लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; राजकारणातील आश्वासक चेहऱ्यांना निवडण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 05:01 PM2018-03-23T17:01:47+5:302018-03-23T18:14:54+5:30
उद्याच्या राजकारणामध्ये आश्वासक कामगिरी करु शकतील अशी खात्री ज्या नेत्यांबद्दल वाटते त्यांना निवडण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने मिळणार आहे.
मुंबई- वैचारिक मतभेद असले तरी महाराष्ट्राने पक्षभेद विसरून विविध पक्षांमधील नेत्यांच्या गुणांना नेहमीच सलाम केला आहे. उद्याच्या राजकारणामध्ये आश्वासक कामगिरी करु शकतील अशी खात्री ज्या नेत्यांबद्दल वाटते त्यांना निवडण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने मिळणार आहे. या विभागासाठी नामांकने आहेत
आदित्य ठाकरे, युवासेना अध्यक्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ठाकरे कुटुंबीयांचे नाव मराठी अस्मितेच्या उल्लेखाने घेतले जाते, त्या कुटुंबातील सदस्य असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे ते पुत्र असून, शिवसेनेतील युवापिढीचे नेतृत्व करण्यासाठी मागील काळापासून ते सिद्ध झाले आहेत. राजकारण हा त्यांचा पिंड आहे. कुटुंबातून मिळालेले बाळकडू आणि असलेली राजकीय पार्श्वभूमी यातून त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. युवासेनेच्या माध्यमातून सध्या त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवीत, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी रुची जोपासली आहे. कवितासंग्रह, खासगी अल्बम या माध्यमातून त्यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. राजकारणाच्या वाटेवर चालताना मुंबईतील नाइटलाइफच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आदित्य ठाकरे यांचा जन्म १३ जून १९९० मध्ये मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव रश्मी ठाकरे. बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले. पुढे सेंट जेवियर्स कॉलेज मुंबई येथून त्यांनी इतिहास या विषयात बी. ए. केले, तर के. सी. लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या शिवसेनेचा भाग असलेल्या युवा विभागाच्या युवासेनेचे ते प्रमुख आहे. आदित्य ठाकरे यांनी १७ ऑक्टोबर २०१० मध्ये युवासेनेची स्थापना केली. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर येथील युवक मोठ्या प्रमाणावर सदस्य आहेत. राजकारणात असूनही कविमन जोपासणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी ‘माय थॉट्स इन व्हाइट अँड ब्लॅक’ हा पहिला कवितासंग्रह २००७ मध्ये प्रकाशित केला. या कवितासंग्रहातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक पाहावयास मिळाली. संवेदनशील असलेल्या कविमनाच्या आदित्य ठाकरे यांनी या माध्यमातून साहित्याच्या प्रांतात पाऊल ठेवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोपासलेला साहित्य, संस्कृतीचा वारसा या निमित्ताने त्यांच्या रूपाने पुढे आला. पुढे २००८ मध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गीतकार असा आविष्कार झाला. ‘अमिमेड’ नावाचा खासगी अल्बम त्यांनी प्रकाशित केला. या अल्बमच्या निर्मितीसाठी आठ गाणी त्यांनी लिहिली आहेत. