लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 05:40 PM2018-03-23T17:40:57+5:302018-03-23T18:13:59+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या गुन्ह्यांना रोखणाऱ्या आणि गुन्हेगारांना शासन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे.
मुंबई- बदलत्या काळामध्ये गुन्ह्यांचे स्वरुपही बदलत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या गुन्ह्यांना रोखणाऱ्या आणि गुन्हेगारांना शासन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. कायदा-सुव्यवस्थेवर चांगली पकड ठेवणारे आणि त्याच वेळेस सामाजिकतेचे भान राखणाऱ्या अधिकाऱ्य़ांना या विभागात नामांकन मिळाले आहे.
डॉ.अभिनव दिलीपराव देशमुख, (जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली)
दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि सतत युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणाºया गडचिरोली जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर आली. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना रोखणे, त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करून त्यांचे मनसुबे हाणून पाडणे, भरकटलेल्या युवक-युवतींना नक्षलवादी चळवळीपासून दूर नेऊन, आत्मसमर्पणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात करणे अशी विविध आव्हाने त्यांच्यापुढे होते. ते त्यांनी समर्थपणे पेलण्यासोबतच इतरही अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे आज नक्षल चळवळ बऱ्यापैकी नियंत्रणात येऊन सामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यास मदत होत आहे. पोलीस विभागाच्या पुढाकारातून जागोजागी जनजागरण मेळावे घेऊन, शासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींना त्यात सहभागी करून, शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली जाते. जून २०१६ मध्ये डॉ.देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून असे ३८५ जनजागरण मेळावे घेण्यात आले. याशिवाय सदर मेळाव्यादरम्यान शासकीय खर्चातून २७८ जोडप्यांचे विवाहसुद्धा लावून देण्यात आले. ग्रामभेट योजनेंतर्गत पोलीस विभागाच्या चमूने गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन, गावकऱ्यांच्या विविध पातळीवरील समस्या जाणून घेऊन, त्यांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जातो. डॉ.देशमुख यांच्या कार्यकाळात ३,१७७ ग्रामभेटी होऊन २७०९ समस्या प्राप्त झाल्या. त्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या. उद्याचे भविष्य असणाºया ग्रामीण भागातील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र दर्शन’ ही सहल घडवून बाहेरील प्रगती, संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. यात गेल्या दोन वर्षांत ७ सहलींचे आयोजन करून, ५७७ विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची सहल घडविली. त्यात २५ नक्षल्यांचे नातेवाईक व २८ नक्षलपीडित पाल्यांचाही समावेश होता. वर्षभरात नक्षल्यांकडून दोन वेळा सप्ताह पाळला जातो. या दरम्यान, नक्षल्यांचे मनसुबे साध्य होऊ नये आणि नागरिकांमधील दहशत कमी व्हावी, यासाठी डॉ. देशमुख यांच्या संकल्पनेतून सर्व उपविभागीय स्तरावर शांती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून, १० पोलीस ठाण्यांच्या वतीने ‘आदिवासी विकास दौड - एक धाव विकासाकडे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात ८ हजार विद्यार्थी, गावकरी आणि महिलांनी सहभाग घेतला. याशिवाय या जिल्ह्याच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, म्हणून ५ जानेवारी २०१८ रोजी पोलीस विभागाच्या पुढाकारातून गडचिरोलीत रोजगार मेळावा घेतला. त्यात ३,७६६ उमेदवारांची नोंदणी झाली. त्यापैकी ८२४ उमेदवारांना विविध कंपन्यांत रोजगार देण्यात आला. पोलिसांच्या नागरी कृती शाखेमार्फत सिकलसेल तपासणी, बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून, नागरिकांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, ३ मार्च २०१८ रोजी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीने आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांना सहभागी करून घेत, एक विश्वविक्रम साधण्यात आला. यात ‘गांधी विचार व अहिंसा’ या पुस्तकातील उतारा एकाच वेळी ७,०४१ जणांना ऐकवून तुर्कस्तानचा विक्रम मोडला. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या चमूकडून या विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा होईल, यात दुमत नाही.
