लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, क्रीडाक्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 04:10 PM2018-03-23T16:10:42+5:302018-03-23T18:16:29+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने आपण आपला आवडता खेळाडू निवडू शकता.

Lokmat, Maharashtrian of the Year, honoring the players who have done brilliant performance in the field of sports | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, क्रीडाक्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, क्रीडाक्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान

Next

मुंबई- बुद्धिबळ असो वा क्रिकेट किंवा नेमबाजी महाराष्ट्रातील खेळाडू विविध क्रीडाप्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने आपण आपला आवडता खेळाडू निवडू शकता.

1. आकांक्षा हगवणे, बुद्धिबळ पुणे
‘चौसष्ट घरांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या आकांक्षा हगवणेने बुद्धिबळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. २०१५ मध्ये आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये २ सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावत ‘वुमन फिडे मास्टर’ हा किताब प्राप्त केला. २०१५ आणि २०१६ सलग २ वर्षे राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य शासनाने तिला ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविले आहे. २०१६ मध्ये रशियात झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने हा चमत्कार केला. याबरोबरच तिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ हा किताबही पटकावला आहे. कमालीची ‘डाऊन टू अर्थ’ असलेली आकांक्षा १६ वर्षांखालील मुलींच्या गटातील ‘विश्वविजेती’ आहे, हे विशेष उल्लेखनीय.
आता आकांक्षाला वेध लागलेत ते ‘ग्रॅण्डमास्टर’ बनण्याचे. २०१७ मध्ये तिने उझबेकिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदके आपल्या नावावर जमा केले आहेत. याच वर्षात तिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचेसुद्धा जेतेपद संपादन केले. याचबरोबर ४७ व्या बोस्ना (बोस्निया) येथील ४७ व्या बोस्ना इंटरनॅशनल खुल्या बुद्धिबळस्पर्धेत तिने विजेतेपदासह महिला ग्रॅण्ड मास्टरचा पहिला नॉर्मसुद्धा संपादन केला. आकांक्षाची वयाच्या सहाव्या वर्षी सुरुवात झाली ती मल्लखांबाने; पण पावसाळ्यात सरावासाठी बाहेर पडता येत नव्हते, घरातच थांबावे लागायचे. त्यामुळे घरात असताना बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. विरुद्ध खेळाडूंच्या चालीला प्रतिचाल करून, मात करण्यामध्ये आनंद वाटू लागला आणि आकांक्षाची बुद्धिबळ कारकीर्द सुरू झाली. महिला बुद्धिबळक्षेत्रात पुण्याचीच नव्हे, तर अवघ्या देशाची आशा-आकांक्षा असलेली ही १७ वर्षीय खेळाडू देशातील प्रतिभावान बुद्धिबळपटूंपैकी एक आहे. . राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर कायम वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या आकांक्षाने २०१३ मध्ये अवघ्या वयाच्या १३ व्या वर्षी मुलींच्या गटात (पाँडिचेरी) पहिले राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षागणिक तिने आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत ठेवला. नंतर तिने राष्ट्रीयस्तरावर १४; तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विजेतेपद पटकावले. अनेक राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्येही आकांक्षाने विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.
आकांक्षा हगवणे यांना मतदान करण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

2. अनिकेत जाधव, फुटबॉलपटू, कोल्हापूर
भारताच्या फुटबॉल विश्वातील आघाडीच्या फळीचा उगवता तारा म्हणून अनिकेत जाधवकडे पाहिले जाते. अनिकेतने वयाच्या १५व्या वर्षी पुणे एफसी या क्लबकडून फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने याच क्लबकडून १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील संघांतून खेळताना अनेक स्पर्धा गाजवल्या. अनिकेत याची सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र राज्य संघातून सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. यात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे फुटबॉलक्षेत्रात तो सर्वत्र ओळखला जाऊ लागला. २०१४ मध्ये भारतात झालेल्या एफसी बायर्न युथ चषक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. यामुळे त्याची एफसी बायर्न युथ चषक स्पर्धेच्या म्युनिक येथे झालेल्या अंतिम सामन्यासाठी निवड झाली. ऑल इंडिया अ‍ॅडमिनिस्टर्स चषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक आठ गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. २०१४-१५ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील आय लीग स्पर्धेत पुणे एफसी संघात त्याचा समावेश होता. या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. अनिकेतची २०१५ मध्ये भारताच्या १७ वर्षांखालील संघात निवड झाली. १ सप्टेंबर २०१५ रोजी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याने तीन गोल नोंदवून भारतासाठी हॅट्ट्रिक केली. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी द. आफ्रिकेतील १८ वर्षांखालील सुपर स्पोर्ट्स युनायटेड संघावर भारताच्या १७ वर्षांखालील संघाने विजय मिळवला. हा विजय मिळवून देण्यात अनिकेतचा गोल महत्त्वाचा ठरला. २०१६ मध्ये गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युथ फुटबॉल स्पर्धेत आणि आशियाई युवा चषक फुटबॉल स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यातील कामगिरीच्या जोरावर त्याची १७ वर्षांखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या अनिकेतने पुण्यातील क्रीडा प्रबोधनी अकॅडमीतून आपल्या फुटबॉल कारकिर्दीस सुरुवात केली. त्या वेळी तो अवघा १५ वर्षांचा होता. एका ऑटोरिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या अनिकेतने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
अनिकेत जाधव यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