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, कैलाश खेर, सुनिधी चौव्हाण यांसारख्या प्रथितयश गायकांनी त्यांच्या अल्बमसाठी गाणी गायली आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांनी अल्बमचे उद्घाटन केले. या काळातच त्यांच्यातील एक लढावू व्यक्तिमत्त्व पाहावयास मिळाले. मुंबई विद्यापीठाने रोहिंग्टन मिस्त्री यांचे ‘आय अ लाँग जर्नी’ हे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते. त्या पुस्तकाच्या अभ्यासक्रमातील समाविष्ट होण्याला त्यांनी प्रखर विरोध केला. विद्यापीठाला हे पुस्तक अभ्यासक्रमातून मागे घेण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन उभारले. एक पालक म्हणून स्वत: विचार करावा, आपल्या मुलांना अशी पुस्तके अभ्यासासाठी हातात देण्याला कशी परवानगी द्याल, असा प्रश्न त्यांनी पालकांपुढे उपस्थित केला. विद्यार्थ्यांना वर्णद्वेषी साहित्य अन्य काहीही गोष्टी आपण शिकवू देणार नाही, वर्णद्वेषातून युवकांना रोजगार मिळणार नाही, त्यामुळे अशा अभ्यासाची गरज काय, असा जाब विचारत, त्यांनी या पुस्तकाचा विरोध केला. मात्र, हे करताना पुस्तकावर बंदी न घालता बाजारात ते विक्रीसाठी असल्यास हरकत नाही. ज्यांना वाचायचे असेल, त्यांनी बाजारातून घेऊन वाचावे. मात्र, ते अभ्यासात समाविष्ट करणे चुकीचे होईल, असे मत त्यांनी मांडले. मुंबई आणि नाइटलाइफ हे समीकरणच आहे. मात्र, रात्रपाळीत जागणाºया माणसांना सुविधा काय, याचा कुणी विचारच केला नव्हता. रात्रपाळीत जागणाºया माणसांना आणि दिवसभर काबाडकष्ट करून रात्री व्यवहाराला वेळ देऊ पाहणाऱ्या माणसांच्या भावना लक्षात घेता, त्यांनी रात्रभर मॉल आणि रेस्टॉरंटला परवानगी देण्याचा मुद्दा समोर मांडला. त्यासाठी रात्री जागणाऱ्या माणसांच्या गरजा, व्यवहारासाठी आवश्यक असलेला वेळ त्यांनी लक्षात आणून दिला. त्यासाठी मुंबईच्या नाइटलाइफचे पुनरुज्जीवन करण्याची शिफारस त्यांनी केली. युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय आणि प्रश्न हाताळले. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्याची व्यवस्था असावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी युवासेनेचे अध्यक्षपद स्वीकारताच, त्यांनी दिल्लीत जाऊन ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ५० हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले. स्वत:तील सर्जनशीलतेची जाणीव त्यांच्या कवितांच्या अल्बमच्या माध्यमातून दिसते. त्यांनी कवितांचे लेखन केले. आपल्या सेलफोनवर त्या कविता जतन केल्या. कुटुंबातूनच सांस्कृतिक वारसा मिळालेल्या आदित्य ठाकरे यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी ही अर्थातच कलात्मक आहे. कविता आणि छायाचित्रण ही माध्यमे असली, तरी आपण त्या माध्यमातून हे जग वेगळेपणाने न्याहाळतो, असे ते सांगतात. वाचक अथवा प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण ही स्पंदने टिपतो, असे ते म्हणतात. अन्य राजकीय पक्षांपेक्षा शिवसेनेची भूमिका वेगळी आहे. राजकारण करतानाही सोबतच सामाजिक कार्य करणारा आपला पक्ष आहे. त्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न आणि समस्या सोडविताना सामाजिकतेचा समान धागा शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या राजकारणात असतो, असे ते सांगतात.
