या, मनातलं बोलूया; आता रोज भेटूया!... Lokmat Sakhi वेबसाईट लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:37 PM2021-03-08T19:37:41+5:302021-03-08T19:39:58+5:30
Lokmat Sakhi : फॅशन-स्टाइल्स यासह स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात स्टायलिंगचे एलिगंट रुप शोधण्यापर्यंत आणि मानसिक, शारीरिक आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्याचा हात धरेपर्यंतचा प्रवास म्हणजे हा ‘लोकमत सखी’चा नवा प्लॅटफॉर्म आहे.
रोजच्या जगण्यातले प्रश्न सोडवणाऱ्या, साध्या-सोप्या आनंदाच्या युक्त्या सांगणाऱ्या, स्वयंपाकातली रहस्यं आणि आहार-विहाराचे प्रश्न सोपे करणाऱ्या एका रसरशीत प्रवासाला आपण निघूया सोबत... आता रोज!
लोकमत वृत्तपत्र समूहाने खास महिलांसाठी तयार केली रोज भेटायची नवी डिजिटल जागा :www.lokmatsakhi.com
तुमच्या मोबाईलमध्ये भेटणारी, नेहमी तुमच्या सोबत असणारी जीवाभावाची मैत्रीण!
या साइटवर असं नवीन काय आहे?
तेच जे एरव्ही बायकांच्या जगण्यात असतंच, जगण्याचं वेगवान झपाटलेपण. भरभरुन जगण्याची आस, आनंद वाटून घेत तो साजरा करण्याची उर्मी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याची धमक आणि स्वत:सह मुलांसह कुटुंबाला घडवण्याची खमकी हिंमत.
या साऱ्यात काही निवांत क्षण मात्र हरवतात. जगण्याचं मऊ अस्तर विरतं, कधी फाटतं, कधीतर पुरतं निघूनही जातं हातून आणि ते लक्षातही येत नाही, इतका कोरडा रखरखाट जगणं व्यापून टाकतो.
तो प्रॅक्टिकल कोरडेपणा, टू डूच्या अंत पाहणाऱ्या याद्या, स्पर्धेत धावण्याची अटळ सक्ती हे सारं नव्या जगण्याचा भाग असलं तरी
चांदण्या रात्री निवांत बसावं गझल ऐकत असे क्षण आपले आपण शोधले पाहिजेत, नव्हे जगलेही पाहिजेत. ते कसे शोधायचे, ‘फिलिंग अमूकतमूक’च्या सोशल मीडिया पीडीए आणि शो-शा पलीकडे जगण्यात खरे आनंदाचे रंग कसे भरायचे, वाटलं माराव्या निवांत गप्पा, जरा मनासारखं रांधून खावं, खाण्यापिण्यापासून ते खाण्यापिण्याच्या आठवणीपर्यंत पदार्थांच्या रंगागंधापर्यंत, फॅशन-स्टाइल्स यासह स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात स्टायलिंगचे एलिगंट रुप शोधण्यापर्यंत आणि मानसिक, शारीरिक आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्याचा हात धरेपर्यंतचा प्रवास म्हणजे हा ‘लोकमत सखी’चा नवा प्लॅटफॉर्म आहे.
मैत्रिणींचा हक्काचा कट्टा असावा, मन मोकळं करण्याची, मिळून काही जगण्याची, साजरं करण्याची जागा म्हणजे www.lokmatsakhi.comसौंदर्य, आहारविहार, फॅशन, मेकअप ते आरोग्य, मानसिक आरोग्य, आर्थिक गुंतवणूक, लैंगिक प्रश्न आणि नाती या साऱ्या विषयांसह मोकळेपणानं लिहिण्या-बोलण्या-वाचण्याची हक्काची जागा.
तर मग आता भेटू रोजच..