लोकमत सखी सन्मान सोहळा : विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम!

By admin | Published: October 22, 2016 09:09 PM2016-10-22T21:09:18+5:302016-10-22T21:09:18+5:30

‘लोकमत’ तर्फे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या गौरवार्थ येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सखी सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला

Lokmat Sakhi Sankranti Soula: Salute to the work of women in various fields! | लोकमत सखी सन्मान सोहळा : विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम!

लोकमत सखी सन्मान सोहळा : विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम!

Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 22 - महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरता आले पाहिजे. त्यांना धीट व बलशाली बनविण्याचे काम लोकमत सखी मंचच्या माध्यमातून केले जात आहे. स्त्री-पुरुष समानतेनेच प्रगतीच्या वाटा धुंडाळता येतील, असे प्रतिपादन ‘मानवलोक’चे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी केले.
‘लोकमत’ तर्फे शनिवारी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या गौरवार्थ येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सखी सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, मानवी हक्क अभियानच्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, गौतम खटोड, तत्त्वशील कांबळे, प्रा. दुष्यंता रामटेके उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी डॉ. लोहिया म्हणाले, लोकमतने सुरू केलेली स्त्री सन्मानाची चळवळ प्रेरणादायी आहे. जयप्रकाश नारायण हे ‘नारी के सहयोग बिना हर बदला अधुरा हैं’, असे सांगत. महिलांमध्ये जोपर्यंत आत्मसन्मान निर्माण होत नाही तोपर्यंत समाजात बदल दिसणार नाही. त्यासाठी स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा उमटवावा. सखी मंचचे काम स्त्रियांच्या पंखात बळ देण्याचे आहे. यातून महिलांना उन्नतीची दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या,  लोकमत सखी मंचशी माझा जुना स्नेह आहे. जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याने कामाचे चीज झाल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराने जीवनाकडे मागे वळून पाहण्यास भाग पाडले, अशी भावनोत्कट उद्गारही त्यांनी काढले. महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत यशाची पताका डौलाने फडकावली आहे. ही मोठी अभिमानाची बाब आहे. यावेळी त्यांनी 
‘नादान ना समझना कुछ ऐसा हुनर रखती हूं
अभी चाँद पर पहुंची हूं, सूरज पर नजर रखती हूं’
हा शेर पेश करुन उपस्थितांची दाद मिळविली.
आई-वडील, सासू-सासरे, दीर-पती यांच्या पाठबळामुळेच आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी हातून घडल्या. त्याचे वेगळे समाधान वाटते. हा पुरस्कार या पाठीराख्यांनाच समर्पित करीत आहे. 
पशु संवर्धन उपायुक्त डॉ. सुरेखा माने यांचेही भाषण झाले. मुक्या प्राण्यांची वेदना जाणण्याचे काम पशुवैद्यकीय क्षेत्रात करावे लागते. प्राण्यांची सेवा करणाºया महिलेचा लोकमततर्फे झालेला गौरव ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून मी पुढे आले. जिल्ह्यातच तीन वर्षांपासून कर्तव्य बजावत आहे. हा माहेरचा आहेर असे मी मानते, अशी भावूक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सखी सन्मानचे परीक्षक म्हणून मनीषा तोकले, तत्त्वशील कांबळे, दुष्यंता रामटेके, प्रताप नलावडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन शैलेश कोरडे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सखी कार्यक्रमाच्या साक्षीदार ठरल्या.  परीक्षक म्हणून माधवी चितलांगे व पल्लवी गेडाम यांनी काम पाहिले.
 
सखी सन्मानच्या मानकरी
वैशाली नहार (सामाजिक)
सृष्टी सोनवणे (शौर्य), 
कोमल बोरा (क्रीडा)
डॉ. सुरेखा माने (वैद्यकीय)
कावेरी नागरगोजे (शिक्षण)
सुशीला अलझेंडे (औद्योगिक)
मंगला गुढे (साहित्य)
दिवाळी फराळ स्पर्धेतील विजेत्या
गोड पदार्थ : प्रथम- सुजाता जगताप, द्वितीय- रामतीर्था धनवडे.
तिखट पदार्थ : प्रथम- सुप्रिया मुंदडा, द्वितीय- हेमलता पालसिंगनकर.
 
हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफिल
पुरस्कार वितरण कार्यक्रमात हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफिल रंगली. अनघा काळे आणि शैलेश पवार यांनी विविध गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. यावेळी सखींनाही ठेका धरीत नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.
 

Web Title: Lokmat Sakhi Sankranti Soula: Salute to the work of women in various fields!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.