‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना देणार बाजार ओटे, सहकारमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 05:33 AM2018-01-07T05:33:21+5:302018-01-07T07:01:40+5:30
पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना बाजार ओटे बांधण्यासाठी पणन विभाग अनुदान देईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली.
अहमदनगर : पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना बाजार ओटे बांधण्यासाठी पणन विभाग अनुदान देईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली.
अहमदनगर येथे ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ सोहळा मंत्री देशमुख व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. १३ सरपंचांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘लोकमत’ने रोजगारनिर्मिती करणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही पुरस्कार सुरू केले आहेत. त्यांना १० लाखांचे बिनव्याजी कर्ज देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली. सरपंचांना शासनानेही प्रोत्साहन देण्याची मागणी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केली. ‘लोकमत’च्या ‘सरपंच अॅवॉर्ड्’चे देशमुख यांनी कौतुक केले. सरपंचांना गौरविणारी योजना नव्हती. ‘लोकमत’ने ही उणीव शोधून अशी पुरस्कार योजना सुरू केली आहे. हा अभिनव प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मंत्री राम शिंदे म्हणाले. ‘बीकेटी टायर्स’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक तर पतंजली प्रायोजक व महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक आहेत.
विकासाला चालना
गावाला केंद्रबिंदू माणून ‘लोकमत’ तळागाळापर्यंत पोहोचत आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाला या पुरस्कारामुळे आणखी चालना मिळणार आहे.
- सुभाष देशमुख, सहकार
व पणनमंत्री