आदित्य ठाकरे यांना मत देण्यासाठी -http://lmoty.lokmat.com/vote.php
जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य
जयकुमार रावल हे आपले आजोबा,महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेतील आमदार आणि राज्याचे नेते दादासाहेब रावल यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या जयकुमार यांच्याकडे महाराष्ट्राच्या पर्यटन आणि रोजगार हमी खात्याची जबाबदारी आहे. रावल हे सलग तीनवेळा मोठ्या मतांच्या फरकाने सिंदखेडा मतदारसंघातून विधानससभेवर विजयी झालेले असून, भारतीय जनता पार्टीचे एक आश्वासक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तळागाळातील जनतेच्या हितासाठी सतत विकासाचा ध्यास घेतलेले नेते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. धुळे जिल्ह्यात भाजपच्या यशात त्यांचे मोठे योगदान आहे. राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजनेचे मंत्री जयकुमार रावल यांना त्यांचे आजोबा उद्योगपती दादासाहेब रावल यांच्यापासून राजकीय वारसा मिळाला. त्यांच्या आजोबांनी स्टार्च फॅक्टरी सुरु करुन दोंडाईचा सारख्या लहानशा शहरात उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती. सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते. सतत विकास आणि उद्यमशीलतेचा ध्यास घेतलेल्या दादासाहेबांनी पहिल्या विधानसभेत आपल्या कामाची छाप उमटवली. दादासाहेबांचा वारसा चालविणारे त्यांचे नातू जयकुमार रावल हेही आजोबांप्रमाणेच विकासाचा ध्यास घेऊन राजकारण करीत आहेत. नवी पिढी शिक्षणाबाबत अतिशय जागरूक आहे. जयकुमार यांनी पुण्यात जाऊन वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. सिम्बॉयसेस महाविद्यालयातून ते बी. कॉम. झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बिझनेस मॅनेजमेंटची पदवी तेथून घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोंडाईचा येथे आल्यावर त्यांनी पहिल्यांदा दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदविला. त्यानंतर सन २००४ मध्ये ते शहादा - दोंडाईचा विधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे उभे राहिले. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.हेमंत देशमुख यांचा पराभव केला. धुळे जिल्ह्यात आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण करणारे जयकुमार रावल हे भाजपाचे पहिले आमदार ठरले आहेत. सन २००४ नंतर २००९ मध्ये स्वतंत्र सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि २०१४ मध्ये पुन्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांचा पराभव केला. ९ जुलै २०१६ रोजी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री म्हणून जयकुमार यांनी दोन वर्षांत केलेले काम उल्लेखनीय आहे. पर्यटन मंत्री म्हणून रावल यांनी राज्यातील पर्यटनाला नवी दिशा देण्याचे काम केले. देशोदेशीच्या लोकांनी येथे यावे. यासाठी राज्यातील गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी मार्केटिंग आणि ब्रँडिंगवर त्यांनी अधिक भर दिला. न्याहरी निवासाची योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एअरबीनबी ख्यातनाम संस्थेशी सामंजस्य करार केला. एतिहाद एअरवेज (जेट एअरवेज) सोबतच्या सामंजस्य कराराने ‘डेस्टिनेशन महाराष्ट्र’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविली. ओला टॅक्सीचाही राज्याच्या पर्यटन विभागाच्या मार्केटिंगमध्ये परिणामकारकरित्या वापर केला. याशिवाय वाईन पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे जर्मनीचे वर्टमबर्ग, क्युबेकचा पर्यटन विभाग आणि जपानच्या वाकायाशी सामंजस्य करार करुन राज्यातील पर्यटन उद्योगाला मोठी चालना देण्याचे काम रावल यांनी केले आहे. पर्यटनासोबत रोजगार हमी योजना खात्यामार्फत ग्रामीण भागातील मजुरांच्या प्रत्यक्ष हाताला काम मिळावे यासाठी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना त्यांनी आणली. राज्यस्तरावर ११ कलमी कार्यक्रमांची आखणी केली. त्यात सहा कामे व्यक्तिगत लाभाची, चार कृषी आधारित आणि एक ग्रामविकासाचे काम अशी विभागणी केली. मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी दोंडाईचा नगरपालिकेत भाजपाची सत्ता आणली. नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या मातोश्री नयनकुवर रावल निवडून आल्या. त्यांनी सिंदखेडा नगरपंचायतीची स्थापना केली. स्थापनेनंतर शिंदखेडा नगरपंचायतीतसुद्धा भाजपाची सत्ता आणली. जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी चारही तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांसाठी निधी मंजूर करुन दिला. जिल्ह्यातील जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सुलवाडे - जामफळ आणि प्रकाशा - बुराई या उपसा सिंचन योजना प्रकल्पांसाठी पहिल्यांदा ४१ कोटींची भरीव तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करवून घेतली. या दोन्ही योजनांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम - सुफलाम होणार आहे. जयकुमार रावल यांनी भारतीय जनता पक्षासाठी व्यापक असे संघटनात्मक कार्य उभे केले आहे. ते प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पक्षाच्या युवा संघटनेची जबाबदारी सांभाळताना त्यांनी युवक, विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये शिकत असतानाही कार्डीफ विद्यापीठात त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रशंसा त्या विद्यापीठानेही केली होती. आपल्याकडे राज्याच्या युवा आमदारांची एक संघटना आहे. यामध्ये ७२ तरूण आमदारांचा सहभाग आहे. या महत्त्वपूर्ण संघटनेचे ते समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. जयकुमार रावल यांचे नेतृत्व सर्वव्यापी असल्यामुळे त्यांची स्वीकारार्हता मोठी आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता खेचून आणली. रावल यांच्या नेतृत्वामुळे गेल्या दहा वर्षांपासून सिंदखेडा पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. शिवाय सिंदखेडा बाजार समिती भाजपच्याच ताब्यात आहे. तालुका दूध उत्पादक संघ आणि तालुका खरेदी - विक्री संघही रावल यांच्याच ताब्यात आहे.