डॉ.अभिनव देशमुख यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php
डॉ.महेश पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस
कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड, मोठ-मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्याचे कसब आणि सोबत विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये चांगली प्रतिष्ठा कायम केलेले ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची अष्टपैलू अधिकारी म्हणून ओळख आहे. अहमदनगर आणि नांदेडसारख्या राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यांचा कारभार त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळला. कुर्ला, धारावी माणि माहिमचा समावेश असलेल्या मुंबईच्या अतिशय संवेदनशील अशा झोन क्रमांक पाचमध्ये त्यांनी परिणामकारक कामगिरी केली. एका पोलीस कर्मचाऱ्याने दोन गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याची जबाबदारी देण्याची योजना त्यांनी राबविली. या प्रशंसनीय योजनेची अंमलबजावणी गृहविभागाने राज्यभर केली. बोरीवली येथे एका चित्रपट निर्मात्याच्या हाय प्रोफाइल खून प्रकरणाचा छडा महेश पाटील यांनी लावला होता. दादर येथे ५0 लाख रुपयांची खंडणी घेताना, कुख्यात गँगस्टर अश्विन नाईक याच्या मुसक्या त्यांनीच आवळल्या होत्या. रोमन नागरिकांची आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड करून मुंबईच्या बोगस एटीएम कार्डच्या दहा प्रकरणांची उकल त्यांनी केली होती. १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या अंत्यविधी वेळी उद्भवलेली जातीय परिस्थिती महेश पाटील यांनी अतिशय सावधपणे आणि योग्यरीत्या हाताळली होती. महापरिनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर उसळतो. एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पाटील यांनी सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या केले. अहमदनगर आणि नांदेडमधील जातीय दंगलींची परिस्थिती सक्षमपणे हाताळून त्यांनी स्वत:मधील एका परिपक्व अधिकाºयाचा परिचय दिला. पुणे येथे २00८ साली झालेल्या कॉमनवेल्थ क्रीडा महोत्सवाची सुरक्षा व्यवस्था पाटील यांनी सक्षमपणे हाताळली होती. अतिशय अरुंद रस्ते आणि गल्ल्या असलेल्या धारावी परिसरात राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा बंदोबस्त त्यांनी सांभाळला होता. अवैध दारूमुक्त ठाणे जिल्ह्याची मोहीम पाटील यांनी धडकपणे राबविली. यासाठी एकीकडे कारवाईचा बडगा उगारताना दुसरीकडे पाटील यांनी ६0 अवैध दारू विक्रेत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन माणुसकीचा परिचय दिला. अवैध दारू गाळण्याच्या कामात कुष्ठरोगाने ग्रस्त झालेले काही रुग्ण गुंतले होते. पाटील यांनी त्यांचे दापोली, तसेच पुणे येथे पुनर्वसन करून दिले. बरेचदा काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगार सापडतात. पाटील यांनी त्यांचेही समुपदेशन आणि पुनर्वसन केले. पोलीस खात्यातील त्यांची २२ वर्षांची सेवा निष्कलंक असून, खात्याप्रती त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.
