Lokmat Sarpanch Awards 2018 : जळगावचे पुरुजित चौधरी यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (रोजगारनिर्मिती प्रोत्साहन) पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 04:13 PM2018-03-29T16:13:54+5:302018-03-29T16:13:54+5:30
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (रोजगारनिर्मिती प्रोत्साहन) हा पुरस्कार जळगावमधील डांमुर्णी गावचे सरपंच पुरुजित गणेश चौधरी यांना देण्यात आला.
मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (रोजगारनिर्मिती प्रोत्साहन) हा पुरस्कार जळगावमधील डांमुर्णी गावचे सरपंच पुरुजित गणेश चौधरी यांना देण्यात आला.
गट - रोजगारनिर्मिती प्रोत्साहन
सरपंचाचे नाव - पुरुजित गणेश चौधरी
गाव - डांमुर्णी
तालुका - यावल
जिल्हा - जळगाव
शासनाच्या योजनांचा पाठपुरावा करण्यात मोलाची कामगिरी
गोरगरीब, वंचितांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहतात. अशा वंचितांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी पुरुजित चौधरी अनेक वर्षे काम करीत आहेत. २०१५ पासून डांभुर्णीचे सरपंच पद भूषविणाऱ्या चौधरी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची महाराष्टÑात प्रथम क्रमांकाची अंमलबजावणी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ७१६ लाभार्थींना त्यांच्या हक्काची जागा मिळाली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३६८ लाभार्थींना घरकूल मिळवून देण्यातही त्यांनी मोलाची मदत केली. वस्तीत दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत समाजमंदिर बांधकाम व गटारांचे बांधकामही त्यांनी करवून घेतले. दूषित पाणी पुरवठा रोखण्यासाठी त्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची टाकी, जलवाहिनी दुरुस्तीचे काम आदी कामे करवून घेतली. गावातील शौचालयांची संख्या ४० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत नेण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाख
पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.