जयकुमार रावल यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
डॉ. जितेंद्र आव्हाड - आमदार मुंब्रा - कळवा
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन खात्याचे कॅबिनेटमंत्री होते. अनेक वादग्रस्त विषयात स्वत:ला झोकून देणे आणि सभागृहात एखाद्या विषयावर तुटून पडणे अशीच त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या या स्वभावगुणाबद्दल मार्च २०१७ मध्ये अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या भाषणात अडथळे आणल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते. १९८३-८४ साली ठाण्याच्या बी. एन. बांदोडकर महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले आव्हाड, हे विद्यार्थीदशेत असतानाच त्यांचे नेतृत्वगुण आकाराला आले. ते कॉलेजमध्ये जिमखाना सचिवपदी निवडले होते. याशिवाय ऑल इंडिया स्टुडंस् ऑर्गनायझेशन या विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्या वेळी शिक्षण फीच्या विरोधात त्यांनी आंदोलन पेटविले होते. ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येणाºया जितेंद्र आव्हाड यांची 'एक संघर्षी' नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. कळवा-मुंब्रा या आगरी आणि मुस्लीम समाजबहुल मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील दहीहंडीचा उत्सव जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी ठाण्यात भव्य दहीहंड्यांचा उत्सव आयोजित करून, दहीहंडीला ग्लॅमर मिळवून देण्यात आव्हाड यांचा मोठा हात आहे. चळवळी आणि तितकाच वादग्रस्त अशी त्यांची ओळख असून, त्यांच्या वक्तव्यावरून होणाºया वादाची ओळख सर्वत्र आहे. जितेंद्र आव्हाड यांचा जन्म ५ ऑगस्ट १९६३ साली नाशिक येथे झाला. ठाण्यात शिक्षण घेतलेल्या आव्हाड यांचे शिक्षण बी. ए., एम. एल. एस (मास्टर ऑफ लेबर स्टडिज मुंबई असून, त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेटही मिळाली आहे.) युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. २००२ साली ते कळवा-मुंब्रा येथून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर, सलग तीन टर्म या भागाचे नेतृत्व करत आहेत. संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये ते कार्यरत आहेत. कै. लीलावती सतीश आव्हाड एज्यु. सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत, तर मुस्लीम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहेत. वंजारी युवा संघ, जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन, योगा असोसिएशन, कास्ट्राइब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना, बेसबॉल असोसिएशन, विमान वाहतूक क्षेत्रातील पायलट्स गिल्ड या कर्मचारी संघटना अशा संघटनांचे ते अध्यक्ष आहेत. आदिवासी समाजातून आलेले जातीयवादाच्या विरोधात कट्टर असलेले आव्हाड यांनी विवाह करतानाही जातीची बंधने पाळली नाहीत. गुजरातमध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहाँप्रकरणी त्यांनी आपली भूमिका उघडपणे मांडली. आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सध्या सेक्युलर आयकॉन म्हणून पाहिले जाते. सध्या राज्यात आणि केंद्र्रात हिंदुत्ववादी विचारसरणीची सत्ता आहे. अशा स्थितीमध्येही सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्याची धमक केवळ जितेंद्र आव्हाड यांनीच बाळगली आहे. मुस्लीम, दलित किंवा ओबीसी या जातसमूहासाठी जितेंद्र आव्हाड यांनी लढा उभारला आहे. शरद पवार, शरद यादव, लालुप्रसाद यादव, जॉर्ज फर्नांडिस, नरसय्या आडाम ही मंडळी सद्यस्थितीमध्ये कडवे सेक्युलर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामध्ये आता ठाण्याचे जितेंद्र आव्हाड हे नाव अतिशय आदराने घेतले जात आहे. मुंबई विद्यापीठाने निकालाची डेडलाइन पाळली नसल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या हॉटेल हयातजवळील गेटला टाळे ठोकले. आव्हाड १० ते १५ जणांसोबत आले होते. रेल्वे प्रशासनाचा निषेध आणि बुलेट ट्रेनला विरोध करण्यासाठी कळवा रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ‘रेल रोको’ आंदोलन केले.
