रतोद होते. शिवाजी व सोलापूर विद्यापीठांच्या सिनेटवर ते आहेत. मितभाषी, कार्यकर्त्याला सन्मान देणारे व विकासाचा स्वत:चा असा एक दृष्टीकोन असलेले नेते अशी पाटील यांची ओळख आहे. २०१४ मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून चंद्रकांतदादा यांची निवड झाली. राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेली सहकार पणन व वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. सहकार खात्याचा माध्यमातून सहकार शुद्धिकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा त्यांनी केली. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील महसूल हे खाते चंद्रकांतदादा यांच्याकडे आले. स्वच्छ चारित्र्य व सामोपचाराने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच पक्ष व राजकारणात कुठेही अडचण निर्माण झाली, तर चंद्रकांतदादांवर संकटमोचकाची जबाबदारी येते. ती जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतात.
चंद्रकांत दादा पाटील यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते (विधान परिषद)
बीड जिल्ह्यातील मुंडे घराण्याच्या रक्तातच नेतृत्व आणि राजकारणाचे बीज आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे ‘लोकनेते’ घरात असताना, धनंजय मुंडे राजकारणापासून दूर राहणे शक्यच नव्हते. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड जिल्ह्यात तरुणांचे संघटन करत, भाजपामध्ये तरुणांना सक्रिय करण्यासाठी ते कार्यरत झाले. गोपीनाथरावांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत असतानाच, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडणूक लढविली. पुढे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. जिल्हा परिषद, डी.सी.सी. बँक, वैद्यनाथ बँक, जगमित्र सूत गिरणी, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली. २०१२ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्याशी राजकीय मतभेद झाल्याने, त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी ते विधान परिषदेचे सदस्य होते, पण सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा विधानपरिषदेत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून सध्या ते राजकारणात सक्रीय आहेत. स्व. मुंडे यांच्यासोबत गोदा परिक्रमा, शेतकरी संघर्ष अभियानात त्यांचा हिरीरीने सहभाग राहिलेला आहे. अभ्यासपूर्ण आणि तडाखेबाज भाषणासाठी त्यांची ओळख आहे. एक आक्रमक राजकारणी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. परळी मतदार संघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांनी २०१४ची विधान सभा निवडणूक लढविली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी परळी मतदार संघात पंकजा यांचा पराभव करत, एकहाती मिळविलेल्या सत्तेमुळेही ते चर्चेत राहिले. विधानपरिषदेतील एक फर्डे वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, महापुरुषांचे स्मारक आदी विषयांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
धनंजय मुंडे यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
एकनाथ शिंदे, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे यांनी ९०च्या दशकात शिवसैनिक म्हणून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. एक सामान्य शिवसैनिक ते आज राज्य मंत्रिमंडळातील एक प्रभावशाली कॅबिनेटमंत्री अशी थक्क करणारी वाटचाल केली. राजकारणात केवळ घराणेशाहीच चालते, या समीकरणाला छेद देत, एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वगुणाच्या जोरावर पक्षनेतृत्वाने वेळोवेळी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवला. त्यामुळेच आनंद दिघे यांच्या अकाली निधनानंतर ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी शिंदे यांनी रात्रीचा दिवस करून भरून काढली. अलीकडेच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये, राज्यभरात भारतीय जनता पक्षाने झंझावाती यश मिळविले असताना, एकनाथ शिंदे यांनी ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखला. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता प्राप्त झाली. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदासारखे महत्त्वाचे पद देऊन, त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा गौरव केला. विरोधी पक्षनेते म्हणून मिळालेल्या जेमतेम महिनाभराच्या काळात त्यांनी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या दुरवस्थेवरून सरकारला सळो की पळो करून सोडले. या महिन्याभराच्या काळात त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. दुष्काळग्रस्त शेतकºयांशी त्यांचे आतड्याचे नाते निर्माण झाले. म्हणूनच मे महिन्यात दुष्काळाला कंटाळून, आपले घरदार सोडून रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या किमान ५०० दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी, त्यांनी ठाण्यात महिनाभर दुष्काळग्रस्त छावणी सुरू करून त्यांचा सांभाळ केला, त्यांना रोजगार मिळवून दिला. कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून, एमएमआरडीएला पुन्हा आपल्या पायावर यशस्वीरीत्या उभे केले आहे. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग त्यांच्या नेतृत्वाखाली आकार घेत आहे. शेतकºयांना या प्रकल्पात भागीदार करून घेतले जाणार असून, त्यांना या योजनेचे फायदे समजावून सांगून, त्यांना विश्वासात घेऊन, या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात एकनाथ शिंदे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आगामी काळात ठाणे जिल्ह्यासाठी स्वत:च्या हक्काचे धरण बांधण्याचा निर्धार पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी ठाणे जिल्ह्याची परिस्थिती आहे. मुंबईला मुबलक पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत, पण त्यातून ठाण्यालाच पाणी मिळत नाही. त्यामुळेच पालकमंत्री होताच, ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण विकसित करण्याची योजना त्यांनी हाती घेतली असून, येणाºया काळात ठाणे जिल्ह्याला पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनविण्याचा त्यांचा निर्धार आहे.
