दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार ‘लोकमत पार्लमेंटरी अॅवॉर्ड्स’
By admin | Published: July 10, 2017 05:28 AM2017-07-10T05:28:17+5:302017-07-10T05:28:17+5:30
देशभरातील दिग्गजांना ‘लोकमत समूहा’तर्फे ‘लोकमत पार्लमेंटरी अॅवॉर्ड्स २०१७’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संसदीय कामकाजात अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या देशभरातील दिग्गजांना ‘लोकमत समूहा’तर्फे ‘लोकमत पार्लमेंटरी अॅवॉर्ड्स २०१७’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बुधवार, १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीत मौलाना आझाद रोडवरील विज्ञान भवनातील ‘प्लेनरी’ सभागृहात हा सोहळा रंगणार आहे.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री व्यंकय्या नायडू, राज्यसभेचे उपसभापती प्रो. पी. जे. कुरियन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील या मान्यवरांची विशेष उपस्थिती ‘लोकमत पार्लमेंटरी अॅवॉर्डस’ सोहळ्याला लाभणार आहे. ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे या सोहळ््याचे निमंत्रक आहेत.