जितेंद्र आव्हाड यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
पूनम महाजन, खासदार उत्तर-मध्य मुंबई
पूनम महाजन या भाजपाच्या उत्तर-मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार आहेत. पूनम या भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या कन्या असून, पित्याच्या स्व. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर २००६ मध्ये त्या सक्रिय राजकारणात उतरल्या. मुंबईमध्ये तरुण आणि नवीन मतदारांना पक्षाकडे वळविण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली. यामुळेच २०१० मध्ये त्यांची भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, तर डिसेंबर २०१६ मध्ये त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रेसिडेंट म्हणून निवड झाली होती. याशिवाय त्याच वेळी त्या भारतीय बास्केटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती. या फेडरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. सध्या त्या भाजपाच्या राषट्रीय सरचिटणीस आहेत. संसद सदस्य म्हणून निवडून आल्यावर पूनम यांनी केंद्रीय नागरी विकास समितीवर काम केले. सध्या त्या वित्तमंत्रालयाच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. भाजपासाठी अगदीच प्रतिकूल म्हणावा, अशा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत पूनम महाजन यांनी दिल्ली गाठली. जाएंट किलर पूनम महाजन आज भाजपाचा युवा चेहरा म्हणून राष्ट्रीय राजकारणात वावरत आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून देशभर युवांचे संघटन करत आहेत, त्यांचे प्रश्न मांडत आहेत. आज भाजपाचा युवा चेहरा म्हणून राष्ट्रीय राजकारणात वावरणाऱ्या पूनम महाजन अपघातानेच राजकारणात आल्या. भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर २००६ साली त्या राजकारणात सक्रिय झाल्या. वडील प्रमोद महाजन म्हणजे राष्ट्रीय पातळीवर स्वकर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविलेले एक प्रसन्न राजकीय नेतृत्व. अशा नेत्याचा राजकीय वारसा पूनम महाजन यांच्याकडे आला, पण म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुखकर आणि निर्धोक अजिबात नव्हता. २००९ साली आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयशाला सामारे जावे लागले. या पराभवाने खचून न जाता, त्यांनी जिद्दीने आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला. मेहनतीने, निष्ठेने पक्षसंघटनेतील जबाबदाऱ्या पार पाडल्या. २०१० साली ‘भाजयुमो’च्या त्या उपाध्यक्षा बनल्या. त्यानंतर, तीन वर्षांनी म्हणजे २०१३ साली भाजयुमोच्या राष्ट्रीय सरचिटणीसपद त्यांच्याकडे आले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अवघ्या चार वर्षांतच उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्या संघर्षाला सिद्ध झाल्या. सिनेअभिनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत सुनील दत्त यांचा हा मतदारसंघ. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला आणखी मजबूत केला होता. अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पूनम महाजन यांचा निभाव लागणार नाही. किंबहुना, म्हणूनच त्यांना हा मतदारसंघ दिल्याचे राजकीय जाणकार म्हणायचे. तेव्हाही इथे भाजपाचा कमळ फुलणारच, असे पूनम महाजन आत्मविश्वासाने सांगायच्या. त्यांच्या निवडणूक वॉर रूमने तयार केलेली विश्लेषणाची फाइल, त्यातील आकडेवारी आत्मविश्वासाने मांडायच्या. या निवडणुकीत त्यांनी राबविलेली प्रचारयंत्रणा, छोट्या-छोट्या वस्ती-वाडे आणि सोसायटीतील राजकीय, सामाजिक समीकरणांचा अद्ययावत ताळेबंद त्यांच्या हाताशी तयार होता. त्यांची ही तयारी प्रमोद महाजन यांची आठवण करून देणारी होती. राजकीय