एकनाथ शिंदे यांना मत देण्यासाठी -http://lmoty.lokmat.com/vote.php
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सहकार चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. शिक्षण, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांचा दांडगा अभ्यास आणि अनुभव असलेले विखे-पाटील हे राज्यातील एक धुरंधर राजकारणी असून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ते पाचव्यांदा निवडून आले आहेत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे आणि शिक्षण महर्षी बाळासाहेब विखे यांच्याकडून त्यांना सार्वजनिक कार्याचे बाळकडू मिळाले. लोणीसारख्या लहानशा खेडेगावात सहकार आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांचे जाळे विणले. त्यातून लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना विखे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी होती. कृषीमंत्री म्हणून त्यांनी त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले. कृषी विद्यापीठांमधील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद घडवून आणला. कृषी मेळावे आयोजित करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधुनिक कृषीतंत्रज्ञान आणि सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन केले. कृषी खात्यातील ‘भेट आणि प्रशिक्षण’ ही आजवर कागदावर राहिलेली योजना पुनर्जिवीत करून शेतकी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावभेटीवर पाठविले. अतिवृष्टी, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकºयांना तात्काळ मदत मिळवून दिली. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळत असताना विखे यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडली आहे. पोंझी स्कीमच्या माध्यमातून झालेली सर्वसामान्य गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक, बोंडअळीमुळे झालेले कापूस उत्पादक शेतकºयांचे नुकसान, सरकारच्या निर्यात धोरणातील धरसोड वृत्तीमुळे झालेले कांदा उत्पादकांचे नुकसान, बेरोजगारांची होत असलेली फसवणूक, शासकीय कर्मचाऱ्यांना सतवा वेतन आयोग, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची हेळसांड अशा एक ना अनेक विषयांवरून विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. विखे यांचा मूळ स्वभाव आक्रमक नसला तरी त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण असल्याने सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. सर्वसामान्य नागरिकांनी पाठविलेल्या पत्राची तात्काळ दखल घेत सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळेच विखे यांच्या संपर्क कार्यालयास ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मिळाले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचे कार्यालय ‘आयएसओ’ प्रमाणित असणे, ही तशी दुर्मिळ गोष्ट!
राधाकृष्ण विखे पाटील यांना मत देण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php
रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री
कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना, विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करणारे रामदास आठवले आज केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आहेत. सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावातील एका गरीब बौद्ध (पूवीर्चे दलित) कुटुंबात आठवले यांचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई हौसाबाई काबाडकष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर, पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. विद्यार्थीदशेपासून अन्याय, अत्याचाराविरोधात लढले. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असत. हे वसतिगृहच गोरगरिबांचे आधारस्थान होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने होत असत. या सर्व चळवळीचे संस्कार आठवले यांच्यावर झाले. प्रा. अरुण कांबळे हे त्यांचे खºया अर्थाने वैचारिक गुरू. दलित पँथर्सच्या चळवळीत सक्रिय झाल्यानंतर, त्यांनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला. दलितांवरील अन्यायाविरोधात पँथर्सच्या माध्यमांतून त्यांनी आवाज बुलंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून राज्यभर आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचे नेतृत्वच आठवले यांनी केले. तत्कालीन सरकारशी त्यांनी संघर्ष केला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराची घोषणा केली. आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच, त्यांचा १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला. आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहनमंत्री म्हणून काम केले. मुंबई आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदार संघांतून ते खासदार झाले. आज ते केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. ‘जुलमास जाळण्याला, मी विद्रोहाची वात झालो,’ अशा शब्दांत आठवले यांच्या आजवरच्या कारकिर्दीची दखल घ्यावी लागेल.
रामदास आठवले यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php