डॉ. महेश पाटील यांना मत देण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php
निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त, गुन्हे प्रकटीकरण - १, मुंबई
अंगी जिद्द आणि चिकाटी असल्यास कोणतेही लक्ष्य अशक्य नसते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी. लातूरच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तांबोळी यांनी येथीलच सैनिकी शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तेथूनच देशसेवेचा विडा त्यांनी उचलला. दुसरीकडे जिद्दीने अभ्यासही सुरूच ठेवला. परभणीच्या शेतकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत त्यात विद्यापीठाचे सुवर्णपदकही पटकावले. एमपीएससी परीक्षेचे सर्व टप्पे पार करत, १९९६ मध्ये ते पोलीस दलात सहभागी झाले. सुरुवातीच्या काळात धुळे, हिंगोली, नांदेड येथे त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर, वर्धा, नंदुरबार येथेही कार्यरत राहून ते मुंबई परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाले. पुढे मुंबई गुन्हे शाखेत तीन वर्षे त्यांनी चोख सेवा बजावली. त्यानंतर, आव्हानात्मक म्हणून ओळखल्या जाणाºया परिमंडळ दोनची जबाबदारी त्यांना सोपविण्यात आली. तेथील धडक कारवाईमुळे ‘मुंबईचे सिंघम’ हीच त्यांची ओळख बनली. पोलीस खात्यात राहूनही व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि मनातील प्रेमळ भाव त्यांनी जपले आहेत. कर्तव्यात मात्र कोणतीही चूक अथवा कसूर राहू नये, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. वैयक्तिक श्रेय अथवा बडेजाव ते कधीही मिरवित नाहीत, तर सांघिकदृष्ट्या काम करण्याकडे त्यांचा सदैव कल असतो. याच कार्यपद्धतीमुळे गुन्ह्यांचा अत्यंत कमी वेळात छडा लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. जे. डे. हत्याकांड, दहशतवादी अजमल कसाब खटल्यासह विविध संवेदनशील गुन्ह्यांत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. २०१४ मध्ये औरंगाबादच्या एसआरपीएफ कमांडंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तेथे अनेक बदल त्यांनी घडवून आणले. एसआरपीएफच्या जवानांसाठी आरोग्य प्रकल्प, जवानांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. पोलीस अधिकारी असूनही सामाजिक कार्याचे भान त्यांनी ठेवले. वृक्षारोपण, प्लॅस्टिकमुक्तीसह स्वच्छता मोहिमेत ते हिरीरीने सहभागी होत आले आहेत. त्यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेची शासनाने वेळोवेळी दखल घेतली. दोन वर्षे महाराष्ट्राचा क्लिनेस्ट आणि बेस्ट कॅम्पेन म्हणून त्यांना गौरविण्यात आले. एसआरपीएफमधील सेवेनंतर सध्या ते मुंबई गुन्हे प्रकटीकरण एकच्या पोलीस उपायुक्त पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक, राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
निसार तांबोळी यांना मत देण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php
दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक, जळगाव
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांवर, तसेच गुन्हेगारी वृत्तीला कसा आळा घालायचा, याची शिकवण अवघ्या महाराष्ट्राला करून देणाऱ्या जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सातारा सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या कराळे यांचा पिंडच नवेनवे उपक्रम राबवून प्रयोगशीलता कायम ठेवणे, त्यातून योग्य तो सकारात्मक परिणाम साधणे असा आहे. त्यामुळे त्यांनी जळगाव येथे रुजू झाल्यानंतर, वाढते अपघात आणि त्यात बळी जाणाºयांची संख्या यावर लक्ष केंद्रित केले. ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले, असे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधले आणि उपाययोजना केली. मानवी चुकांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी गुन्हे प्रतिबंध जनजागृती व्हॅनची निर्मिती केली. या व्हॅनमधून शाळा, कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी सातत्याने जनजागृती केली जाते. गुन्हेगारांमध्ये वचक राहावा, यासाठी डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून पेट्रोलिंगसाठी आवश्यक असलेली आरएफआयडी ही सीस्टिम लागू केली. या सीस्टिममुळे पेट्रोलिंगमध्ये खंडही पडत नाही आणि टाळाटाळही होत नाही. याचे थेट नियंत्रण अपर पोलीस अधीक्षकांकडे असते. याशिवाय सिटीझन पोर्टल, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असे उपक्रमही त्यांनी जळगावात राबविले. याशिवाय पोलीस पाल्यांसाठी उद्योजकांचा मेळावा घेऊन, तब्बल ५२२ पोलीस पाल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. पोलीस उपअधीक्षक दाखल होण्यापूर्वी युनोमध्ये त्यांनी युगोस्लाव्हीया, कोसोवा येथे प्रतिनियुक्तीवर काम केले. मुंबई, ठाणे, कल्याण नाशिक येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे येथे पोलीस अधीक्षक, तर उस्मानाबाद येथे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते. ४ मे २०१७ पासून ते जळगावात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेत. १ जानेवारी २०१८ रोजी त्यांना शासनाने पोलीस अधीक्षक अ श्रेणी प्रदान केली. ते आता उपमहानिरीक्षक पदोन्नतीस पात्र आहेत.