3. हीना सिद्धू, नेमबाजी, मुंबई
गुरगावची असलेली हीना ‘मुंबईची सून’ म्हणून आज जागतिक नेमबाजीमध्ये भारताचे नाव अभिमानाने उंचावत आहे. भारतीय संघाची अव्वल नेमबाज असलेल्या हीनाकडे २०२० टोकियो ऑलिम्पिक पदकाची मुख्य दावेदार म्हणून पाहिले जात आहे. २०१४ साली हीनाने आंतरराष्ट्रीय पिस्तूल क्रमवारीत अव्वलस्थान काबिज करत अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज, असा मान मिळवला होता. त्याचप्रमाणे, २०१३ साली विश्वचषक अंतिम फेरीत १० मीटर पिस्तूल नेमबाजीमध्ये सुवर्णवेध घेत अशी कामगिरी करणारी हीना पहिली भारतीय ठरली. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या हीनाचे घरचे वातावरण क्रीडामय आहे. तिचे वडील आणि भाऊ हे दोघेही राष्ट्रीय नेमबाज असून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हीनाने भारताची मान उंचावली आहे. मुंबईकर नेमबाज रोनक पंडित यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर हीनाची ओळख ‘मुंबईची सून’ अशी झाली. विश्वचषक स्पर्धेत २ सुवर्ण, राष्ट्रकुल स्पर्धेत २ सुवर्ण, आशियाई नेमबाजीमध्ये एक सुवर्ण अशा मुख्य स्पर्धांत चमकलेल्या हीनाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत लयलूट केली असून सध्या ती आगामी २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी कसून सराव करत आहे. २००६ सालापासून नेमबाजीला सुरुवात केल्यानंतर हीनाने सर्वप्रथम राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत छाप पाडली. यानंतर तिने थेट भारताच्या वरिष्ठ आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजांवर वर्चस्व गाजवून आपल्या वर्चस्वाची नांदी दिली. २०१२ साली पहिल्यांदाच लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यानंतर हीनाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मात्र एका वर्षानंतर तिने जबरदस्त कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेसह अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोडियम स्थान पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
हीना सिद्धू यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

