लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कलावंतांच्या कलेचा सन्मान करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 03:36 PM2018-03-23T15:36:48+5:302018-03-23T15:36:48+5:30

महाराष्ट्रात या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये गाण्यासाठी आवाज देणाऱ्या, संगीत देणाऱ्या कलाकारांचा सन्मान लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

Lokmat Maharashtrian of the Year; The opportunity to honor the art of artists | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कलावंतांच्या कलेचा सन्मान करण्याची संधी

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कलावंतांच्या कलेचा सन्मान करण्याची संधी

Next

मुंबई-  गायन, संगीत, वादन अशा विविध माध्यमांतून कलाकार आपली कला चित्रपट, नाटकांमधून सादर करत असतात. महाराष्ट्रात या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये गाण्यासाठी आवाज देणाऱ्या, संगीत देणाऱ्या कलाकारांचा सन्मान लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. पर्फॉर्मिंग आर्टस या वर्गासाठी खालील नामांकनांमधून आपल्या आवडत्या कलाकारास तुम्ही मत देऊ शकाल. http://lmoty.lokmat.com/vote.php

1.आर्या आंबेकर - ती सध्या काय करते - हृदयात वाजे समथिंग - गायिका
सारेगमप या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आर्या आंबेकर झळकली होती. आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत आणि नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. आर्याच्या आवाजात एक गोडवा असल्याने, रसिकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केले. आर्या साडेपाच वर्षांची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. आर्याने आतापर्यंत अनेक अल्बम्स, तसेच काही मराठी चित्रपटांसाठी, नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्याने आज संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची आणि तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे, तर लावणी, लोकगीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणूनदेखील लोकांसमोर आली. २०१७ च्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. या चित्रपटामध्ये तिने गायलेले ‘हृदयात वाजे समथिंग’ हे गाणे रसिकांना प्रचंड आवडले. या गाण्यातील तिच्या आवाजाचे सगळ्यांनीच कौतुक केले. मराठीसोबतच काही इंग्रजी शब्दांचे बोल या गाण्यात असल्याने, हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. विशेष म्हणजे, हे गाणे आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे यांच्यावरच चित्रित झाले होते. ‘हृदयात वाजे समथिंग’ हे गाणं विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे.
आर्या आंबेकर यांना मत देण्यासाठी-  http://lmoty.lokmat.com/vote.php

2. अवधूत गुप्ते - बॉईज - संगीतकार
अवधूत गुप्ते हा एक प्रसिद्ध गायक, संगीतकार असण्यासोबतच यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शकदेखील आहे. ‘मेरी मधुबाला’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ यांसारख्या गाण्यामुळे अवधूत खऱ्या अर्थाने नावारूपाला आला. आज मराठीतील यशस्वी गायक, दिग्दर्शकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्याने मराठीसोबतच हिंदी गाणीदेखील गायली आहे. त्याचे स्वतंत्रपणे अनेक संगीत अल्बमदेखील आहेत, तसेच त्याने छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहे. त्याने अनेक कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारली आहे. अवधूतने पाऊस या अल्बमद्वारे गायक आणि संगीतकार म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर, काहीच दिवसांत वैशाली सामंतसोबत ‘ऐका दाजीबा’ हा अल्बम त्याने प्रेक्षकांच्या भेटीस आणला. हा अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. त्यानंतर, त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘बॉईज’ या चित्रपटाला संगीतकार अवधूत गुप्तेने सुमधूर संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘जीवना...’, ‘लग्नाळू’ ही सगळीच गाणी रसिकांना प्रचंड भावली. ‘लग्नाळू’ हे गाणे पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात हळुवार फुलणाऱ्या प्रेमभावनेला वाट करून देते. कॉलेजविश्वात पहिले पाऊल टाकणाऱ्या नवतरुणवर्गाचे विश्व मांडणाऱ्या या गाण्याचे संगीत आणि लिखाण अवधूत गुप्तेने केले आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉईज’ या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटातील संगीत तरुण पिढीला चांगलेच भावले असून, या गाण्यांसाठी अवधूतचे चांगलेच कौतुक होत आहे.
अवधूत गुप्ते यांना मत देण्यासाठी-  http://lmoty.lokmat.com/vote.php