पंडितांच्या सर्व भविष्यवाण्या खोट्या ठरवत, तब्बल एक लाख ८६ हजार मतांनी त्यांनी दणदणीत विजयाची नोंद करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. लोकसभेत दाखल झाल्यावर ‘पब्लिक पॉलिटिशयन पार्टनरशिप’ हे सूत्र मांडत, त्यांनी कामाला सुरुवात केली. मतदारसंघातील स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन मतदारसंघातील प्रश्नांवर उत्तरे शोधू लागल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील पायाभूत विकासकामे मार्गी लावण्यात पूनम महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मुंबईत आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. महिला, युवक आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन फोरम’चा कार्यक्रम त्यांनी मुंबईत घडवून आणला. पूनम महाजन यांच्या प्रयत्नांमुळेच ग्लोबल सिटिझन पहिल्यांदाच भारतात, त्यातही मुंबईत दाखल झाला होता. २२ डिसेंबर २०१६ साली औपचारिकपणे भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. उमा भारती यांच्यानंतर या पदावर येणाऱ्या त्या एकमेव महिला कार्यकर्त्या आहेत. विशेष म्हणजे कधी काळी प्रमोद महाजन यांनीही ही धुरा वाहिली होती. राजनाथ सिंग, शिवराजसिंग चौहान आदी दिग्गज नेत्यांनीसुद्धा भाजयुमोचे अध्यक्षपद सांभाळले होते. मेहनत आणि पक्षाशी अविचल निष्ठेच्या जोरावर दिग्गज नेत्यांच्या मांदियाळीत पूनम महाजन आता सामील झाल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या सांभाळतानाही मुंबई आणि विशेषत: आपल्या मतदारसंघाकडे तितकेच लक्ष आहे. कार्यकर्त्यांशी नियमित संवाद आणि मतदारांशी संपर्क ठेवून आहेत.
पूनम महाजन यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
सतेज पाटील, काँग्रेस आमदार
काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण व ज्याला उत्तम राजकीय भवितव्य आहे, अशा नेत्यांमध्ये आमदार सतेज पाटील यांचा समावेश होतो. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातून तत्कालीन आरोग्यमंत्री व दिग्गज नेते दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करून, राजकारणात पाऊल ठेवलेल्या सतेज पाटील यांनी २००९ ला धनंजय महाडिक यांचा पराभव केला. त्यानंतर, त्यांनी गृह, ग्रामविकास, फलोउत्पादन व अन्न व औषध प्रशासन अशी महत्त्वाची खाती मिळाली. सत्तेत असताना त्यांनी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला व तो राबवून दाखविला. गृहराज्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार करत असताना, त्यांनी कसलाही डाग चारित्र्यावर पडणार नाही, असे काम करून दाखविले. सतेज पाटील यांनी आपले वडील डी. वाय. पाटील यांच्याकडून राजकीय आणि सामाजिक वारसा घेतला आहे. त्यांच्या सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांपासून झाली. कोल्हापूरच्या राजकीय क्षितिजावर त्यांच्या रूपाने एक नवा तारा जणू उदयास आला. आपल्या संघटन कौशल्याची चुणूक त्यांनी या काळापासूनच दाखविणे सुरू केले. ते केवळ समस्यांसंदर्भात जागरूकच नसतात, तर त्या दूर करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. समाजकारण, राजकारण अथवा संस्थांत्मक कार्यातही त्यांनी आपल्या कामाची हीच पद्धत जोपासली आहे. सतेज पाटील १९९२-९३ या काळात शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण व निरंतर सल्लागार समितीवर होते, तर १९९५-९९ या काळात सिनेट सदस्य होते. राजकारणात त्यांचा प्रवेशही दमदार असाच झाला. २००४ ते २००९ या काळात ते करवीर मतदारसंघातून विजयी झाले. पुढे २००९ ते २०१४ या काळातही कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी मंत्रिमंडळातही काम केले. सध्या ३० डिसेंबर २०१५ पासून ते विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सतेज पाटील तरुण नेते आहेत. त्यांच्याकडे काम करून घेण्याची कसब आहे. स्वत:ची पाठपुरावा करणारी मोठी यंत्रणा आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर ते खुबीने करतात. पूर्वी एखाद्या आमदाराला भेटणेही सामान्य लोकांच्या दृष्टीने किती दुरापास्त असायचे, परंतु सतेज पाटील यांनी मोबाइलच्या माध्यमातून तुमचा आमदार आज कुठे आहे, हे घरबसल्या कळविण्याची सोय केली आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक प्रमुख लोकांना ‘एसएमएस’द्वारे हे कळविण्यात येते. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे. कोल्हापुरातील चौकात फलक लावून तुम्ही कोणतेही काम माझ्याकडे घेऊन या, ते काम सोडविण्याचा प्रयत्न करू, असे सांगणारा हा कोल्हापुरातीलच नव्हे, तर राज्यातील दुर्मीळ आमदार असावा. सकारात्मक दृष्टीेकोन, स्वच्छ चारित्र्य, उत्तम सार्वजनिक व्यवहार आणि सतत समाजासाठी काही करण्याची धडपड हीच त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनातील यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. प्रतिवर्षी वाढदिवसाला वह्या संकलित करून, त्या मतदारसंघातील गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रमही कोल्हापूरनेच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर आमदारांनी अनुकरण करावा, असा आहे. गेल्या ११ वर्षांत सुमारे साडेदहा लाख विद्यार्थ्यांना या वह्यांचा उपयोग झाला आहे. या उपक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. कोल्हापुरातील हनुमान भक्त मंडळाच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक कार्य सुरू असते. विविध विषयांवर कार्यशाळा, व्याख्याने यांचे आयोजन या माध्यमातून नियमितपणे केले जाते. कोल्हापूर जिल्हा हौशी बॉक्सिंग असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातून युवा वर्गामध्ये बॉक्सिंगची आवड निर्माण करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करणे या खेळ प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करीत असतात. वडिलांचा वारसा चालविताना त्यांनी श्री मुनी विद्यापीठाची स्थापना केली. राज्यातील उत्तम अशी शैक्षणिक संस्था म्हणून ती नावारूपास आली आहे. या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. संघटनकौशल्य त्यांच्या अंगी जन्मजात आहे. ऑगस्ट २००७ मध्ये त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. या कारखान्याचे ते चेअरमन आहेत. या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम त्यांनी केले. सामाजिक बदल केवळ आर्थिक बदलातूनच होणार नाही, तर त्यासाठी राजकीय बळ आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कोल्हापुरातील सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला. २००१च्या निवडणुकीत गगनबावडा तालुक्यातून ते संचालक म्हणून बँकेवर निवडून गेले. त्यानंतर, २००६ मध्ये पुन्हा संचालक म्हणून त्यांची या बँकेवर निवड झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. या सोबतच इंडियन रेडक्रॉस सोसायटी, वाइल्ड लाइफ फंड फॉर नेचर इंडिया, संत गजानन महाराज संस्थान शेगाव, रोटरी क्लब कोल्हापूर, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया आदी संस्थांमध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक आणि संस्थात्मक स्तरावर सतेज पाटील यांचे भरीव कार्य सुरू आहे. मैत्रीपूर्ण वृत्ती, हसतमुख चेहरा, सदैव सहकार्याची तयारी, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची वृत्ती आणि प्रचंड लोकसंग्रह ही त्यांची बलस्थाने आहेत.
सतेज पाटील यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php