दत्तात्रय कराळे यांना मत देण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php
विरेंद्र मिश्रा, पोलीस उपायुक्त, परीमंडळ ३, मुंबई
प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, सचोटीचे अधिकारी म्हणून विरेंद्र मिश्रा यांची ओळख आहे. मध्यप्रदेशच्या रीवा शहरात त्यांचा जन्म झाला. आई वडील आणि चार भाऊ असे त्यांचे कुटूंब आहे. मिश्रा यांनी लहाणपणीच पोलीस दलात सहभागी होण्याचे ठरविले आणि प्रयत्न सुरु केले. अलाहाबाद, लखनऊमधून त्यांनी एमए, एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. पुढ़े दिल्लीतून पत्रकारीतेचे शिक्षण घेतले. सुरुवातीपासूनच वाचन, साहित्य, कला, नाट्य, संस्कृति, पर्यटनात आवड असलेल्या मिश्रा यांनी ३ वर्ष लेक्चरर म्हणून नोकरी केली. २००६ मध्ये ते आयपीएस झाले. २००८ मध्ये ठाणे ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली. नंतर बुलढाणामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर २०११ ते २०१४ दरम्यान त्यांची अकोला पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. याच दरम्यान अकोल्यातील २०१२ दंगलीच्या काळात कायदा-सुव्यवस्थाच नव्हे तर विस्कटलेल्या, तुटलेल्या मनांना जोडण्याचे काम मिश्रा यांनी केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना २०१५ च्या महात्मा गांधी शांतता पुरस्काराने ग़ौरविण्यात आले. शिवाय खेळांच्या माध्यमातून जातीय सलोखा टिकविण्याची अनोखी नाळ त्यांनी जोडली. आजही हा उपक्रम तेथे सुरु आहे. अकोल्यातील उल्लेखनीय कामगिरीनंतर मुंबईतील अतिमहत्त्वाच्या परीमंडळ ८ ची जबाबदारी सोपविण्यात आली. मेक इन इंडियासारख्या महत्वपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळत त्यांनी अनेक संवेदनशील गुन्हयांची उकल केली. पुढ़े पोलीस उपायुक्त म्हणून मुख्यालयात ५ महीने पदभार सांभाळला. सध्या ते परीमंडळ ३ मध्ये कार्यरत आहेत. मुंबईकरांची झोप उड़विणा-या कमला मिल अग्नितांडवात त्यांनी केलेल्या कारवाईमुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या. कुठल्याही दबावाला न जुमानता त्यांनी सर्वच आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. ‘एक गुन्हा एक अधिकारी’ या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हयांचा छड़ा लावण्यास मदत होते. आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त समाजसेवा करण्याकडे त्यांचा कल असतो. पत्नीच्या सहकार्यामुळे आपण कामाकड़े लक्ष देउ शकतो हे देखील तितकेच अभिमानाने मिश्रा सांगतात. पत्नी आयकर विभागात आयआरएस अधिकारी आहेत. घर, नोकरी सांभाळून ती एक वर्षाच्या मुलीची काळजी घेते. त्यामुळे मी बिन्धास्त असतो, असेही ते म्हणतात. खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी त्यांची धड़पड असते. पोलीस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील आदर्शवत मिश्रा यांना लोकमतचा सलाम.
विरेंद्र मिश्रा यांना मत देण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php