4. मुंबईचे ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र - पृथ्वी शॉ
भारतीय क्रिकेटचा उगवता तारा असलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ याने, आपल्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सातत्यपूर्ण आणि अनेक विक्रमी कामगिरीमुळे आज पृथ्वीकडे भविष्यातला सचिन तेंडुलकर म्हणून पाहिले जात आहे. पृथ्वीने यंदाच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत, आपल्या कर्णधारपदाखाली भारताला विश्वविजेते केले. ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी. मात्र, असे असले, तरी मुंबई शालेय क्रिकेटमधून तो सर्वप्रथम सर्वांच्या नजरेत आला. मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये दबदबा राखणाऱ्या रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेच्या १६ वर्षांखालील संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने नोव्हेंबर २०१३ साली मोठा धमाका करताना, साºया क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. प्रतिष्ठेच्या १६ वर्षांखालील हॅरीश शिल्ड आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत, पृथ्वीने सेंट फ्रान्सीस डी’अ‍ॅसीसी विरुद्ध ३३० चेंडूंत तुफानी ५४६ धावा चोपल्या. या धमाक्यानंतर मुंबईतील सर्वच क्रीडा पत्रकारांची धावपळ सुरू झालो. जो-तो पृथ्वीच्या एका प्रतिक्रियेसाठी धडपडत होता. न्यूज चॅनलवर फक्त पृथ्वीची चर्चा. त्यात दखल घेण्याची बाब म्हणजे, हा विक्रम अशा दिवशी झाला, जेव्हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन केवळ चार दिवस उलटले होते. साहजिकच, लगेच पृथ्वीची तुलना सचिनशी होऊ लागली. सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आणि काही दिवसांतच देशाला दुसरा तेंडुलकर मिळाला, इथपर्यंत पृथ्वीवर स्तुतिसुमने उधळले गेले. शिवाय या विक्रमानंतर विविध सत्कार, अनेक शिष्यवृत्त्या, विविध स्पॉन्सरशिप अशा अनेक गोष्टी पृथ्वीसह घडल्या. या विक्रमी खेळीआधीही पृथ्वीने सातत्याने शतकी, द्विशतकी व त्रिशतकी खेळी केल्या होत्या. मात्र, ५४६ च्या माइलस्टोननंतर तो स्टार झाला होता. या विक्रमानंतर त्याने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्त्व करताना चमकदार कामगिरी केली, तसेच शालेय स्पर्धेतही कामगिरीत सातत्य राखून त्याने आपला दांडपट्टा सुरूच ठेवला. मात्र, या वेळी त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. सध्या मुंबई रणजी संघात सलामावीर म्हणून खेळत असलेल्या पृथ्वीने, आपल्या पदार्पणापासून मुंबईचा प्रमुख फलंदाज अशी छाप पाडली. २०१६-१७च्या मोसमात रणजी उपांत्य सामन्यात त्याने मुंबईकडून पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत पृथ्वीने छाप पाडली. यानंतर, दुलीप चषक स्पर्धेतही पदार्पणात शतक झळकावून पृथ्वीने लक्ष वेधले. विशेष म्हणजे, या आधी रणजी आणि दुलीप स्पर्धेच्या पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केवळ सचिन तेंडुलकरने केला होता, त्यामुळे पुन्हा एकदा पृथ्वी हाच सचिनचा खरा वारसदार असल्याच्या चर्चेला उधाण आले.
पृथ्वी शॉ यांना मत देण्यासाठी ­-http://lmoty.lokmat.com/vote.php

5. अल्पावधीत प्रकाशझोतात : रजनीश गुरबानी, नागपूर
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीची प्रचिती देणारी रजनीश गुरबानीची खेळातील वाटचाल आहे. शालेय जीवनात दौड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा रजनीश बॅडमिंटन व बास्केटबॉल चांगल्या प्रकारे खेळतो. तो खऱ्या अर्थाने अष्टपैलू आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कुठल्याही खेळात करिअर केले असते तरी राष्ट्रीय पातळीवर त्याने छाप सोडली असती, असे त्याच्या कारकिर्दीवरून दिसून येते. त्याला क्रिकेटची विशेष आवड आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबईत झाल्यानंतर रजनीशला पालकांसह नागपूरची वाट धरावी लागली. येथेही त्याच्यातील खेळाडू स्वस्थ बसला नाही. कुटुंब शिक्षणाला अधिक महत्त्व देणारे असल्यामुळे रजनीशने अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण करताना क्रिकेटची आवडही जोपासली. २८ जानेवारी १९९३ रोजी जन्मलेल्या रजनीशने यंदाच्या मोसमात लक्षवेधी कामगिरी केली. या २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने यंदाच्या मोसमात रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाला जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मितभाषी असलेल्या रजनीशचे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य आहे. कर्नाटकविरुद्ध उपांत्य फेरीत १२ बळी आणि दिल्लीविरुद्ध अंतिम लढतीत हॅट्ट्रिक नोंदवल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळाला गुरबानीची दखल घ्यावी लागली. रजनीशच्या गोलंदाजीमध्ये युवा भुवनेश्वर कुमारची झलक दिसते. अतिवेगवान नसला तरी सरासरी १३०-१३५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना स्विंगच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धास्ती निर्माण करण्यात तो सक्षम आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने रजनीशची प्रशंसा करताना त्याच्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. रजनीशने गोलंदाजी करताना वेग वाढविण्यास प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. रजनीश इराणी ट्रॉफी स्पर्धेत शेष भारत संघाविरुद्धच्या लढतीत खेळण्यास उत्सुक आहे.
रजनीश गुरबानी यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

Web Title: Lokmat, Maharashtrian of the Year, honoring the players who have done brilliant performance in the field of sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.