3. शामक दावर - हृदयांतर - कोरिओग्राफर
शामक दावरने आजवर ‘दिल तो पागल है’, ‘ताल’, ‘किस्ना’, ‘बंटी और बबली’, ‘धूम २’, ‘तारे जमीन पर’, ‘युवराज’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘जग्गा जासूस’ यांसारख्या चित्रपटांतील गाणी कोरिओग्राफ केली आहेत. शामकला बॉलीवूडमधील सगळ्यात चांगल्या कोरिओग्राफर्सपैकी एक कोरिओग्राफर मानले जाते. तीन दशके बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केल्यानंतर, शामक दावर मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला. त्याने ‘हृदयांतर’ या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन केले. फॅशन डिझायनर-दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या ‘हृदयांतर’ या चित्रपटातील शीर्षक गीतासाठी शामकने नृत्यदिग्दर्शन केले. शामक दावर आणि विक्रम फडणीस यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याने विक्रमच्या चित्रपटाद्वारे शामकने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘हृदयांतर’ हा एक भावनात्मक चित्रपट असून, या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘हृदयांतर’ या चित्रपटातील क्लायमॅक्सला असलेले गाणे शामकने कोरिओग्राफ केले आहे. हे केवळ म्युझिकल गाणे असून, या गाण्यातील नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. या गाण्यात स्वत: शामक दावरनेदेखील उपस्थिती लावली आहे. शामकच्या या नृत्यावर सगळेच फिदा झाले आहेत. 
शामक दावर यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

4. श्रेया घोषाल - देवा - रोज रोज नव्याने - गायिका
श्रेया घोषालने संजय लीला भन्सालीच्या ‘देवदास’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये आगमन केले. पहिल्याच चित्रपटातील ‘डोला रे’ हे तिचे गाणे चांगलेच गायले. त्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने आज केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अनेक मराठी चित्रपटांमध्येदेखील एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. सगळ्याच पठडीतील गाणी श्रेया तितक्याच ताकदीने गाते. आज बॉलीवूडमधील सगळ्यात चांगल्या गायकांपैकी एक तिला मानले जाते. तिने गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारदेखील मिळविले आहेत. ‘देवा’ या चित्रपटात श्रेयाने गायलेले ‘रोज रोज नव्याने’ हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. या रोमँटिक गाण्यात श्रेया घोषालला सोनू निगमची साथ लाभली आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. हे गाणे प्रेमीयुगुलांसाठी तर पर्वणी ठरले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून, अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘देवा’ या चित्रपटात प्रेक्षकांना माया आणि देवाची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. माया ही लेखिका तर देवा हे अतरंगी कॅरेक्टर आहे. अंकुश चौधरीने साकारलेल्या देवासारखीच मायाही अतरंगीच आहे. ती कुठलीही गोष्ट ठरवून करत नाही. ती सतत फिरतीवर असते आणि नावीन्य शोधण्याचा प्रयत्न करत असते. मायाच्या अतरंगीपणाला श्रेयाने तिच्या आवाजात लोकांसमोर आणले आहे.
श्रेया घोषाल यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

5. स्वप्निल बांदोडकर - हृदयांतर - वाटेवरी - गायक
‘राधा ही बावरी’, ‘गालावर खळी’, ‘ओल्या सांजवेळी उन्हे’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’ यांसारखी अनेक हिट गाणी आजवर स्वप्निल बांदोडकरने गायली आहेत. ‘चष्मे बहाद्दूर’, ‘फोटो कॉपी’, ‘जबरदस्त’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘मितवा’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील स्वप्निलची गाणी गाजली आहेत. स्वप्निलचे अनेक अल्बमदेखील प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहेत. स्वप्निलने ‘वादळवाट’ या मालिकेचे शीर्षकगीतदेखील गायले होते. आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिथयश गायकांमध्ये त्याची गणना केली जाते. ‘हृदयांतर’ या चित्रपटात स्वप्निलने ‘वाटे वरी’ हे गाणे गायले आहे. आयुष्यात दु:खाचा अध्याय येऊन गेल्यानंतरच खºया सुखाची जाणीव होते, हा धागा पकडत असलेल्या ‘हृदयांतर’ या चित्रपटाची गोष्ट मनाला नक्कीच भावते. पापण्यांच्या कडा ओलावण्याचे सामर्थ्य या चित्रपटात आहे आणि त्या पाऊलवाटेवर चालत, हा चित्रपट संवेदनशील मनाला चिंब करून टाकतो. कुटुंबातल्या चार व्यक्तींभोवती या चित्रपटाची कथा फिरते. भावनांचा खेळ मांडणारा, थेट हृदयाला हात घालणारा आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘वाटे वरी’ हे हृदयस्पर्शी गाणे प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. या हृदयस्पर्शी गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता.
स्वप्निल बांदोडकर यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year; The opportunity to honor the art of artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.